यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ४-०१०२२०१२-२

झालं !  यशवंतराव चव्हाणांचा विजय असो, संयुक्त महाराष्ट्राचा विजय असो, महात्मा गांधी की जय, पं. जवाहरलाल नेहरूंचा विजय असो, यशवंतराव चव्हाण जिंदाबाद.  समितीवाले म्हणायचे अत्रे, डांगे जिंदाबाद.  संयुक्त महाराष्ट्र समितीचा विजय असो.  सारेच सार्‍या घोषणा देत होते.  उत्स्फूर्त अशी सगळ्या गावाची मिरवणूक निघाली.  त्यानं सारं गाव आनंदानं उत्साहानं भरून गेलं होतं.  कुणाचीही जिंदाबाद करायला आम्हा पोरांना आनंदच असायचा.  डोळा लिमलेटच्या गोळीवर असायचा.  धुळीनं भरलेले बोळाबोळातले रस्ते.  कळकटलेली, मळकटलेली आमची लक्तारलेली आयुष्य शिवण्याचा सुईदोरा कोणाकडे होता का ?  गावात लाईट नव्हती.  चौकाचौकात लाकडी खांबावर चौकोनी खोक्यात कंदील लावत ग्रामपंचायतीचा शिवाई हिंडायचा.  त्या मिणमिणत्या लायटीमध्ये लोक रातभर सुकानं झोपायचे.  लोकल बोर्डाच्या दोन खोल्या म्हणजे आमची शाळा.  तशी ती मारुतीच्या देवळातही भरायची.  पिण्याच्या पाण्याचं तर काय सांगू, गावातल्या मायाबहिणी सकाळसंख्याकाह लांबलांबच्या हिरीवरनं पाणी आणत.  पाटलाच्या वाड्यात तेवढी हिर होती.  बाकी सार्‍यांनी रानामाळातनं पाणी आणायचं.  साखर वाटून, लिमलेटच्या गोळ्या वाटून उत्साहानं गावानं सणच साजरा केला म्हणना.  हे सारं बगीत बा टोपल्या वळीत रस्त्याच्या कडंला बसल्याला.  तो येणाजाणारांना इचारीत होता,

'नव्हं, पाटील, ही रेडिव बोलतया ती का खरं आसतया व्हय ?  आवं आता त्यो माणूस बोलत व्होता ती खरं आसतया व्हयं ?'

माणसं एकमेकास्नी टाळ्या मारीत हसायची.  बा आईकडं कसनुसं त्वांड करून बगायचा.

'आग, म्या काय वंगाळ बोलतूया व्हय.  ही मला का हासत्यात.  रेडिव खरं बोलतूया का खोटं ?'

'का कराचं तुमाला.  गप्प बसा झालं.  नसत्या चौकश्या.  शेजारणी आईबाई तुज्या डोस्क्याला कॅस का गं नाही.  कां कराचं आपल्याला.  त्यो कसं बोलतूया.  येवढी माणसं खरं म्हणत्यात नव्हं.  ती संमद्यी शानी हायत नव्हं ?  ती म्हणत्यात खरं तर खरं.  गप वळा म्होरं बगून.'

आईनं बाला गप केला.  पण हीच स्थिती सुप्रिया, सार्‍या गावाची होती.  रेडिव नुकताच आला होता ना गावात.  तुला सांगायचं म्हंजी कंच्याच गावाला तवा वाटा नव्हत्या.  तसं फलटणवरंन निरगुडीला जायला आडंवाट होती.  ह्या गाडंवाटनं बैलगाडी जायला लागली तरी बैलांच्या पायांनी धुरळा उडायचा.  गाडी येतीया हे कोसावनं समजायचं.  नुसता फुफाटाच फुफाटा.  खाचखळगं तर विचारूच नगं. एक पाय खड्ड्यात आन् दुसरा टाकला तरी खड्ड्यात.  खड्ड्यातनं फुफट्यात.  फुफाट्यातनं खड्ड्यात.  एकांदी गाडी यायची.  गाडी म्हणजे मोटार गाडी यायची गं !  कवातरी.  आम्हां गावातल्या पोरांना दोन कोस गाडी असली तरी समजायचं.  वावटळीतली धूळ, पालापाचोळा जसा वर वर जातो ना आभाळाला भिडायला तसं.  गाडी येतीया म्हणलं की धुळीचं लॉटच्या लॉट आभाळात दिसायला लागायचं.  आता बी तसंच झालं.  डाक्टरची एक मोटारगाडी व्हती.  ती कवातरी गिरवीला जायाची निरगुडीवरनं.  आम्ही मिरवणूक झाल्याबरोबर वाटंवरच खेळत व्हतो.  तेवढ्यात आभाळात धुळीचं लॉट दिसायला लागलं.  अंधार पडत होता तिन्हीसांजला.  वावटह तर नसंल ?  आमच्यातला एकजण म्हणाला, 'आली आली, आरं ती डाक्टरची डमडम आली.  तसं आम्ही सारी पोरं वाटनं पळायला लागलो.  जसं गाडी जवळ आली तसं धूळ बी लय उडायला लागली.  गाडी म्होरं गेली आन् तिज्यामागं त्या धुळीत आम्ही पोरं पळत व्हतो.  आत्ताची जोरं नाय का तुमचं हेलीकॅप्टर उडाल्यावर धुळीच्या लोटात नायत्यात तसं खेड्यासारखं आनंदानं.  नाकातोंडात, कानात, डोस्क्यात नुसती मातीच माती.  सारीजण धुळीनं पार माखलो होतो.  गाडी लांब जाईस्तोवर धुळीचा लोट उडत होताच.  लोट संपला.  आम्ही थांबलो.  खेळा, खेळा, भाड्याहो, एक म्हातारा केकाटला.  त्याच्या हातातली काटी बगून आम्ही पळालो.  गवश्यानो आता ह्या वाटंचा रस्ता हुईल.  इकास नाचत ईल.  दुसरा एकजन म्हणाला, म्हंजी काय हुईल गा ?  आरं इकास म्हंजी इकास.  येवढ समजत न्हाय.  आपलं यशवंतराव पुन्यांदी मुख्यमंत्री झाल्याती.  आता सडाक सिमिट कांक्रीटाची हुईल.  दुसरा म्हणाला, लय दांडगी सुय हुईल बाबा.  आरं पायात पायतानं नसत्यात नव्हं गरिबाच्या. लय पायाला चटका बसतुया फुफाट्याचा.  किती पाय उचलावं मानसानं.  पर आता काळजी नाय.  यशवंतराव आला आता बग, इकास हुईली म्हंजी इकास हुईल.  रस्ता, पाणी, लाईट, साळा सारं हुईल.  टोपी म्होरं सरकवीत, 'कसं ?  आगा काड तंबाकु काड.'  म्हातारा म्हणाला, ती योजना म्हंजी काय रं.  यशवंतराव रिडीवात सांगत व्हता नव्हं.  आयला, लय बाबा, आवगड इचारतुयास.

अज्ञानाचा हा डोंगर अंगावर घिवून यशवंतरावांनी महाराष्ट्रासाठी, देशासाठी स्वप्न पाहिलं.  त्यातली काही स्वप्नं तुला सांगायची असं ठरवलयं.  तुला ती आवडतीलच माशाच्या पिल्लाला पाण्यात पोहायला शिकवावं लागत नाही.

आदरणीय बाबांना, सौ. वहिणींना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका