या वातावरणात मुख्यमंत्री या नात्याने समारंभ शांतपणे, व्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी यशवंतरावांवर येऊन पडली होती. प्रतापगडावर समारंभाची जय्यत तयारी त्यांनी सुरू केली. छत्रपतींचा ३८ फूट उंचीचा पुतळा प्रतापगडावर पोहोचविलेला होता. छत्रपतींच्या आणि महाराष्ट्राच्या इतमामाने समारंभ थाटात साजरा झाला पाहिजे या दृष्टीने तयारी चालू होती. समितीनेही निदर्शनाचे दृष्टीने प्रचाराचे काम जोरात सुरू केले होते. शिवराळ भाषेचा वापर होऊ लागला होता. समितीच्या निदर्शनाच्या दुराग्रहावर वृत्तपत्रांनी जेव्हां जोरदार टीका सुरू केली, रावसाहेब पटवर्धन-पागे यांच्यासारखे नेते जेव्हा जाहीर नापसंती व्यक्त करू लागले. तेव्हां समितीच्या नेत्यांनी आपल्या हटवादी भूमिकेत बदल करण्यास सुरुवात केली. ''पंडित नेहरूंच्या आगमनप्रसंगी प्रतापगडावर मोर्चा नेऊन द्विभाषिक राज्याबद्दलची नापसंती शांततेच्या मार्गाने व्यक्त करावी'' असा ठराव समितीच्या कार्यकारिणीने केला व पुढची योजना आंखली. मालोजीराजे नाईक-निंबाळकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी प्रतापगडावरील समारंभ यशस्वी व्हावा म्हणून खूप कष्ट घेतले. सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य दिले. काँग्रेस कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे प्रतापगडाकडे रवाना झाले. जनतेतही अपूर्व उत्साह निर्माण होऊन लोकांनी मोठ्या संख्येने प्रतापगडाकडे कूच केले. जनता शिवस्मारक समारंभात सामील आणि समितीचे नेते व कार्यकर्ते निदर्शनात सामील असे परस्पर विरोधी दृष्य प्रतापगडाच्या वाटेवर पाहायला मिळाले. नेहरूंच्या कार्यक्रमाला लक्षावधी लोक हजर राहिले. पुणे ते प्रतापगड या मार्गावर पंडितजींचे जागोजागी प्रचंड स्वागत करण्यात आले. परिस्थितीला मिळालेली ही कलाटणी पाहून समितीवाल्यांनी आपली खेळी बदलून वाई आणि पोलादपूर या दोन ठिकाणी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. पांच-सहा हजार निदर्शक छावण्या ठोकून पंडितजींच्या आगमनाची वाट पाहू लागले. नोव्हेंबर ३० ला निदर्शकांनी निदर्शने केली आणि प्रतापगडाकडे तोंड वळविले. तथापि तेथे आपला फज्जा उडेल हे पाहून वाईजवळच सरकारने आपल्याला अटकाव करावा अशी इच्छा यशवंतरावांचे कानावर घातली. निदर्शकांच्या नेत्यांची अडचण ओळखून यशवंतरावांनी निदर्शकांना वाईजवळ थांबविण्याची आणि कार्यक्रम संपल्यावर निघून जाण्याची व्यवस्था केली. समारंभ यशस्वी करायचा आणि निदर्शकांचा आब राखावयाचा ही दोन्ही कामे यशवंतरावांनी कौशल्याने पार पाडली.
पंडित नेहरूंनी अपूर्व उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. नंतर जमलेल्या जनसागरापुढे अर्धा तास सुरेख भाषण केले. शिवाजीमहाराजांची थोरवी त्यांनी गायली, त्यांचे यथायोग्य वर्णन केले. शिवाजीमहाराज हे कांही एकट्या महाराष्ट्राचे नसून सार्या देशाचे महान सुपुत्र आहेत, या शब्दांत महाराजांना भावपूर्ण मुजरा केला. पंडितजींच्या भाषणाचा सारांश यशवंतरावांनी आपल्या भाषणात सांगून पंडितजींचे आभार मानले. चव्हाण म्हणाले, ''एका युगपुरुषाचे हातून दुसर्या युगपुरुषाच्या पुतळ्याचे अनावरण हा प्रसंग महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे.'' पुण्याला परतल्यावर नेहरूंचे इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर जाहीर भाषण झाले. त्यात त्यांनी द्विभाषिकाचा निर्णय का घ्यावा लागला याचे सविस्तर वर्णन करून संयुक्त महाराष्ट्र झाला तर आपला विरोध राहणार नाही असेही सांगून टाकले.