• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ३३

द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्रिपद ही तशी सुळावरची पोळी होती.  'सू-याजी पिसाळ' ही चव्हाणांची प्रतिमा मराठी जनमानसावर पक्की झाली होती.  सर्वांत मोठ्या राज्याचे वयाने ते सर्वात लहान मुख्यमंत्री होते.  द्वैभाषिक त्यांनाही मनापासून भावलेले नव्हते.  कूपर, खेर, देसाई या आधीच्या शहरी-उच्चभ्रू आणि पूर्वप्रतिष्ठित मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत ग्रामीण गरीब स्तरातून आलेले नवखे यशवंतराव अनेक दृष्टींनी वेगळे होते.  त्यांची महामुंबई राज्याच्या मुख्यमंत्रिपदी झालेली निवड काहींना 'शेतकरी-कामगार राज्याची आणि लोकशाही समाजवादाची नांदी' ('बाबूराव काळे', पूवोक्त, १८०) वाटली असली, तरी बहुसंख्य संयुक्त महाराष्ट्रवारी मराठी माणसांना ते गुजराती भांडवलदारांच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेले महराष्ट्र-शत्रूच वाटत होते.  पण त्यापेक्षाही महत्त्वाचे आव्हान निराळेच होते.  नवे द्वैभाषिक राज्य आतून दुभंगलेले होते.  राजकीय वातावरण कमालीचे तणावपूर्ण होते.  सार्वत्रिक निवडणुका तोंडाशी आल्या होत्या.  प्रतिपक्षाचे सामर्थ्य सतत वर्धावत होते.  

अर्थात जमेच्याही काही बाबी निश्चितच होत्या.  बहुजन-नेतृत्वाच्या ठिकाणी अभावानेच आढळणारे व्यासंग, बहुश्रुतता, व्यवहार-कौशल्य, संयम, शिष्टाचार, मितभाषित्व, धोरणी मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी आणि माणसे जिंकण्याची कला असे असामान्य गुण चव्हाणांच्या अंगी भरपूर प्रमाणात होते.  त्यांच्या बळावरच द्वैभाषिकाच्या जीवघेण्या जोखमीतून ते सहीसलामत सुटले.

१९५७ च्या निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे पानिपत झाले.  अनेक प्रतिष्ठित काँग्रेस नेते पराभूत झाले.  पार्लमेंटच्या २३ जागांपैकी फक्त दोनच मिळाल्या आणि असेम्ब्लीच्या १३३ जागांपैकी फक्त ३१ काँग्रेसच्या वाट्याला आल्या. ''जिल्हेच्या जिल्हे बेचिराख ! बेकाँग्रेस झाले !! धरणीकंपासारखे झाले. अनेक काँग्रेसजनांचे डिपॉझिट जप्त झाले.'' ('पथिक - २,' ६७७).  यशवंतराव विजयी झाले होते.  त्यांनाही सुमारे ६०० मतांनी निसटता विजय मिळाला होता.  पण त्यांनी जेव्हा आपला जय म्हणजे 'द्वैभाषिकाचा जय,' असे विधान केले, तेव्हा 'त्यानेच पुढील अनर्थाचे बीजारोपण केले.  कारण सर्व प्रांतभर सूडाची भावना उघड उच्चारली जाऊ लागली.'' (कित्ता, ६६५).  यशवंतराव उर्वरित राज्यातल्या आमदारांच्या पाठिंब्यावर आपले मुख्यमंत्रिपद टिकविण्यात यशस्वी झाले असले, तरी सभागृहातल्या व बाहेरच्याही विरोधकांच्या मुकाबल्यात काम करणे हे महाकठीण कर्म होते.  विरोधी पक्षांचे एकाहून एक वरचढ नेते विधानसभेत प्रविष्ट झाले होते.

पण यशवंतरावांच्या बाजूने या निवडणुकीकडे पाहिल्यास त्यांना हा काँग्रेसचा पराभव, त्यांचे चरित्रकार रामभाऊ जोशी म्हणत, त्याप्रमाणे- ''......वेगळ्या अर्थाने लाभदायकच ठरला.  महाराष्ट्रातील काँग्रेस संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने यशवंतरावांना पुढच्या काळात जी उपाययोजना करायची होती, त्या दृष्टीनेही वातावरण बनवण्यास याचा मोठाच उपयोग झाला.... महाराष्ट्रातील जुन्या काँग्रेस नेत्यांबद्दल त्या काळी सर्वसाधारणतः अप्रीती निर्माण झालेली होती.... काँग्रेसमध्ये नवे रक्त आणण्याचीच आवश्यकता होती.  यशवंतरावांना नंतरच्या काळात तसा निर्णय करावा लागला.  निवडणुकीतील पराभवामुळे तो निर्णय करणे त्यांना सुलभ गेले'' ('यशवंतराव-इतिहासाचे एक पान', १७८).