यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - १८

१९२९ साली लाहोर इथे रावी नदीच्या काठी, काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली होऊन संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर करण्यात आला. देशभर व विशेषत: तरूण पिढीवर या ठरावाचा मोठा परिणाम झाला. तसा तो काराडमध्ये यशवंतराव व त्यांचे मित्रमंडळ यांच्यावर होणे अपरिहार्य होते. त्यांनी मग प्रतिज्ञापत्र तयार करून ते जाहीर सभेत वाचण्याचा निर्णय घेतला. ते प्रतिज्ञापत्र आपण लिहिले व त्यावर राम गणेश गडकरी यांच्या भाषेचा प्रभाव होता, असे यशवंतरावांनीच नमूद केले आहे. २६ जानेवारी १९३० ची सकाळ उजाडली आणि कराडमध्ये जाहीर सभेत देशसेवेचे व संपूर्ण स्वातंत्र्याच्या काँग्रेसच्या ठरावास पाठिंबा देणा-या पत्राचे वाचन झाले. देशातील राजकीय वातावरण बदलले होते, त्याचा परिणाम विविध जातीजमातींवर कसा होत होता याची कल्पना यशवंतरावांनीच दिली आहे. कराडमधील भोई, कोष्टी, शिंपी समाजातल्या तरूणांत राष्ट्रीयत्वाचे वातावरण निर्माण झाले होते, पण मुसलमान तटस्थ तर अस्पृश्य उदासीन होते. कराडच्या आसपासच्या खेडेगावांतही सर्वसामान्य शेतकरी, नव्या वातावरणात होणा-या सार्वजनिक हालचालीत कितपत भाग घ्यावा याबद्दल साशंक होते. याचे कारण काय, असे विचारल्यावर यशवंतरावांचे भाऊ गणपतराव यांनी उलट सवाल केला की, शेतक-यांनी तुमच्या असहकाराच्या चळवळीत का यावे? त्यांचे जे प्रश्न आहेत त्या संबंधात त्यांना सरकारच्याच दाराशी जावे लागते. त्यामुळे असहकाराबद्दल त्यांना उत्सुकता वाटण्याचा संभव कमी. तुम्ही कधी त्यांच्याकडे जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेतले नाहीत. यशवंतरावांना यामुळे नंतरच्या काळात वेगळे वळण लागले, पण ३० सालच्या सुमारास आलेला अनुभव, हा त्यामागे बीजरूप होता असे मानता येईल.
 
महात्मा गांधीनी या वेळी मिठाच्या सत्याग्रहाची हाक दिली आणि १२ मार्च१९३० रोजी गुजरातमधील दांडी या गावाच्या दिशेने मोर्चा सुरू केला. मिठाबाबतचा सरकारी कायदा तोडण्यासाठी ही यात्रा होती. त्या आधी राजकीयदृष्ट्या अनिश्चतता होती व ती सरकारने निर्माण केली होती. सायमन आयोगाचा अहवाल प्रसिध्द व्हायचा होता आणि ज्या गोलमेज परिषदेची घोषणा सरकारने केली होती ती वसाहतीचे स्वातंत्र्य दोण्यासाठी होणार नसून लोकमत स्पष्ट होऊन सरकारने कोणत्या दिशेने जावे याचे दिग्दर्शन करण्यासाठी भरेल असे व्हॉइसरॉय लार्ड अर्विन यांनी जाहीर केल्यामुळे लोकांचा अपेक्षाभंग झाला. यावर महात्मा गांधींनी सरकारकडे चौदा मागण्यांचा खलिता पाठवला. त्यात सरकारी बड्या अधिका-यांच्या पगारात कपात, राजकीय राजबंद्यांची सुटका, लष्करावरील खर्च कमी करणे आणि मिठावरील कर रद्द करणे यांचा समावेश होता. या मागण्या अमान्य झाल्यास असहकाराची चळवळ सुरू होईल, असे गांधीनी जाहीर केले होते. मागण्या अमान्य झाल्या आणि म्हणून गांधीनी साबरमती आश्रमापासून दांडी यात्रेला सुरूवात केली. गांधीच्या या दांडी यात्रेने देशभर सत्याग्रहाचे वातावरण तयार होऊन हजारो लोक तुरूंगांत गेले. अनेकांनी सरकारी नोक-या सोडल्या, तर सरकारी शिक्षणसंस्थांवर बहिष्कार घालण्याचीही लाट उसळली. यातून मग राष्ट्रीय शिक्षणासाठी शाळाच नव्हे,तर महाविद्यालयेही होते. परदेशी वार्ताहरांच्या वार्तापत्रांमुळे अनेक देशांत या सत्याग्रहाची माहीती पसरत होती. विल्यम शिरर या अमेरिकन वार्ताहराने नंतर दांडीयात्रेतील अनुभवांवर एक पुस्तक लिहिले.

महात्मा गांधीच्या या व आधीच्या आंदोलनांमुळे आणि ग्रामीण भागातील अगदी सामान्य लोकांच्या प्रश्नांना त्यांनी हात घातल्यामुळे, देशात नवे नेतृत्व उद्याला आल्याची भावना सर्वत्र पसरली. वीस सालापूर्वीच्या आंदोलनांमुळे लोकमान्य टिळकांनी, गांधी हेच देशाचे भावी नेते असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यांनी आपल्या काही अनुयायांना असे सांगितले की, यापुढे गांधीबरोबर आपण सहकार्य करू आणि समजा, एखाद्वेळी त्यांच्याशी मतभेद झाला तरी आपण त्याची वाच्यता करणार नाही. देशाच्या कानाकोप-यांत गांधीजीनी एक नवी आशा निर्माण केली. याचे पडसाद अनेक भाषांतल्या साहित्यातही उठू लागले. माधव जूलियन व विठ्ठलराव घाटे यांनी ‘मधुमिलिंद’ या जोडनावाने प्रसिध्द केलेल्या काव्यसंग्रहात ‘तो पहा महात्मा आला’ , या मथळ्याची कविता आहे. त्या कवितेतील कल्पना अशी की, आसामच्या चहाच्या मळ्यात काम करणारा कामगार मरण पावल्यावर, त्याची पत्नी आपल्या लहान मुलास सांगते की, ही काळरात्र संपेल. आपले मूल हे तुमच्या आंदोलनातील एक शिपाई होईल असे ती गांधीजींना आश्वासन देते. ती अखेरीस आपल्या मुलाला म्हणते :

ते गेले आत्मा गेला तेव्हाच स्वर्ग लोकाला
हा देह राहिला तुजला द्यावया महात्माजीला
हो शूर शिपाई राजा, गांधीच्या सैन्यामधला
हा जीव मम ठेवा
तुज अर्पण गांधीदेवा
उध्दरा आम्हां गरिबाला,
तो पहा महात्मा आला.