महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एस. एम. जोशी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तिनिमित्त प्रसिद्ध झालेल्या अभिनंदन ग्रंथात, यशवंतराव व एस. एम. यांनी लिहिलेले लेख दोन्ही नेत्यांच्या एकमेकांबद्दलच्या भावना आणि त्यांनी दाखवलेले कर्तृत्व यांवर प्रकाश टाकणारे आहेत. यशवंतरावांनी लिहिले, “मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना ते (एस. एम.) विधानसभेत विरोधी पक्षाचे नेते होते व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचेहि ते धुरीण होते. विधानसभेतील त्यांच्या भाषणामुळे चर्चेची पातळी नेहमी वरची राहत असे. विरोध करताना कणखरपणे विरोध करूनहि त्यांनी निष्कारण कटु शब्द वापरले नाहीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी विधानसभेचे व्यासपीठ कुशलतेने वापरूनहि संसदीय प्रथांचा भंग होऊ दिला नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचेहि नेतृत्व त्यांनी अशाच कौशल्याने केले. पण समितीसारख्या आघाडीच्या राजकरणात यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या मात्र त्यांच्याजवळ नाहीत. त्यांना कशाचा लोभ नाही. तत्त्वासाठी सर्वार्पण करण्यातच त्यांना आनंद वाटतो. असा त्यांचा स्वभाव असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे काम संपल्यानंतर त्यांचे समितीमधील नेतृत्वहि संपुष्टात आले. ते काही असले तरी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करून त्यांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक कार्य केले आहे, असे मला वाटते. समितीच्या काळात ते विरोधी पक्षाचे नेतृत्व करीत असले तरी त्यांच्या मूलभूत भावनांशी मी सहमत होतो. कोणताहि पूर्वविचार न करता जणू आमच्यामध्ये एक प्रकारचा समझोता झाला असे आमचे संबंध त्या वेळी प्रस्थापित झाले होते.”
याच अभिनंदन ग्रंथात एस. एम. यांनी ४ सप्टेंबर १९५९ रोजी त्यांच्या पत्नी ताराबाई यांना लिहिलेले पत्रही समाविष्ट केले आहे, त्यात एस. एम. लिहितात, “या वेळी (प्रतापगड मोर्चाच्या वेळी) आंदोलन शांततामय राहील किंवा नाही, याबद्दल मला मात्र शंका वाटत होती. कारण समितीमध्ये पूर्वीसारखा एकोपा नाही आणि केरळातील राज्य गेल्यामुळे कम्युनिस्ट कसे वागतील याबद्दल चिंता वाटत होती. आज कलकत्त्यात जे प्रकार घडत आहेत ते पाहिले म्हणजे माझी भीति अकारण होती असे म्हणता येणार नाही. तरीहि सर्व विचार करून ते साहस करण्याचे मी योजले होते. या प्रकरणामध्ये यशवंतराव मात्र मुत्सद्देगिरीने वागले असेच मला वाटते. त्यांना ‘मराठा’कारांनी कितीहि नावे ठेवली तरी त्यांनी अतिशय हुशारीने पावले टाकली. सहासात महिन्यांखाली माझे व त्यांचे जे बोलणे झाले ते मी तुला सांगितले होते. जवाहरलालजींना त्यांनी आपले मनोगत सांगितले होते. या वर्षअखेर काहीतरी निर्णय होईल अशी त्यांची उमेद होती. त्यामुळे १ नोव्हेंबरपर्यंत लढा वगैरे करू नये, असे ते म्हणत होते, ते त्यांना बरोबर वाटत असावे. तसे त्यांनी बोलून दाखवले नाही. परंतु मी त्यांच्या बोलण्याचा भावार्थ समजलो. त्यांना त्यांचे श्रेय दिलेच पाहिजे.
‘विदर्भातील जनतेला आवाहन’ हा लेख मी नागपूरच्या ‘तरुण भारत’ला पाठवला आहे. ‘साधने’तही प्रसिद्ध झाला आहे. विदर्भातील जनतेचे मन वळवण्याचे कार्य यशवंतराव करीत आहेत, ते आपलेच काम आहे. आणि आपली जबाबदारी आहे. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने तो लेख लिहिला आहे.” (एस. एम. जोशी गौरव ग्रंथ, पृ. १४३-४४)
त्या वेळच्या सर्व घटनांचा विचार आता शांत चित्ताने केल्यास यशवंतराव व संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते विशिष्ट मर्यादा सांभाळून वागत होते आणि उघड व अंतस्थ योजना न करूनही, त्यांनी एकच उद्दिष्ट गाठण्यात यश मिळवले असे म्हटले पाहिजे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या समंजस धोरणामुळे इतर काही राज्यांत घडले तसे उग्र हिंसक प्रकार झाले नाहीत. हा प्रश्न हाताळताना पंडित नेहरू व इतर काँग्रेसश्रेष्ठी यांनी वेळीच उदारता दाखवली असती आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वाने धरसोडीचे वर्तन केले नसते, तर आंदोलन लवकर संपुष्टात आले असते. त्याचप्रमाणे लोकभावना तीव्र झाल्या असताना मोरारजीभाईंऐवजी यशवंतराव मुख्यमंत्री असते तर इतके बळी गेले नसते आणि लोक प्रक्षुब्ध झाले नसते असे वाटले, तर ते वावगे ठरणार नाही. एस. एम. व यशवंतराव यांना श्रेय जाते तसेच कम्युनिस्ट पक्ष आगीत तेल ओतील ही भीतीही व्यर्थ ठरल्यामुळे त्यासही श्रेय दिले पाहिजे. बी. टी. रणदिवे यांच्यासारख्या अतिजहाल कम्युनिस्ट नेत्याने, सरकारशी पूर्ण असहकार करून विधिमंडळाचे कामकाजही होऊ द्यायचे नाही, अशी सूचना केली असली तरी भाई डांगे यांच्यामुळे कम्युनिस्ट पक्षाने ती स्वीकारली नाही, हेही नमूद करणे अगत्याचे आहे.