• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ३२

महाराष्ट्र काँग्रेसने यशवंतरावांची निवड नक्की केलीच होती; पण भाऊसाहेब हिरे यांच्या स्पर्धेत विदर्भ व मराठवाडा येथील मते चव्हाणांना कितपत पडतील, याची शंका होती.  विदर्भात पंजाबराव देशमुख यांचा पाठिंबा स्पष्टपणे हिरेंना होता.  यशवंतराव शहाण्णव कुळी मराठा नसल्यामुळे त्यांना विदर्भातील मराठा आमदारांची मते मिळतीलच, याची खात्री नव्हती.  य. दि. फडके यांच्या मते, मालोजीराव नाईक निंबाळकरांनी खास विदर्भात जाऊन यशवंतराव आपले पाहुणे असल्याचा प्रचार केला होता.  ('महाराष्ट्राचे राजकारण' विषयावर शिवाजी विद्यापीठातर्फे झालेल्या चर्चासत्रातील भाषण; दि. १५ ऑक्टोबर, १९८५), पण यशवंतरावांची मुख्य भिस्त मारोतराव कन्नमवार यांच्यामार्फत मिळणा-या मधल्या जातींच्या मतांवर होती.  कन्नमवार तेव्हा स्वतंत्र विदर्भवादी होते; पण बियाणींच्या राजकारणात आपल्याला वाव आणि मान्यता मिळण्याची सुतराम् शक्यता नाही, हे त्यांच्या तोपर्यंत लक्षात आले होते.  फलटणच्या बैठकीनंतर यशवंतरावांचे नेतृत्व प्रभावी ठरल्याचे पाहून ''मी व माझे साथी जरी त्या वेळी स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते होते, तरी यशवंतरावांच्या या पुरुषार्थाने व बहादुरीने आम्हीही प्रभावीत झालो व त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झालो,'' अशा शब्दांत कन्नमवारांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.  पुढे ते लिहितात, ''ते आले.  माझ्याकडेच त्यांचा मुक्काम होता.  त्यांच्या भेटीकरिता कार्यकर्त्यांची रीघ लागली होती.  त्यांच्या सौजन्यपूर्ण, प्रेमळ वागणुकीने व रोखठोक भाषणाने सर्वांना आपलेसे करून घेतले.  सर्वांना आपल्या व्यक्तिमत्त्वाने त्यांनी आकर्षित केले.  थोडक्यात, ते आले, त्यांनी पाहिले व त्यांनी जिंकले.'' ('यशवंतराव अभिनंदन ग्रंथ', ८२)

संयुक्त महाराष्ट्र झाल्यास मराठा-वर्चस्व वाढेल, या भयाने स्वतंत्र विदर्भाची मागणी करणा-यांचा विश्वास यशवंतरावांनी मिळवला.  मराठवाड्यात सावनेरकर, देवीसिंग चौहान वगैरे मंडळींची साथ त्यांनी मिळवली.  अर्थात तरीही महाराष्ट्रात एकंदरीत भाऊसाहेब हिरे यांचेच पारडे जड होते.  चव्हाणांना खरी मदत गुजरात, कच्छ, सौराष्ट्र व मुंबईचे अमराठी आमदार यांच्याकडूनच मिळाली.  मोरारजींनी नाव मागे घेतल्यानंतर त्यांची मते चव्हाणांनाच मिळाली.  कारण हिरे त्यांच्या दृष्टीने स्पष्टपणे शत्रुपक्षात होते, निवडणुकीत हिरे यांना १११ तर चव्हाणांना ३३३ मते मिळाली.  

१ नोव्हेंबर, १९५६ रोजी चव्हाणांनी विशाल द्वैभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.

''महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर यशवंतराव जे स्थानापन्न झाले, त्याचे श्रेय भाऊसाहेबांकडेच जाते.  यशवंतरावांच्या सिंहासनाखाली भाऊसाहेब हि-यांच्या राजकीय जीवनाच्या अस्थी सापडतील.'' अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी या घडामोडींवर भाष्य केले आहे. ('हुंदके', २०१-२).