यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - १९

जनमामसावर गांधीजीचा इतका प्रभाव पडण्याचे रहस्य काय ? याचे उत्तर रवीन्द्रनाथांनी एका कवितेत दिले होते. त्या कवितेचे मराठी रूपांतर डॉ. उत्तमराव पाटील यांनी त्यांच्या
‘क्रांतिपर्व’ या बेचाळिसच्या स्वातंत्र्य संग्रामातील अनुभव कथन करणा-या पुस्तकात दिले आहे. रवीन्द्रनाथ लिहितात :
             
हजारो दलितांच्या झोपड्यांशी तो थांबला
त्याचा पेहराव त्यांच्या पेहरावासारखाच होता
तो बोलत असलेली भाषा त्यांचीच होती.
ग्रंथवाचनातील सत्य त्यांना माहीत होते, पण उभे होते मूर्तिमंत सत्य.
तो जनतेशी एकरूप झाला
जनताही म्हणू लागली
किती शोभून दिसते त्याला हे नाव.
सर्व भारतीय माझ्याच हाडामासांचे आहेत असे त्याच्याखेरीज कोणाला वाटले ?               
भारतीय जनतेच्या द्वारापाशी जेव्हा मूर्तिमंत सत्य उभे राहिले, तेव्हा ते
दार सताड उघडले गेले.                                                                                                          
गांधीजीच्या हाकेसरशी देश जागृत झाला.
आयुष्यातील फार मोठे स्वप्न मी बघितले. मस्तक अधोवदन झाले.
 
गांधींच्या या आंदोलनांमुळे देशाच्या राजकारणातील कोंडी संपली. यापूर्वी बंगालच्या फाळणीला विरोध करताना बहीष्काराचा मार्ग स्वीकारला गेला होता. पण तो एका प्रांतापुरता मर्यादित होता. तसाच तो मर्यादित ठेवायचा की, देशभर त्याचा अवलंब करायचा यासंबंधी काँग्रेसमध्ये जहाल व नेमस्त यांच्यात मतभेद होऊन,१९०७ साली सुरतच्या अधिवेशनात काँग्रेस फुटली. या स्थितीत सरकारकडून आपली स्वातंत्र्याची मागणी मान्य करून घेण्याचा मार्ग कोणता, हा प्रश्न होता आणि कोणत्याच पुढा-याकडे याचे उत्तर नव्हते. ते गांधींनी दिले आणि साहजिकच देशाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले.
महात्माजींची ही चळवळ चालू असली तरी सरकारविरोधी प्रयत्नांना दुसरीही दिशा यापूर्वीच मिळाली होती. गांधींनी वीस साली सुरू केलेली चळवळ, चौरीचौरा इथे पोलिसांना ठार मारले गेल्यामुळे मागे घेतली गेली, हे अनेकांना पसंत पडले मव्हते. यामुळे अनुशीलन या बंगालमधील क्रांतिकारी संघटनेचे पुनरूज्जीवन झाले आणि हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन अशी संघटना स्थापन होऊन, कानपूरमध्ये तिचे अधिवेशन झाले. नंतर काकोरी इथे रेल्वेच्या गार्डाकडील रक्कम लुटण्यात आली. सोव्हिएत युनियनच्या सरकारतर्फे मानवेन्द्रनाथ रॉय, आशियाई देशांत कम्युनिस्ट कार्यकर्ते तयार करण्यासाठी एक शिक्षणसंस्था चालवत होते. त्याप्रमाणे भारतातही कम्युनिस्ट आंदोलन सुरू व्हावे म्हणून प्रयत्न करत होते. कम्युन्स्ट पक्षाची स्थापना १९२५ साली झाली. त्याच वर्षात रॉय यांच्यासह डांगे, मुजफ्फर अहमद प्रभृतींवर सरकारने खटला भरला. कानपूर इथे कट केल्याचा त्यांच्यावर आरोप होता म्हणून हा कानपूर खटला या नावाने ओळखला जातो. रॉय परदेशात असल्यामुळे त्यांना व इतरही हजर नसलेल्या आरोपींना वगळून चार आरोपींवर खटला चालवण्यात आला. आरोपींना शिक्षा देण्यात आली आणि रॉय भारतात परतल्यावर त्यांच्यावरही खटला होऊन सहा वर्षाची शिक्षा दिली गेली. याच काळात कामगार चळवळही मूळ धरत होती. अमेरिकेतल्या मंदीची झळ भारतासही लागून कामगार चळवळ अधिक संघटित होण्याचा धोका असल्याची सरकारची खात्री झाली. ब्रिटिश सरकार व व्हाइसरॉय अर्विन यांच्या घोषणेस या घडामोडीही कारणीभूत झाल्या होत्या.
 
गांधींच्या चळवळीमुळे कराड शहरात व तालुक्यात रोज प्रभातफे-या, भाषणे इत्यादी कार्यक्रम उत्साहाने होत होते. त्या अनेक कार्यक्रमांचे वृत्तान्त यशवंतराव ‘एक बातमीदार’ या नावाने ‘ज्ञानप्रकाश’कडे धाडत असत व ते प्रसिध्द होत असत. काकासाहेब गाडगीळ यांचेही भाषण झाले आणि ते गाजले. प्राज्ञपाठशाळेचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांनी कराडमध्ये आठदहा दिवस मुक्काम करून रोज भाषणे दिली. त्यांनी स्वराज्याचा अर्थ विशद करून सांगितला आणि त्यासाठी चाललेल्या आंदोलनाचे महत्त्वही स्पष्ट केले. त्यांच्या भाषणांचा आपल्यावर फार परिणाम झाला असे सांगून, त्यांतील काही वाक्ये आपल्या कायमची लक्षात राहिल्याची आठवण यशवंतरावांनी नमूद केली आहे.