• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण (40)

नरुभाऊंचा या कामगिरीच्या निमित्ताने जो उल्लेख झाला आहे त्याला तशी कारणेही आहेत. लिमये हे सातारचे. काँग्रेसचे कार्यकर्ते, सातारा जिल्हा काँग्रेसच्या कार्यात यशवंतरावांचे सहकारी. त्याशिवाय ते पत्रकार. ''प्रकाश'' नांवाचे साप्‍ताहिक ते चालवीत. यशवंतरावांचा सल्ला घेऊन त्यांनी साप्‍ताहिकाचे रूपांतर दैनिकात केले. कांही काळाने पुण्याचे 'लोकशक्ती' दैनिक अडचणीत आल्यावर, डबघाईला आल्यावर भाऊसाहेब हिरे यांनी नऊभाऊंना सातारहून पुण्याला बोलाविले आणि 'लोकशक्ती' दैनिक चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. आर्थिकदृष्ट्या काम अवघड होते. तथापि हिरे यांच्या शब्दाखातर नरुभाऊंनी हे काम स्वीकारले. लोकशक्तीचा संसार चालविताना नरुभाऊंना आपले हात पोळून घ्यावे लागले. आर्थिकदृष्ट्या आपल्या संसाराची हानी करून घ्यावी लागली. यशवंतरावांच्या कर्तृत्वाबद्दल, बौद्धिक उंचाबद्दल, राजकीय आणि वैयक्तिक जीवननिष्ठेबद्दल लिमये यांच्या मनात आदर होता. यशवंतरावांच्या प्रशासन कौशल्याची, लोकसंग्रहाची, वाचनाची, कला-संगीत प्रेमाची, लेखनाची, वक्तृत्वाची वाखाणणी करण्यात नरुभाऊंनी कधी हात आणि जीभ आंखडती घेतली नाही. काकासाहेब गाडगीळ, यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील ही त्यांची आदरत्रयी. ''नरु, माझ्यावर रागावला असशील. काय करू, या खेपेला माझा नाईलाज झाला. थोडे थांबशील ना !''  यशवंतरावांचे हे उद्‍गार कालांतराने त्यांनी खरे करून दाखविले आणि नरुभाऊंना कौन्सिलवर पाठविले.

यशवंतराव हे संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधी आहेत अशी हांकाटी पिटून ज्यांनी त्यांना शिव्याशाप दिले त्यांनी यशवंतरावांच्या असेंब्लीतील भाषणाकडे खर्‍या अर्थाने लक्ष दिले नाही. मुख्यमंत्री मोरारजीभाईंनी दिनांक २७ मार्च, १९५६ रोजी प्रांतपुनर्रचना बिल असेंब्लीत मांडल्यावर, या बिलावर बोलताना यशवंतरावांनी जे विचार व्यक्त केले त्यात मुंबईवरील महाराष्ट्राच्या न्याय्य हक्काची कैफियत गृहापुढे सादर केली. यशवंतराव म्हणाले, ''मुंबई कुठे आहे हे भूगोल सांगेल. भौगोलिकदृष्ट्या मुंबई महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक अशी तीन राज्ये निर्माण करण्यात आली आहेत. गुजरातला त्यांच्या मताप्रमाणे सर्व काही मिळाले आहे, कर्नाटकाला १०५ टक्के मिळाले आहे. महाराष्ट्राचे राज्य निर्माण करताना मात्र त्यात अपुरेपणा ठेवण्यात आला आहे. मराठवाडा आमच्यात आला याचा आम्हाला आनंद होत आहे. निजामशाहीच्या कचाट्यातून मराठी भाषिकांची मुक्तता होऊन महाराष्ट्राशी ते एकरूप होत आहेत. तसेच विदर्भासह महाराष्ट्र राज्य निर्माण होत आहे याचा पण आनंद होत आहे. मुंबई महाराष्ट्रात न घातल्याबद्दल आम्हास दुःख होत आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे की नाही हा वाद निर्माण होण्याचे कारण नाही. मुंबई भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातच आहे आणि पंडित नेहरूंनीही ही गोष्ट मान्य केलेली आहे. इतिहास बदलू शकेल, पण भूगोल बदलता येणार नाही. मुंबा देवीवरून मुंबई हे नांव पडलेले आहे. वाळकेश्वर मंदिर हे मराठी भाषिकांचे आहे. प्राचीन काळापासून मुंबईचे रहिवासी, कोळी, पाठारे प्रभू हे मराठी भाषिकच आहेत. मग मुंबई महाराष्ट्राला कां बरे दिली गेली नाही ?  मुंबई हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे बंदर आहे. गुजरातला ओखा व कांडला बंदर आहे, आंध्रला विशाखापट्टण, ओरिसाला कटक, बंगालला कलकत्ता, तामिळनाडूला मद्रास बंदर आहे. मग महाराष्ट्राचे मुंबई बंदर कां बरे काढून घेण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या राजधानीसाठी मुंबईखेरीज कोणते शहर आहे बरे !''