• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ३३

गणपतराव क्षयाने आजारी, आईचे वय वाढत गेलेले आणि वेणुताई आजारी; घरात मिळवते कोणी नाही. गणपतरावांना औषधोपचार झाला नाही तर त्यांचे कसे होणार, ही काळजी होती. म्हणून मग यशवंतरावांनी किसन वीर यांच्याशी चर्चा करून घरच्या परिस्थितीची कल्पना दिली. ते म्हणाले, की तुम्ही पॅरोल वाढवून घ्या आणि घर सांभाळा, आम्ही चळवळीचे काम करू. यशवंतरावांनी केलेल्या अर्जाचा विचार झाला आणि पॅरोल वाढवून देण्याऐवजी त्यांची स्थानबध्दताच रद्द करण्याचा आदेश गृहखात्याने दिला कारण तोपर्यंत सरकारी वर्तुळात भारतासंबंधी काही वेगळा विचार सुरू झाला होता आणि आंदोलनाची उग्रता केव्हाच संपली होती; पण सातारा जिल्ह्याने मात्र चळवळीची मशाल पेटती ठेवली होती. सातारा जिल्ह्यातल्या चळवळीचे वैशिष्ट्य हे होते की, त्या जिल्ह्यात अनेक कार्यकर्ते पूर्वापार सक्रिय होते आणि त्यांचे पुढारी होते. कराड इत्यादी भागात यशवंतराव होते. कोल्हापूर भागात रत्नाप्पा कुंभार, तर कुंडल इत्यादी भाग नाना पाटील यांचा होता. शिवाय किसन वीर, वसंतदादा इत्यादी होतेच. आंदोलनांच्या पुढा-यांत विचारविनिमय होत होता असे नाही. प्रत्येकाने आपल्या भागातल्या परिस्थितीत जे योग्य ते कार्य चालू ठेवून सरकारी कारभार सुरळीत चालणार नाही हे पाहिले होते. अच्युतराव पटवर्धन हे मुंबईत असत आणि सातारा जिल्ह्यातले काही कार्यकर्ते त्यांच्याशी विचार विनिमय करून येत. आंदोलन वाढत गेले, पण त्यासाठी आर्थिक पुरवठा करण्यास मर्यादा असल्यामुळे तुमची सोय तुम्ही करा, असे अच्युतरावांनी सांगितल्यामुळे प्रत्येक जण तसा स्वतंत्र झाला होता. सातारा जिल्ह्यात उठाव करणारे चार ते पाच गट होते. यांपैकी ज्यांनी पत्रीसरकार स्थापन करण्यात भाग घेतला होता, त्यांच्यात यशवंतराव नव्हते. सरकारी मालमत्ता नष्ट करावी, खाजगी नव्हे अशी एक मर्यादा त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी घालून घेतली होती आणि व्यक्तीगत हिंसा टाळण्याचे धोरण स्वीकारले होते.

या काळात नाना पाटील आणि इतर पुढा-यांना पकडण्यासाठी सरकार जितकी शिकस्त करत होते, तितके लोक या पुढा-यांना व कार्यतर्त्यांना अधिक देत होते. यामुळे या सर्वाभोवती एक वलय तयार झाले. त्यातही नाना पाटील यांच्याभोवती विशेष. या सर्वांनी सातारा जिल्ह्याचे वातावरणच त्या आंदोलनाच्या काळात बदलून टाकले. राजकीय कार्यास शाहीर निकम हे पोवाड्यांची साथ देऊन लोकांत उत्साह निर्माण करत होते. हे पोवाडे व कविता ग. दि. माडगूळकर यांच्या होत्या, हे कालांतराने निकम यांनीच एकदा जाहीर केल्यामुळे समजले. ग. दि. माडगूळकर यांनी त्या दिवसांचे वर्णन ‘मंतरलेले दिवस’ असे केले होते. त्यासंबंधीच्या लेखात त्यांनी बेचाळीसच्या आंदोलनाच्या अखेरच्या पर्वात, शाहीर निकम यांच्या व जी. डी. लाड यांच्या विवाहसोहळ्याचे वर्णन केले आहे.

हे दोघेही अण्णा माडगूळकरांचे जुने दोस्त. त्यांच्या विवाहासाठी ते कोल्हापूरहून कुंडलला गेले होते. गावक-यांनी कडेकोट बंदोबस्त करून या दोघा नवरदेवांचा पोलिसांचा उपद्रव होणार नाही अशी व्यवस्था केली होती. काही हजार लोक जमले होते. माडगूळकर सांगतात की, निकम याचा विवाह सकाळी झाला तर लाड याचा संध्याकाळी. जी. डी. लाड नेहमीच्या वेषात होता. त्याची वाग्दत्त वधू उठली. तिच्या हातात एक दुधारी खंजीर होता. किटसन दिव्याच्या अपु-या प्रकाशात, एखाद्या शस्त्रधारिणी देवतेसारखी ती दिसत होती. समारंभ कुठल्या पध्दतीने होणार हे कोणालाच माहीत नव्हते. सर्वांच्या दृष्टी त्या तरूण जोडप्यावर खिळल्या होत्या. वधूने सुताची एक माळ वराच्या गळ्यात घातली. धीम्या गतीने हातातल्या खंजिराने तिने आपल्या तळव्यातले, लालभडक रक्त काढले. वराच्या कपाळावर त्याचा टिळा लावला. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ‘इन्किलाब झिंदाबाद’ची आरोळी उठली. लग्न लागले—

कुणीतरी मला चार शब्द बोलण्या सांगितले. मी काय बोलणार ? माझी वाचाच गोठली होती. उठलो. व्यासपीठावर उभा राहिलो. कुठून कोणास ठाऊक, काव्याच्याच ओळी माझ्या जिभेवर आल्या :

कृष्णाकांठी नव्हते कुंडल, अतांहि नाही
अंग चोरून, दुरून वाहते ती कृष्णामाई
गोविंदाग्रज कवी आपुल्या भगिरथ हातांनी
कुंडल गांवी तिचे आणि आणिती तीर्थरूप पाणी
तुम्हां आम्हां नव्हता कळला हा त्यांचा खेळ
आज उमगला परी तयांच्या शब्दांचा खेळ’