• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण (88)

तथापि नंतर भलतेच घडले. कार्यकारिणीच्या सदस्यांनी ठरावाबाबत यशवंतरावांचे अभिनंदन केले, वृत्तपत्रांनी व पत्रकारांनीही त्यांचे कौतुक केले. ''हा एकच असा नेता आहे की तो कुणाच्याही बाजूने नाही, स्पर्धेत नाही. काँग्रेस फुटू नये यासाठी चव्हाणांनी जे जे प्रयत्‍न केले ते वाखाणण्यासारखे आहेत'' असा अभिप्राय महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी व्यक्त केला. लंडनच्या 'इकॉनॉमिस्ट' पत्रानेही चव्हाणांच्या प्रयत्‍नांची स्तुती केली. निजलिंगप्पा विश्रांतीसाठी म्हैसूर राज्यातील आपल्या निवासस्थानी गेल्यावर दिल्लीत उभय बाजूंनी पुन्हा चिखलफेक सुरू केली. तिकडे निजलिंगप्पांनीही 'विभूतिपूजेचा' उल्लेख करून देशात हुकूमशाहीचे संकट येण्याबाबत इशारा दिला. स. का. पाटलांनी इंदिरा गांधी कम्युनिस्टांच्या मार्गाने जात असल्याचा आरोप केला. चव्हाणांची स्थिती चमत्कारिक झाली. दोन्ही बाजूंना एकत्रित आणण्याचे त्यांच्या प्रयत्‍नांना 'खो' बसला. चव्हाण हे 'कुंपणावर' बसले आहेत अशी टीका सहन करावी लागली. त्रिपुरा काँग्रेसच्या वेळी जवाहरलाल नेहरूंची जी स्थिती झाली होती तशीच ३० वर्षानंतर चव्हाणांची झाली. १९३९ मध्ये नेहरूंनी सुभाषचंद्र बोस आणि काँग्रेसश्रेष्ठी यांच्यात मध्यस्थीचे कसोशीने प्रयत्‍न केले होते. १९६९ मध्ये चव्हाणांनी प्रयत्‍नांची पराकाष्ठा केली होती. त्यांचा 'ऐक्य' ठराव संमत केल्यानंतरही एकीऐवजी बेकीचे प्रयत्‍न दोन्ही बाजूंनी सुरू झाले होते. यशवंतरावांना मराठी खासदार भेटले आणि सांगितले की तुमच्या प्रामाणिक प्रयत्‍नानंतर 'कुंपणावरचे' अशी टीका होत असेल तर घ्या कोणती तरी एक बाजू आणि बघू काय होते ते !  यशवंतरावांच्या स्वभावात एकारलेपणा नव्हता आणि धाडसाने - बिनदिक्कतपणे उडी घेण्याची प्रवृत्ती नसल्याने आपल्यावरील टीका त्यांनी निमूटपणे सोसली.

पंतप्रधानांच्या मद्रास भेटीबद्दल बरेच वादंग माजले. सुब्रह्मण्यम यांनी पुढाकार घेऊन सप्टेंबरमध्ये इंदिराजी आणि कामराज यांची बैठक घडवून आणली. तथापि या बैठकीतून कांहीही निष्पन्न झाले नाही. उलट कामराज यांनी आरोप केला की सुब्रह्मण्यम हे आपल्याला काँग्रेसमध्ये एकाकी पाडत आहेत, काँग्रेस कार्यकर्त्यांना आपल्या विरुद्ध उठवीत आहेत. पंतप्रधानांच्या मद्रास भेटीवर त्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुब्रह्मण्यम यांनी तामिळनाडू काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. श्री. यशवंतराव या घटनेमुळे अस्वस्थ झाले. त्यांनी बोलून दाखविले की मद्रास आणि उत्तर प्रदेशात जे घडले आहे ते संघर्ष मिटविण्याऐवजी वाढविण्याचे लक्षण आहे. मुख्यमंत्री चंद्रभानू गुप्‍ता यांनी उत्तर प्रदेशात कमलापती त्रिपाठी आदिंना एकाकी पाडण्यास सुरुवात केली होती. यशवंतरावांनी अध्यक्ष निजलिंगप्पांची भेट घेऊन सुचविले की, त्यांनी अखिल भारतीय काँग्रेसची आणि कार्यकारिणीची बैठक बोलवावी. 'शीतयुद्ध' थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मोकळेपणाने चर्चा करण्याची आवश्यकता आहे. निजलिंगप्पांनी यशवंतरावांची सूचना मान्य केली, तथापि कार्यवाही केली नाही. सिंडिकेटच्या मनात भीती होती की अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत निजलिंगप्पांना अध्यक्षपदावरून काढून टाकण्याचा निर्णय केला जाईल.