कुसुरची सभाही खूप छान झाली. नानासाहेबांनी मला खूप प्रेरणा दिली. लोकांना म्हणाले, 'मला जर अशी अवहेलना सोसावी लागली असती, अशी अन्नासाठी भिक मागावी लागलीअसती तर गेला तुमचा देश उडत असे म्हणून मीही पार्लमेंटवर बॉम्ब टाकला पाहिजे असेच म्हणालो असतो. हे तर लोकशाहीचे निवडणुका जिंकण्याचे तंत्र आहे. यात लोकही नाहीत आणि शाहीही नाही. ओ ती घराणेशाही. पूर्वी सरंजामशाही होती, साम्राज्यशाही होती, आज लोकशाही आहे. संविधान आहे. पण पैसेवाल्यांनी ती केव्हाच पळवली आहे. आता आम्ही सारेच संदर्भहीन झालो आहोत. स्वातंत्र्य यासाठी मिळवले होते का ? लक्षावधी लोकांना माणूसपणाचे हक्क मिळत नसतील तर हा कसला देश ? म्हणून लक्ष्मणला मी सांगितले आहे आणि जाहीरपणेही सांगतो, हा प्रश्न सुटला पाहिजे. मग राक्षसाबरोबर जायला लागले तरी जा. पण गोरगरीब माणसांना न्याय मिळाला पाहिजे.'
त्यानंतर माझे भाषण झाले. माझ्या भाषणामध्ये मी म्हणालो, भटक्या विमुक्त समाजाचे लोक अजूनही मतदारच नाहीत, तर लोकशाहीशी त्यांचा काय संबंध ? ५.५ टक्के लोकांना लोकशाहीच्या चौकटीच्या बाहेर ठेवून हा देश लोकशाहीचे ढोल वाजवतो कसा हेच मला काही समजत नाही. ग्रामपंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत या उपेक्षित वंचित लोकांना प्रतिनिधीत्वच नसेल तर असेंब्लीत काय किंवा पार्लमेंटमध्ये काय, यांचे प्रश्न कोण मांडणार ?
नानासाहेब गेले. एस.एम. गेले. चव्हाणसाहेब गेले. प्रश्न होते तिथेच आहेत. ही क्रांतिकारक माणसे गेली. बेडकाने बैल होऊन उपयोग नाही. पण असे बैलच काय रेडेसुद्धा पैशाच्या बळावर लोकप्रतिनिधी बनून सभागृहांमध्ये जाताहेत. ५०-६० टक्के प्रतिनिधी कोट्यधीश असतात, त्यातले काही अब्जाधीश असतात तर ही कसली लोकशाही ही तर भांडवलशाही. मूठभर लोकांनी सर्व लोकांना विकत घेऊन भारतीय संविधान आणि पार्लमेंट गुंडाळून ठेवून माजवलेली दलदलशाही आहे. साधा कार्यकर्ता ज्याला म्हणावे त्याच्या गळ्यात म्हसरांना लाज वाटेल अशा सोन्याच्या साखळ्या, हातात सोन्याचे ब्रेसलेट, दहाच्या दहा बोटांत अंगठ्या, डोळ्यांना रिबॉनचा गॉगल, पांढरेशुभ्र परीट घडीचे कपडे, तोंडात पानाचा तोबरा, हातात पाचपन्नास लाखाच्या गाडीची किचेन आणि तोंडात भाषा असते, साहेब दिल्लीत आहेत, साहेब कलकत्त्यात आहेत, साहेब मुंबईत आहेत. म्हणजे साहेबाची जशी हा रोजनिशी लिहितो. असा कार्यकर्ता हा सत्ताधार्यांच्या जवळचा कार्यकर्ता असतो. समाजसेवा करणारा, गरिबांसाठी मरमर करणारा, प्रश्नांची उत्तम जाण असलेला, समाजामध्ये मुळे खोलवर रुजलेला असा सत्त्वशील कार्यकर्ता आता कोणत्याही पक्षाच्या कचेरीच्या बाहेर सापडणे शक्य नाही.
बंडोगोपाळा मुकादम कोण म्हणून विचारणारे लोक सभागृहात आहेत. सेनापती बापट कोण असे मंत्री सभागृहात विचारत असतील तर लोकशाहीच्या नावाने चांगभले ! दुसरे काय ?
ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.
तुझा,
लक्ष्मणकाका