• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ३४

विरोधी पक्षांचे यश हे तसे संघटितपणाचे व संयुक्त महाराष्ट्र भावनेचे यश होते.  निवडणुकीत यश मिळताच समितीच्या एकजुटीला तडे गेले आणि पुढे यशवंतरावांनीच जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल-कलश आणला, तेव्हा समितीचा दुसरा आधारही कोसळला आणि यशवंतरावांवरील विरोधी पक्षांचे आव्हान दूर झाले.  

निवडणुकीतील अपयशानंतर सावध होऊन यशवंतरावांनी प्रथम आपल्या पक्षावरची आपली मांड पक्की केली.  मराठवाडा प्रदेश काँग्रेस अध्यक्षाच्या पदावर देवीसिंग चौहानांच्या जागी बाबासाहेब सावनेरकरांना बसवले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची सूत्रे मामा देवगिरीकरांकडून काढून नाईक-निंबाळकरांच्या हाती सोपवली.  पश्चिम महाराष्ट्रात पक्षसंघटना पुनरुज्जीवित करण्यासाठी पद्धतशीर आखणी काळजीपूर्वक सुरू करून निवडणूक-अपयशाने आलेली मरगळ झटकून टाकली.

त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वाटा निर्वेध करण्याच्या उद्योगास ते लागले.  संयुक्त महाराष्ट्राचे एकेक विरोधक हेरून त्यांनी त्यांना आपलेसे केले व त्यांचा विरोध येनकेन प्रकारेन मोडून काढला.  मुंबईचे भांडवलदार, मराठी राज्य झाल्यास आपले हितसंबंध दुखावतील, या भयगंडातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करीत होते, विदर्भ व मराठवाडा या अविकसित प्रदेशांना महाराष्ट्रात आपल्या विकासाची उपेक्षा होईल, अशी भीती वाटत होती; मोठे महाराष्ट्र राज्य झाल्यास मराठे वरचढ होतील आणि वरचे ब्राह्मण व खालचे हरिजन यांच्यावर अन्याय होईल, अशा भीतीपोटी आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राचे पाच लहान राज्यांत विभाजन करावे, अशी सूचना केली होती; ''आम्हा ब्राह्मणांना मुंबई तरी राहू द्या, महाराष्ट्रात आम्हाला जिवंतसुद्धा राहणे कठीण होईल'', या भाऊ भोपटकर यांच्या विधानातून (उद्धृत, 'पथिक - २', ५३८) मराठी उच्चवर्णीयांचे भयकल्पन व्यक्त होत होते.  यशवंतरावांनी या सर्वांच भयनिरसन करण्याचा कसून प्रयत्न केला.

आपल्या कर्तबगारीच्या बळावर यशवंतरावांनी द्वैभाषिकाचा कारभार कार्यक्षम बनवला.  आपल्या समर्थकांप्रमाणेच विरोधकांच्याही मनांवर आपल्या प्रामाणिकपणाचा व सद्भावनेचा ठसा बसवला.  आधीच्या राज्यकर्त्यांपेक्षा आपला दृष्टिकोन समूळ निराळा असून प्रश्नांचे स्वतःस नेमके भान आहे, याची साक्ष त्यांनी आपल्या वर्तन-व्याख्यानांमधून दिली.  एकाहून एक बलदंड असलेल्या विरोधी पक्षनेत्यांना त्यांनी आपल्या संयत शैलीने जवळ ओढले.  त्यांच्या रचनात्मक सूचनांचे स्वागत केले.  प्रशासन स्वच्छ व गतिमान करण्याचा कसोशीने प्रयत्न केला.  बहुजनीन (कॉस्मोपॉलिटन) बहुरंगी मुंबईचे मनही त्यांनी जिंकून घेतले.  शेतकरी संस्कृतीतून आलेला पुढारी औद्योगिक संस्कृतीच्या अडचणी आस्थेवाईकपणे समजून घेतो, 'शेतक-याचा पोर' ही प्रतिमा घेऊन सत्तेवर आलेला हा नेता बड्या भांडवलदारांच्या भपकेबाज मेजवान्यांमध्येही न बुजता सहजपणे वावरतो, आणि मराठी बहुजनसमाजाच्या हाती सत्ता जाऊनही आपले हितसंबंध अबाधित राहू शकतात, असा त्रिविध प्रत्यय आपल्या वागणुकीतून व कारभारातून चव्हाणांनी भिन्नप्रदेशीय वरचढ वर्गांना आणून दिला.  या वर्गाचा विश्वास त्यांना संपादिता आला नसता, तर कदाचित संयुक्त महाराष्ट्र होऊच शकला नसता; कारण मुख्य विरोध त्यांचाच होता.