यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३५-२४१०२०१२-२

सुरुवातीला आपणही समाजवादी गटात होता ना ?

होय, होतो.  पण नंतर बाजूला झालो.  त्याचे असे झाले- मी भूमिगत असताना म्हणजे ४२ च्या चळवळीतली गोष्ट.  अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी मला मुंबईला बोलावले होते.  मी आमच्या एका मित्राच्या गाडीने सुरक्षितपणे मुंबईला पोहोचलो.  सातार्‍यातल्या कामगारांच्या घरात मी राहत होतो.  रोज घर बदलत असे.  मोठमोठ्या पुढार्‍यांच्या गाठी पडू लागल्या.

एस.एम. जोशींना मी एक वेळ भेटलो. त्यांना भेटून मला खूप आनंद झाला.  मी त्यांना सातारा जिल्ह्यातल्या कामाची माहिती सांगितली.  ते तेव्हा मुसलमान म्हणून वावरत होते.  बोहरी मुसलमानाला शोभेल अशी दाढी, टोपी, विजार, लांब कोट अशा वेशात ते मला भेटले होते.  आमच्या छान गप्पा झाल्या.  ना.ग.गोरे, सानेगुरुजी मुंबईला अधूनमधून असतात; त्यांना भेटता येईल असे त्यांनी मला सांगितल्याचे स्मरते.  एके दिवशी डॉ. राम मनोहर लोहिया यांची भेट झाली.  अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या मध्यस्थीने भेट झाली.  डॉ. लोहिया इतके माकळे गृहस्थ होते की त्यांनी आपल्या वेशातही फारसा बदल केलेला नव्हता.  पूर्व यु.पी. बिहार येथे झालेल्या चळवळीचा वृत्तांत त्यांनी मला सांगितला.  सर्व देशभर क्रांतीचे उधाण कसे वाढते आहे याचे उत्साहजनक चित्र माझ्या डोळ्यांपुढे उभे केले.  मीही त्यांना सातारा जिल्ह्यातल्या माझ्या चळवळीतील अनुभव सांगितले.  चळवळीतील मानवी हिंसेबद्दलही मी खंत व्यक्त केली.  

मनुष्यहानी झाली ही गोष्ट खरी आहे.  ती टाळण्याचा तुमचा निर्णयही बरोबर आहे.  तुफान वादळामध्ये जशी नौका टाकून द्यायची असते.  तसाच काहीसा प्रयत्‍न एका जबरदस्त लष्करी शक्तींशी लढताना करावा लागतो.  म्हणून क्रांतिकारक चळवळीत काही बलिदान अपरिहार्य असते.  झालेल्या मनुष्यहानीबद्दल तुम्हाला दुःख होणे स्वाभाविक आहे.  पण त्याने मन मोडून घेऊ नका.  या चळवळीच्या निर्णयाने समाजातील जे गरीब, दलित व मागासलेले वर्ग आहेत त्यांच्यापर्यंत जा.  त्यांच्यातील कार्यकर्ते उभे रहा.  हा लोहियांचा माझ्यासाठी संदेशच होता.  जवळजवळ तासभर आम्ही बोललो.  लोकनेता कसा असावा याचे मूर्तिमंत चित्रच मी त्यांच्या रूपाने पाहिले.  त्यांची भेट प्रयत्‍नांनी पण होऊ शकते हे विशेष होते.  त्यांनी केलेल्या विचारांचे मार्गदर्शन फार उपयुक्त होते.  ते मनाशी जोखून पाहिले आणि त्याचा मनाशी साठा केला.

अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी मला एका बैठकीला बोलावले होते.  ते सारे आठ-दहा लोक होते.  एका टुमदार घरात आम्ही बसलो होतो.  चर्चा सुरू झाली.  ही बैठक जवळपास दोन तास चालली होती.  सारी नेते मंडळी नावे बदलून, वेश बदलून बसलेली.  कोणकोण होते नक्की सांगता येत नाही.  मी मात्र माझे नाव हैदर सांगितले होते, काय करतां ते सांगितले होते.  बैठकीत झालेली एक चर्चा आठवते.  त्यातल्या एका कार्यकर्त्याने उठून ग्रामीण भागामध्ये सरकारच्या हातामध्ये वाटणीसाठी धान्य जाऊ देता कामा नये अशी काही योजना आखली पाहिजे.  असा विचार मांडला.  विचार मी समजू शकलो.  पण त्याची अंमलबजावणी कशी कराची असा प्रश्न जेव्हा आला तेव्हा रशियात जर्मन आक्रमणापुढे शरण जाण्यापूर्वी सर्व पिके जाळून टाकण्याचा जो कार्यक्रम घेतला होता तोच येथे घेतलेला बरा अशी त्याची सूचना होती.  दग्दभू करावी आणि त्यावेळी या प्रमुख केंद्राकडून जी सुचना पत्रके आली होती.  त्यात या योजनेचा उल्लेख होता.  याची मला आठवण आहे.  मी या कल्पनेला अत्यंत स्पष्ट शब्दात विरोध केला.

