साहेब, आताच्या पिढीने काय करावे ? सामान्य माणूस या सर्वात कसा टिकाव धरणार ?
कठीण आहे. ज्या माणसाचे नावही लोकांना माहीत नसते असे लोक आडनावाने भोसले असले की कसे सत्तेत बसतात हे पाहिले की चक्रावून जायला होते. आणि चिंता आणखीच वाढते.
सुप्रिया, ही स्वगते किंवा आत्मचिंतन खरे तर टेप करायला हवे होते. ते सारे संचित होते. त्यावेळी माझ्याकडे सुविधा नव्हत्या. टेप करता आले नाही पण स्मृतीत जे शिल्लक राहिले ते तुला सांगतो आहे. एका फार मोठ्या वटवृक्षाच्या छायेत मला काही काळ रहाता आले. त्यांच्या उतरतीच्या काळांत सारे आयुष्याचे सार मला पाथेय म्हणून ते देत होते. एक तर मी त्यांच्या मुलासारखा, राजकारणाच्या भानगडीत नसलेला आणि उत्तम वाचक असलेला. त्याअर्थाने निरुपद्रवी.
साहेबांचे घड्याळाकडे लक्ष होते. चला लक्ष्मण, आपल्याला निघाले पाहिजे. डॉक्टर फार शिस्तप्रिय आहेत. वेळेत पोहोचले पाहिजे. आम्ही उठलो. यल्लाप्पागुरुजी अवाक होऊन ऐकत होते. आम्ही जिन्याच्या पायर्या उतरत होतो. समोर अरबी समुद्राच्या लाटा उचंबळून उसळ्या मारीत होत्या. गुरुजी खांद्यावर होत ठेवून म्हणाले, तुमच्यामुळे एवढा योग आला. माझ्यासारख्या वैदूला यांना पाहता तरी आले असते का ? साहेबही मागोमाग आले. चर्नीरोडला डॉ. पिंपरकराचा दवाखाना होता. आम्ही लिफ्टने तिसर्या मजल्यावर गेलो. बाहेरच्या हॉलमध्ये गेल्याबरोबर डॉक्टर त्यांच्या केबीनमधून बाहेर आले. साहेबांचे स्वागत केले. डॉक्टरांची तब्येत म्हणजे अगदी किडकिडीत. हातापायांच्या सडसडीत ठेवणीमुळे ते चांगले उंच दिसत, पण तसे ते उंच नव्हते. आम्ही त्यांच्यापाठोपाठ आत गेलो. साहेब म्हणाले, डॉक्टर, हे लक्ष्मण माने. 'उपरा' नावाचे पुस्तक सध्या गाजत आहे, त्याचे लेखक. माझे छोटे मित्र आहेत. मी नमस्कार केला. चला. मी तपासणीच्या टेबलावर गेलो. डॉक्टरांनी पोट तपासले. काही तपासण्या सांगितल्या. मी हळूच फाईल काढून दाखवली. ते पोटाच्या विकाराचे तज्ज्ञ. जागतिक कीर्तीचे. त्यांनी फाईल बघितली, वैतागले. साहेबांना म्हणाले,
साहेब, हे असे आहे बघा. आमच्या क्षेत्रामध्ये प्रयोगशाळा करून टाकलीय यांच्या पोटाची. त्यांना काहीही झालेले नाही. फाईलीतले कागद त्यांनी भराभरा फाडून टाकले टोपलीत आणि मला म्हणाले. दोनच गोळ्या देतो. पोट रिकामे ठेवू नकाद्य तुम्हाला काहीही झालेले नाही.
साहेबही छान हसले. जगातले सारे जंत यांच्या पोटात आहेत. मग मी माझी भटकंती सांगितली. ते म्हणाले, हे पाणी वगैरे बंद करा. पण काळजी घेऊन स्वच्छ पाणी प्या. मी व यल्लाप्पा केबीनच्या बाहेर येऊन बसलो. थोड्या वेळाने साहेबही बाहेर आले. चला लक्ष्मण, म्हणाले. आम्ही साहेबांचा तेथेच निरोप घेतला. साहेब कुठेतरी जाणार होते. डॉ. पिंपरकरांचा लोभ जडला तो जडला. पुढे पोट दुखणे थांबले. माझे त्यांच्याकडे जाणे कमी झाले. पण आजही त्या रोडने निघालो की आठवण होते ती यशवंतरावजी चव्हाण या आभाळाएवढ्या माणसाच्या मायेची.
ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.
तुझा,
लक्ष्मणकाका