• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ११८

ही निवडणूक होण्यापूर्वी काँग्रेसमधील डाव्यांनी घटनादुरुस्ती करण्यासाठी नवी घटनासमिती बोलावण्याची मागणी अनेकदा केली होती. इंदिरा गांधींनी ती त्याज्य ठरवली. आपल्याला या प्रकारची मनोवृत्तीच पसंत नसून लोकशाहीला वळसा घालण्यास आपला विरोध असल्याचे त्यांनी जाहीर केले. या प्रकारच्या कम्युनिस्ट पक्षाच्या मागणीला आपण विरोध केला होता तसाच आपल्याच पक्षातल्या काही जणांच्या मागणीला करू असा निर्वाळा त्यांनी दिला. आता लोकसभेत दोन तृतीयांशाहून अधिक संख्या झाल्यावर, इंदिरा गांधींनी घटनेतील एकामागोमाग एक दुरुस्त्या मंजूर करून घेतल्या. त्यांनी अगोदर सर्वसाधारण विमाव्यवसायाचे राष्ट्रीयीकरण केले. त्या अगोदर नेहरूंच्या कारकिर्दीत आयुर्विम्याचे राष्ट्रीयीकरण झाले होते. घटनेत नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांत दुरुस्ती करण्याचा संसदेला अधिकार असल्याची पहिली दुरुस्ती केली व सर्वोच्च न्यायालयाचा अगोदरचा निर्णय बाद ठरवला. सार्वजनिक कारणासाठी कोणतीही मालमत्ता ताब्यात घेण्याचा आणि त्यासाठी किती भरपाई द्यायची हे ठरवण्याचा अधिकारही संसदेला मिळवून घेण्यात आला. घटनेत काही मार्गदर्शक तत्त्वे ग्रथित केली होती, ती सर्वोच्च न्यायालय बदल करू शकत नाही, अशीही दुरुस्ती झाली. या रीतीने घटना समिती न बोलावता अनेकविध दुरुस्त्या झाल्या.

हे घटना दुरुस्तीचे प्रकरण पुढे अधिकच वाढत गेले. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी व त्यांचा काँग्रेस पक्ष पराभूत झाला व त्यात कायदामंत्री हरिभाऊ गोखले हेही पराभूत झाले. त्यानंतर मी गोखले यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की, घटनादुरुस्ती ही आमच्या पक्षाने सवंग बनवली. पिठाच्या गिरणीत एका बाजूने धान्य टाकावे व दुस-या बाजूने पीठ घ्यावे असे आमचे चालले होते; हे सांगून हरिभाऊ गोखले आपल्या हतबलतेची कबुली देत होते.

लोकसभेच्या निवडणुकीतील प्रचंड यशामुळे इंदिरा गांधींचे राजकीय वर्चस्व प्रस्थापित झाले. या पाठोपाठ पूर्व पाकिस्तानात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे नव्या सरकारला म्हणजे इंदिरा गांधींनी, त्या संबंधात सावध होऊन आवश्यक ती तयारी करणे निकडीचे झाले. पाकिस्तानी अधिका-यांच्या व त्यानंतर लष्कराच्या निर्घृणतेमुळे लाखो निर्वासित भारतात येत होते. त्यांची सोय करताना भारताच्या अर्थव्यवस्थेवरील ताण वाढत चालला. निर्वासितांसाठी म्हणून अमेरिका व इतर काही देशांनी मदत केली, ती गरजेच्या मानाने अगदीच थोडी होती. पाकिस्तान काही लष्करी कारवाई करण्याचा संभव असल्यामुळे आपली लष्करी सिद्धता वाढवणे आवश्यक होते.

पूर्व पाकिस्तानी पेचप्रसंग जनरला याह्याखान व झुल्फिकार अलि भुत्तो यांच्या दुराग्रहामुळे वाढत जाऊन पूर्व पाकिस्तानी लोकांनी उठाव केला आणि भारतीय सैन्याला लष्करी हस्तक्षेप करणे अनिवार्य होऊन बसले. त्यातच रिचर्ड निक्सन व त्यांचे सुरक्षा सल्लागार डॉ. हेन्री किंसिंजर यांनी पाकिस्तानला पाठिंबा देऊन भारताविरोधी धोरण अवलंबिल्यामुळे, याह्याखान आणि भुत्तो हे दोघेही अनिर्बंधपणे वागू लागले. या संघर्षात पाकिस्तानचा पराभव होऊन पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान अलग होऊन, बांगलादेश म्हणून नव्या अवतारात वावरू लागले. या युद्धाच्या संबंधात इंदिरा गांधी यांनी दाखवलेल्या राजकीय नेतृत्वामुळे त्यांचे केवळ काँग्रेसमध्ये नव्हे, तर देशातील स्थान बळकट झाले. जनसंघाचे नेते अटल बिहारी बाजपेय यांनी इंदिरा गांधींचा ‘दुर्गा’ म्हणून गौरव केला.

यामुळे काँग्रेस पक्षात इंदिरा गांधींना पर्याय राहिला नाहीच, पण त्यांना काही वेगळ्या प्रकारचा सल्ला देणेही अशक्य होऊन बसले. सरदार पटेल यांचे निधन व राजगोपालचारी यांचा काँग्रेस पक्षाचा त्याग, यामुळे पंडित नेहरू यांची स्थिती अशी झाली होती. परंतु नेहरू हे मुळातच निर्घृण वृत्तीचे नव्हते. त्यामुळे ते पक्षात जितके जमवून घेता येईल तितके घेत होते. नेहरूंनी ठरवले असते तर अनेक वेळा ते कोणाला न विचारता काही धोरणे अमलात आणू शकले असते, पण ते लोकशाही समाजवादी होते. हे केवळ सोयीसाठी पत्करलेले तत्त्व नव्हते तर त्यांची वृत्तीच तशी होती. उलट इंदिरा गांधी या लहानपणातील अनुभवांमुळे संशयग्रस्त बनल्या होत्या आणि असुरक्षिततेची त्यांची भावना पक्की रुजलेली होती. यामुळे बांगलादेशच्या युद्धानंतर आपल्याला कोणी प्रतिस्पर्धी राहिला नाही, यावर समाधान न मानता नव्या परिस्थितीत आपल्याविरुद्ध अधिकच कट व कारस्थाने होऊ लागतील असे त्या मानू लागल्या.

बांगलादेशच्या युद्धाच्या अगोदर ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांशी झालेल्या संघर्षात, आपण डावा कार्यक्रम स्वीकारल्यामुळे यशस्वी झालो असा त्यांचा ग्रह झाला होता आणि त्या काळात काँग्रेसमधील डावे व कम्युनिस्ट पक्ष सोडून आलेले जहाल, यांनी इंदिरा गांधींच्या भोवती कोंडाळे केले. मग आपल्या अधिकारास कसलाच अडथळा येऊन नये यासाठी त्यांनी पक्षाचे शुद्धीकरण सुरू केले आणि राज्यघटना दुरुस्त करून केंद्र सरकारच्या हाती सत्ता अधिकच केंद्रित केली. पक्षात व सरकारात दरबारी वातावरण तयार झाले. ते कसे होते, हे पी. एन. धर यांनी वर्णन केले आहे. ते सांगतात की, दोन प्रकारचे दरबारी असतात. एक प्रकार हा काही कल्पना असलेल्यांचा असतो. हे लोक राष्ट्रीय प्रश्नासंबंधी काही उपाय शोधण्याचा प्रयत्न करून आपले व आपल्या गटाचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्याच्या उद्योगात असतात. असचा एक गृहस्थ होता. तो इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या संस्थेत बराच बेळ खर्च करून, इतरांनी आर्थिक विषयांवर जे लिहिले असेल त्याची गोळाबेरीज करून स्वतःचे विचार म्हणून इंदिरा गांघींना निवेदन देत असे. धर यांना याच गृहस्थाने सांगितले, की इंदिरा गांधींना काही विचारांपेक्षा ते सांगणा-या व्यक्ती महत्त्वाच्या वाटतात. हा गृहस्थ नंतर एका राज्यात मंत्री झाला.