ही अत्यंत अव्यवहार्य योजना आहे.  उभी पिके आहेत ती काही ब्रिटिश सेनेची नाहीत.  ती देशातल्या जनतेसाठी आहेत.  प्रत्यक्ष शेतकर्‍यांसाठी आहेत.  पिके जाळण्याचा कार्यक्रम हाती घेणे म्हणजे लोकांशी लढाई सुरू करणे असा त्याचा अर्थ होईल.  आणि लोक आपल्याबरोबर न येता उलट सरकारला मदत करतील.  वर्तमानपत्रात वाचलेल्या पुस्तकी कार्यक्रमांचा अवलंब करून ही चळवळ चालवता येणार नाही.  पिके तर माझीच जळताहेत असे चित्र मला दिसू लागले.  तेव्हापासून मी मनाने या मंडळीपासून दूर गेलो.  अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांना माझा विचार पटला.

साहेब, आपण तर शे.का.प.च्या स्थापनेच्याही पहिल्या बैठकीला होता.  त्यातून का बाहेर आलात ?  मी म्हणालो.

त्याचे असे आहे - त्यावेळचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचे नेतृत्व जनसामान्यांपासून दुरावलेले होते.  त्यामुळे काँग्रेसमध्ये असंतोष होता.  आमदारांमध्ये मोठी नाराजी होती.  मला स्वतःलाही या सरकारचा कारभार लोकाभिमुख वाटत नव्हता.  माझ्यासारखे अनेकजण नाराज होते.  जेधे काँग्रेसचे अध्यक्ष होते.  ते फार अस्वस्थ होते.  ग्रामीण शेतकरी समाजाला न्याय वा दिलासा या सरकारकडून मिळण्याची शक्यताच नव्हती.  याविरुद्ध संघटित शक्ती उभी करणे आवश्यक होते.  त्यात केशवराव जेधे, शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव हे प्रमुख होते.  मीही काही काळ त्यांच्या सोबत होतो.  या बहुजनसमाजवादी गटाने जेव्हा काँग्रेसबाहेर पडण्याचा विचार केला तेव्हा मी थांबलो.  पक्षांतर्गत दबाव वाढवण्यास माझा पाठिंबा होता, मात्र स्वतंत्र प्रादेशिक पक्ष काढण्यास माझा विरोध होता.  समाजवादी पक्षांतल्या तर अनेक मित्रांशी माझे वैचारिक सौहार्द होते.  तरीही मी काँग्रेस सोडून जाण्याचा विचार केला नाही.  तसे मी सत्यशोधक कुटुंबातला.  माझे बंधू मला म. फुलेंचा सत्यशोधक समाज, त्याचे काम, ध्येय सारे सांगत होतेच.  पण मी मनानेच राष्ट्रीय प्रवाहात उडी घेतली होती.  प्रादेशिक पक्ष पत्री सरकार या मार्गाने नव्हे तर देशाच्या मुख्य प्रवाहात आपण राहिले पाहिजे.  नेहरूंचा समाजवाद मी पत्करला तो अखेरपर्यंत.  मी कधीही काँग्रेस पक्षनिष्ठांशी, विचारांशी तडजोड केली नाही.  माझे विरोधक काहीही म्हणोत, मी कायम माझ्या हितापेक्षा राष्ट्राचे हित महत्त्वाचे मानले.  मानपान, मर्यादा सारे बाजूला ठेवून मी राष्ट्रीय प्रवाहात राहिलो.  हे राष्ट्र फार मोठे आहे.  आपली आयुष्ये छोटी आहेत असे मी मानत आलो.