यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३१-०८१०२०१२

पत्र-३१
दिनांक ०८-१०-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

माझे सहकारी मित्र यल्लाप्पा वैदू आणि मी साहेबांना भेटायला रिव्हीएरा या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेटावयास गेलो होतो.  साहेबांनी बोलावले होते.  त्या वेळी मी पोटदुखीने फार हैराण होतो.  उकळलेल्या पाण्याची बाटली कायम शबनममध्ये असायची.  साहेबांनी मला विचारले 'लक्ष्मण, असे पाणी बरोबर घेऊन कसे हिंडणार ?'

'बंद दरवाजा' सकाळमध्ये ते वाचत होते.  मी तेव्हा आताच्यासारखा इनोव्हातून फिरत नव्हतो.  मिळेल ते वाहन, सायकल, बैलगाडी, ट्रक, टेंपो, पायी पायी आणि एस.टी., मिळेल त्या वाहनाने फिरायचे.  तेव्हा गाढवांचे तांडेच्या तांडे रस्त्याने पोटामागे हिंडत असत.  फिरस्त्यासोबत ते दिसले की एस.टी.तून उतरायचे आणि पायी पाणी चालायला लागायचे, त्यांच्याबरोबर, त्यांच्यातला एक बनून.  किती प्रकारचे मटण त्यावेळी खाल्ले असेल ते मटणालाच ठाऊक.  त्यांच्या बिर्‍हाडावर, पालावर बसून त्यांचेबरोबर जेवायचे.  पाणी तिथलेच प्यायचे.  बारा गावाचं पाणी.  त्याने पोटाला सहन होईना.  ते लागले दुखायला.  मग माझे सहकारी मित्र डॉ. दाभोळकर, त्यांनी सातार्‍यातले डॉक्टर केले.  औषधांच्या चिठ्ठयांनी फाईल बरीच जाड झाली.  प्रत्येक डॉक्टरने औषधे द्यायची.  अशी सारखी औषधे खात होतो.  त्याने औषधांचे दुष्परिणाम होऊन पुन्हा दुसरेच काहीतरी दुखायचे.  त्याने फार बेजार झालो होतो.  कुठेतरी दूर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात रस्त्याच्या कडेला, हागणदारीत, किंवा बोडक्या माळावर रेल्वेच्या रुळांच्या बाजूने किंवा एस.टी.स्टँड, रेल्वेस्टेशन, डोंगरांच्या उताराला, दर्‍यामध्ये, किंवा पर्वताच्या उंचच्या उंच शिखरावर, कुठेही मी असायचो.  तेथून मिळेल त्या कागदावर अगदी एस.टी.ची तिकीटेही वारत असे लिहिण्यासाठी.  मजकूर लिहून झाला की तो एस.टी.ने सकाळच्या पुण्याच्या कचेरीत पाठवायचा.  सदा डुम्बरे, अरुण खोरे तो मजकूर सकाळच्या रविवारच्या पुरवणीत वापरत असत.  सकाळचे संपादक श्री. ग. मुणगेकर यांनी फार मोठी जागा दिली होती.  आतासारखे शब्दांचे बंधन नव्हते.  सारा मजकूर वापरला जाई.  कधीकधी पुरवणीचे अख्खे पान मिळे.  वर्तमानपत्रे समाजपरिवर्तनाचे साधन वाटत.  महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनात जी संवेदनशीलता वर्तमानपत्रांनी दाखवली तशी आज ती नावालाही नाही.  मजकूर वाचून स्वतःचे डोळे पुसणारे हजारो वाचक असत ना तसेच संपादकही असत.  मुणगेकर, चंद्रकांत घोरपडे, माधवराव गडकरी, तुकाराम कोकते, अरुण साधू, गोविंदराव तळवळकर, वा.दा.रानडे, अशोक जैन, दिनकर गांगल, आणि त्यावेळच्या तरुण पिढीतले निखिल वागळे कितीतरी जणांनी या कामात मला मदत केली.  लोकांपर्यंत भटक्याविमुक्तांचे जगणे गेले.

सुप्रिया, साहेब हे सारे लेखन काळजीपूर्वक वाचत होते.  माझी वणवण पाहून त्यांचे काळीज तुटत होते.  माझ्यावर प्रेम करणारी बाबा आढाव, अनिल अवचटांसारखी माणसे तर होतीच, शिवाय एस.एम. जोशी अण्णा आणि यशवंतराव यांनी माझ्यावर जो लोभ दाखवला, जे अकृत्रिम प्रेम केले तोच माझ्या आयुष्यात मोठा ठेवा होता.  तेव्हा नेते संवेदनशील होते.  राजकारणाचा धंदा झाला नव्हता.  आपुलकी, प्रेम, माया, जिव्हाळा हे नुसते फुकाचे शब्द नव्हते तेव्हा.  लक्ष्माण, कशी बांधणार ही आपल्या आवळ्याभोपळ्यांची मोट, वार्‍यावरची वरात कशी बांधणार ?  अण्णा जसे काळजीने विचारीत तसेच साहेबही चिंतेत असत.  मी म्हणे, साहेब, आमचे एक सूत्र आहे.  देगा उसका भला, नही देगा उसकाभी भला.  तुमच्या आशिर्वादाने हे काम करू शकलो तर उत्तमच.  पण नाही जमले तर पुढच्या पिढ्यांसाठी पायवाट बनता आले तरी आनंद वाटेल.  ज्या वाटेने कुणी गेले नाही ती वाट आपली आपण निर्माण करावी, इतरही येतील.  हळूहळू बनेल त्याची सडक.  नाही बनली तरी दुःख नाही.