फ्लोरा फौंटरजवळील गोळीबारामुळे मुंबई शहर अशांत बनले होते. अशा स्थितीत मोरारजींच्या बिलावर असेंब्लीत चर्चा करीत राहणे योग्य नाही हे जाणून हिरे-चव्हाण-देवगिरीकर-देसाई आदींनी मोरारजींची भेट घेतली आणि चर्चा तहकूब करावी अशी मागणी केली. मोरारजींनी दिल्लीचे परवानगी मिळविली आणि पेच तात्पुरता सुटला. काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्याचा आग्रह धरून ते जर सभापतींच्या हवाली केले असते तर परिस्थितीस वेगळेच वळण लागले असते. राजीनामे देण्यास सर्व आमदार राजी नव्हते. त्यांच्यावर दबाव आणला गेला असता तर मोरारजींची आणि काँग्रेस वगि कमिटीची पंचाईत झाली असती. यशवंतरावांनी ही स्थिती श्री. कुंटे यांना समजावून दिली. काँग्रेसअंतर्गत दोन गट पडले, फूट पडली आणि ती वाढत गेली. हिरे आणि देव हे दिल्लीत काय सौदेबाजी करतात याकडे एका गटाचे लक्ष लागून राहिले. राज्य पुनर्रचना समितीच्या अहवालावर लोकसभेत १४ डिसेंबर, १९५५ ला चर्चा सुरू झाल्यावर काकासाहेब गाडगिळांनी चर्चेत भाग घेऊन काँग्रेस श्रेष्ठींच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न सोडविला नाही तर लोक रस्त्यावर येऊन तो सोडवतील असा इशारा दिला. स. का. पाटील यांनी मुंबई शहर महाराष्ट्रात येऊ नये यावर आपल्या भाषणात जोर दिला.
लोकसभेत चर्चा झाली पण निर्णय झाला नाही. देव-गाडगीळ-मोरारजी यांनी एकत्र बसून निर्णय करावा असे गृहमंत्री पंडित पंत यांनी आपल्या उत्तराच्या भाषणात सुचविले. याच सुमारास मुंबई कॉर्पोरेशनने ठराव संमत केला की मुंबईचा समावेश महाराष्ट्रात करावा. या ठरावाने स. का. पाटील यांचा नक्षा उतरविला गेला. मोरारजींनी डॉ. नरवणे यांचा राजीनामा मागितला आणि नरवणे यांनी त्वरित मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. हिरे यांना हात लावण्याची मोरारजींची हिंमत झाली नाही. पंतांनी सुचविल्याप्रमाणे शंकरराव देवांनी मोरारजींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. द्विभाषिकाचा पर्याय स्वीकारण्यास मोरारजीभाई तयार झाले. तथापि पांच वर्षांनी विभक्त होण्याची अट त्यांनी मान्य केली नाही. द्विभाषिकाचे मुख्यमंत्रिपद आपल्याकडे रहावे असे त्यांना मनातून वाटले. देव यांनी त्याला तयारी पण दर्शविली. देव-मोरारजी यांच्यातील खलबताबद्दल काँग्रेसजन आणि विरोधक या दोघांतही अस्वस्थता निर्माण झाली. तरीही देवांनी धांवपळ चालूच ठेवली. या संदर्भात हिरे यांच्या निवासस्थानी भरलेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत देवांच्या योजनेचा कुणीच पुरस्कार न केल्यामुळे ती बारगळली.