• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - २५

शंकररावांची व यशवंतराव यांची कुंडली जमणारी नव्हती आणि पुढील काळातही ती जमली नाही. आश्रमाचे वातावरण व जीवनही त्यांच्या विचारांशी व वृत्तीशी जुळणारे नव्हते. विसापूरच्या कारागृहात गांधीवाद ही आपली जीवननिष्ठा आहे असे आपण म्हणू शकत नाही, हे यशवंतरावांनी स्पष्ट केले होते. या संदर्भात तीस सालच्या चळवळीच्या काळात, भारताच्या निरनिराळ्या भागांतील राजकीय कार्यकर्त्यांत व पुढा-यांत कशा प्रकारचे विचारमंथन चालू होते, याची माहिती करून घेणे युक्त होईल.

तुरूंगात गांधीवाद, समाजवाद, कम्युनिझम इत्यादी विचारपंथांचे लोक एकत्र आले होते. त्यांच्यात चर्चा होत असत. बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ता असे मानत होता की, इंग्रज राजवटीशी संघर्ष करायचा असून महात्मा गांधी या संघर्षाचे नेते आहेत, त्यांचा आदेश मानणे हे आपले कर्तव्य. त्या पलिकडे वैचारिक वादविवादात पडणे व्यर्थ आहे. परंतु अनेक तरूण कार्यकर्ते व नेते वेगळा विचार करत होते. गाधीनी देशाला नेतृत्व देऊन नवा मार्ग दाखवला हे खरे असले, तरी स्वातंत्र्याचे उद्दीष्ट साध्य झाल्यावर कोणत्या प्रकारचा समाज हवा, याचे चित्र आपल्यासमोर असले पाहिजे. किंबहुना, असे चित्र नसेल तर उद्दीष्ट साध्य करण्यात अडचणी येऊ शकतील, असे या मंडळींना वाटत होते. शिवाय गांधीजी आध्यात्मिक विचारांना प्राधान्य देत होते; त्याविषयी साशंकता होती. इतकेच नव्हे, तर सामाजीक व आर्थिक पुनर्रचनेच्या गांधींच्या कल्पना तशाच्या तशा स्वीकारून चालेल काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला होता. यांत जवाहरलाल नेहरू, आचार्य नरेन्द्र देव, जयप्रकाश नारायण, अच्युतराव व रावसाहेब पटवर्धन, युसुफ मेहरअली, एस. एम. महाजनी अशी मंडळी होती. यशवंतराव हे त्यांच्यातले सर्वांत तरूण आणि त्या मानाने नवखे होते. परंतु अनुभव, कारागृहातील चर्चा आणि वाचन यांमुळे त्यांच्यावरही याच विचारांचा प्रभाव पडला. तो काळाचा महिमा होता. समाजवादी वाङ्मय भारतात आले होते आणि त्याचा अभ्यास होऊ लागला होता. यामुळे देशाच्या विविध भागांतील विविध व्यक्ती विचारांनी समान पातळीवर आल्या.

या दृष्टीने पंडित नेहरूंच्या आत्मचरित्रातला काही भाग या संदर्भात उल्लेखनीय ठरेल. महात्माजींनी अहिंसा हे एक उच्च धर्मतत्त्व असल्याचे मानले होते व त्यांनी या संदर्भात केलेल्या विवेचनाचा काही भाग, नेहरूंनी आत्मचरित्रात उध्दत केला. नंतर ते लिहितात की, ‘आम्हांला आणि काँग्रेसला अहिंसा हा धर्म वाटला नाही व वाटू शकतही नव्हता. एक धोरण म्हणून अहिंसेचा स्वीकार केला होता. व्यक्ती याचा धर्म म्हणून स्वीकार करू शकेल, पण एक राजकीय संघटना तसे करू शकत नाही.’ यामुळे चौरी चौरा इथे हिंसा होऊन पोलिसांना जाळण्यात आले या कारणस्तव गांधीनी असहकाराची चळवळ बंद करण्याचा निर्णय घेतला; तो नेहरू व इतर अनेक काँग्रेस पुढा-यांना पसंत पडला नव्हता. नेहरू २६-२७ मध्ये युरोपच्या दौ-यावर गेले होते व ब्रसेल्स इथे भरलेल्या पीडित लोकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेस हजर होते. त्या परिषदेत समाजवादी विचारांचे अनेक लोक त्यांना भेटले. शिवाय ते व त्यांचे वडील सोव्हिएत युनियनला धावती भेट देऊन आले. तिथून परतल्यावर त्यांनी उत्तरप्रदेशच्या काँग्रेस संघटनेत सौम्य समाजवादी विचारांचा प्रसार करण्याचे प्रयत्न केले. तीस सालच्या आंदोलनात शेतकरी वर्गातले लोक ब-याच मोठ्या प्रमाणात सामील झाले होते व काँग्रेसने याची विशेष दखल घेण्याची आवश्यकता असल्याचा अभिप्राय नेहरूंनी दिला. तथापि गांधीजींच्या सत्याग्रहाच्या चळवळीचे कम्युनिस्ट पक्ष करत असलेले विश्लेषण चुकीचे असल्याचे नेहरूंचे मत झाले होते.

गांधीजींना प्रतिगामी ठरवणारी काही जहालांची टीका नेहरूंना अमान्य होती. तथापि गांधींच्या विचारांची चिकित्सा झाली पाहिजे या बद्दल त्यांना काही शंका नव्हती. गांधीजींचा सार्वजनिक जीवनावर इतका जबरदस्त प्रभाव होता की, कोणतीही प्रामाणिक टीकाही अशक्य होऊन बसणे नेहरूंना प्रशस्त वाटत नव्हते. असे असूनही ते स्वत: गांधींवादासंबंधात संभ्रमात होते. त्यांनी लिहिले की, भारतातल्या अत्यंत सामान्य लोकांचे प्रश्न हाती घेऊन, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गांधींनी लढा दिला. स्वातंत्र्यासाठी देशात जागृती निर्माण केली. लोकांना या रीतीने जागृत करण्याची अभूतपूर्व शक्ती केवळ त्यांच्यातच होती. असे असूनही गांधीजी काही बाबतीत पूर्णत:चूक करत असले पाहिजेत. गांधींनी रेल्वे, हॉस्पिटले, नवे वैदयक, तारायंत्रे इत्यादींचा त्याग करण्याची शिफारस केली होती. नेहरूंना हे काहीच मान्य नव्हते. श्रीमंतीचा ध्यास व तिचे प्रदर्शन बरोबर नसले तरी गांधी करत असलेले दरीद्री जीवनाचे उदात्तीकरण निरर्थक होते. साधे शेतक-याचे जीवन हेही गांधींना मोठे उदात्त वाटत असे. नेहरू म्हणतात की, “ शेतक-यांना ग्रामीण जीवनातील अनेकविध अडचणींतून बाहेर काढून शहरातल्या साध्या सुविधा मिळवून देण्याची गरज आहे. स्वदेशीचा भक्त सारे जग बदलण्याचे कार्य आपल्या शिरावर घेत नाही, असे गांधीनी लिहिले आहे. मग ते स्वत: जग सुधारण्याच्या मार्गात कसे असतात,” असा प्रश्न नेहरूंना पडला होता. (ऑटोबायोग्राफी, पृष्ठे, ८२,१९०-९१, २५८-९, ३१४-१६)