यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ७३

ह. रा. महाजनी यांनी यशवंतरावांच्या यशाची मीमांसा करताना लिहिले आहे की, “आंदोलनात (संयुक्त महाराष्ट्राच्या) त्यांची खरी कसोटी लागली. लोकमताच्या प्रवाहाविरुद्ध जाण्याला विचारांचे बळ असावे लागते. आपल्या वैचारिक भूमिकेवर ठाम श्रद्धा असल्याखेरीज हे बळ अंगी येत नाही. या दिव्यातून पार पडल्यानंतर महाद्विभाषिकाचे सतीचे वाण पत्करणे ही दुसरी कसोटी होती. या कसोटीलाही ना. यशवंतराव उतरले. कारण महाद्विभाषिक राबवीत असताना त्यांनी दोन गोष्टी केल्या. त्यामध्ये त्यांच्या अंगी असलेले विचारप्राधान्य आणि मुत्सद्देगिरी हे दोन गुण प्रकर्षाने प्रकट झाले. एक, लोकमताचे वास्तव स्वरूप कधीही दृष्टीआड केले नाही व त्याला तुच्छ लेखले नाही, किंवा त्याचे फाजील लाड केले नाहीत. लोकमत विरोधी आहे हे सत्य ओळखणे ही बुद्धिवादाची पहिली पायरी. पण ते विरोधी आहे म्हणून बदलून घेण्याची खटपट करावयाची नाही असा याचा अर्थ होत नाही. द्विभाषिक राबवणे याचा अर्थ लोकमत बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे असा होता. यापुढची पायरी म्हणजे असा प्रयत्न करूनही लोकमत बदलले नाही तर आपला प्रयत्न अयशस्वी झाला अशी प्रांजल कबुली देणे. स्वपक्षातील आपल्या सर्वश्रेष्ठ नेत्यांना आपले स्पष्ट मत सांगण्यासही तितकेच धैर्य लागते. – ना. यशवंतरावांनी घेतलेल्या ठाम बुद्धिवादी भूमिकेचा हा महान् विजय आहे.” (श्री. यशवंतराव चव्हाण – अभिनंदन ग्रंथ, पृ. ५९).

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांसंबंधी कोणती मते होती याची कल्पना, यशवंतरावांनी जयंत लेले यांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाली असून, ती नमूद करणे उचित होईल. या मुलाखतीवरून असे दिसेल की, शंकरराव देव यांच्यासंबंधी यशवंतरावांची मते संमिश्र स्वरूपाची होती. देव, गाडगीळ व जेधे यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची बांधणी करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. परंतु शंकरराव देव यांची कार्यपद्धती आपल्याला पसंत नव्हती हे त्यांनी स्पष्ट केले. नंतर ते सांगतात की, काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांना नाशिकच्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास सांगितले होते, पण सरदार पटेल यांनी टंडन यांना पाठिंबा दिला व नेहरूंनी कृपलानी यांना. यामुळे आपला पराभव झाला असे देव यांचे म्हणणे होते. त्यांना महाराष्ट्र वगळल्यास कोठूनही मते मिळाली नाहीत. यानंतर देव यांनी काँग्रेस सोडली. यशवंतराव म्हणतात की, काँग्रेस सोडल्यानंतर नेहरू व सरदार यांना नेते म्हणून मानायला देव तयार नव्हते. काँग्रेस लोकप्रिय करायची असेल व सर्वोदयी तत्त्वांनुसार चालवायची असेल तर या दोघांचे नेतृत्व सोडले पाहिजे, अशी देव यांची धारणा झाली होती. पण काँग्रेसजनांना हे अमान्य होते. तरीही आम्ही देव यांचा मान राखत होतो व आदर दाखवत होतो. आमच्या सल्लामसलतीत व निर्णयप्रक्रियेत देव यांना सहभागी करून घेत होतो. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाबाबत मतभेद होऊ लागले आणि यशवंतराव सांगतात की, १९५३-५४ पासून आपण तरी देव यांना आपले नेते मानण्याचे सोडले होते. त्या काळात शंकरराव यांनी नेहरू व पटेल यांना ते नेते मानत नसल्याचे सांगितले त्यावर आपण शंकरराव देव यांना मानत नाही, असे एकच वाक्य काँग्रेसच्या बैठकीत बोललो. यामुळे खळबळ उडाली होती अशी माहिती दिली.

काकासाहेब गाडगीळ यांच्यासंबंधी यशवंतराव म्हणाले की, प्रथमपासून काका संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाबाबत सुसंगत भूमिका घेत होते. तसेच ते जे बोलत त्यात बदल करत नसत. देवांप्रमाणे त्यांची मते इतर प्रश्नांबाबतही होती असे नाही. नेहरूंनी त्यांना ५२ नंतर मंत्रिमंडळात स्थान दिले नाही यामुळे नेहरू सरकारबद्दल ते निराश झाले होते. पण कोणत्याही प्रश्नासंबंधी त्यांची मते स्पष्ट असत व सुसंगतही असत. महाराष्ट्राच्या राजकारणातील काकासाहेबांची कामगिरी, देव यांच्याइतकीच लक्षणीय होती. ते कडवे देशभक्त, त्यागी, उत्तम वक्ते होते. त्यांना वाङ्मयीन विषयाची आवड होती. त्यांनी अनेक विषयांवर पुस्तके लिहिली. काकासाहेब द्वैभाषिकाच्या विरुद्ध होते व आपणही होतो असे सांगून यशवंतराव म्हणाले की, आम्हां दोघांना महाराष्ट्र काँग्रेसमध्ये द्वैभाषिकाचा ठराव मांडण्यास सांगण्यात आले. मग काकांनी ठराव मांडला व आपण दुजोरा दिला. द्वैभाषिकाचा ठराव मांडल्यानंतर ते राबवण्याची जबाबदारी घेण्याऐवजी संयुक्त महाराष्ट्राचा आग्रह धरावा अशी काकांची भूमिका होती, पण ठराव केला तर द्वैभाषिक राबवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशी आपण भूमिका घेतली. द्वैभाषिकाच्या मंत्रिमंडळात भाऊसाहेब हिरे यांना आपण घेतले नाही, हे काकांना पसंत नव्हते. पण आपण त्यांचा आशीर्वाद मागायला गेलो असता त्यांनी तो दिला.