यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३५-२४१०२०१२

पत्र-३५
दिनांक २४-१०-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

यशवंतराव आणि एस.एम. जोशी हे दोन्ही माझे पितृतुल्य मार्गदर्शक.  दोघांबद्दल मला आजही मनापासून प्रेम.  त्यांची आठवण झाली नाही असा एखादाही दिवस जात नसेल.  माझ्यासारख्या भणंग माणसाला या दोघांबरोबर तासन् तास राहता आले, बोलता आहे, त्यांच्यासोबत काम करता आले याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो.  या दोघांशी बोलताना माझे मन दोघांची एकमेकाशी तुलना करीत असे.  दोघांची जडणघडण वेगळी, परिस्थिती वेगळी.  एकाने सारे आयुष्य तत्त्वनिष्ठा सांभाळली.  विचाराबरोबर तडजोड केली नाही.  सतत सत्तेशी संघर्ष केला.  गोरगरिबांसाठी, श्रमिक कष्टकर्‍यांसाठी त्यांच्या चळवळी चालविल्या आणि दुसर्‍याने सत्तेत राहून सत्तेचा वापर समाजपरिवर्तनासाठी केला.  एकजण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तर दुसरा विरोधी पक्षनेता.  दोघेही थकल्यावर मी त्यांच्या जवळ गेलो.  त्यांच्या उभारीच्या, उमेदीच्या काळात त्यांच्याजवळ जाण्याचा प्रश्नच नव्हता.  मी तेथवर पोचू शकत नव्हतो.  केवळ मी शिकलो.  शब्दांची ओळख झाली.  ग्रंथाशी नाते जोडले गेले आणि या शब्दांनीच मला या दोन दिग्गजांशी जोडले.  ग्रंथांनी, शब्दांनी माझी-त्यांची भेट घडवली. एरवी मी उकिरड्याच्या कडेला वाढलेला माणूस आणि ते गावात राहणारे लोक. काय संबंध होता आमचा ?  काय नाते होते आमचे ?  ना मी त्यांच्या परिघातला ना नात्यागोत्यातला, पण मला जो आपलेपणा दोघांनीही दिला तो माझ्या अंतःकरणात जपून ठेवला आहे.  मेणबत्तीसारखा त्यातला थोडासा उजेड तुला नि तुझ्या पिढीला देता आला तर पाहावे असे वाटते.  म्हणून खरे तर हा पत्रप्रपंच.  

अण्णा आजारी होते.  त्यांना पहायला चव्हाणसाहेब गेले होते. मी काही नव्हतो,  पण चव्हाणसाहेबांची भेट झाली आणि आम्ही अण्णांबद्दल बोलू लागलो.  साहेबांचे अण्णांबरोबर का नाते होते ते साहेब मला समजावून सांगत होते. मी दोघांचा चाहता.  साहेब सांगत होते- १९३२ साली फेब्रुवारी महिन्यात मी सत्याग्रह करून तुरुंगात आलो.  येरवड्याच्या कॅम्प जेलमध्ये मी संपूर्ण एक वर्ष होतो. आणि त्यानंतर विसापूर जेलमध्ये तीन महिने होतो.  १९३३ च्या मे महिन्यात मी सुटून बाहेर आलो.  जेलमधले पंधरा महिन्यांचे जीवन म्हणजे माझ्या जीवनातला अत्यंत उत्तम काम होता.  प्रत्येक बराकीत शंभर माणसे राहतील अशी व्यवस्था होती.  बारा नंबरच्या बराकीत अगदी निवडक शंभर माणसे होती.  बारा नंबरच्या बराकीमध्ये आचार्य भागवत, रावसाहेब पटवर्धन अशी फार मोठी माणसे होती.  रावसाहेबांचे इंग्रजी म्हणजे ऐकत राहावे.  फार व्यासंगी माणूस.  जाणते लोक बराकीत येऊन विविध विषयांवर चर्चा होऊ लागल्या. आणि जेलमध्ये आमचे वास्तव्य अधिक समृद्ध व संघटित होऊ लागले.  बारा नंबरची बराक म्हणजे ग्रंथालयच चालते-बोलते.  पुण्याचे अतीतकर, मामा गोखले, वि.म.मुस्कुटे आणि एस.एम.जोशी.  एस.एम. ना मी पहिल्यांदा पाहिले ते या जेलमध्ये. या काळात जेवढे वाचन झाले तेवढे वाचन पुढे कधी झाले असे वाटत नाही.  राजकीय विचारांच्या वेगवेगळ्या छटा आणि परस्परांशी संबंध याची ही बराकीत चर्चा होत असे.  त्याने व्यासंग वाढू लागला.  आचार्य भागवत हे कट्टर गांधीवादी होते.  गांधीवादाची उकल ते करून सांगत असत.  आम्ही सर्वांनीच गांधींचे राजकीय नेतृत्व मान्य केले होते.  परंतु सर्वांनीच त्यांचे तत्त्वज्ञान स्वीकारले होते किंवा सर्वांना ते समजलेले होते असे म्हणता येण्यासारखे नव्हते.  या चर्चांमुळे विचारातील मूलभूत फरक आणि त्यातील फरकांच्या सूक्ष्म छटा ध्यानात यायला मदत झाली.  मी गांधींचे नेतृत्व स्वीकारले असले तरी तत्त्वज्ञान स्वीकारलेले नव्हते.  तसेच एस. एम. जोशींचे होते.  एस.एम. जोशी, ह.रा. महाजनी ही तरुण पिढी गांधीवाद स्वीकारलेल्यापैकी दिसत नव्हती.  त्यांच्या मनात त्या संबंधी अनेक शंका होत्या व ते त्या वेळोवेळी विचारत असत.  स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी समाजवादाचा विचार आवश्यक नाही का ? असे प्रश्न उभे करीत.  आणि त्यामुळे त्यांचे-माझे चांगले सूत जमत असे.  वि.म.मुस्कुटे हे मार्क्सवादाचे गाढे अभ्यासक.  त्यांच्या मताने निव्वळ समाजवादाची पोकळ भाषा बोलून काही काम भागणार नाही.  तर समाजवादाचा शास्त्रीय विचार करून त्या विचारांची पद्धती राजकीय लढ्यात स्वीकारल्याशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही.  गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद या गोष्टीचा खल सतत चालू होता.  एकदा एस.एम. शी बोलत होतो.  काहीसे गोंधळल्यासारखे होते.  सारेच सार्‍यांचे खरे वाटू लागते.  पण सारेच खरे कसे असेल ?  कोणते तरी एकच म्हणणे खरे म्हणजे बरोबर असेल.  त्यावर एस.एम. म्हणाले, आपला विचार आपणच करायला हवा.  त्यावर मी ठरवून टाकले कोणताही निर्णय कोणी सांगितले म्हणून आपण स्वीकारावयाचा नाही. विचारांच्या क्षेत्रातील निर्णय हा आपला आपणच केला पाहिजे.  त्यासाठी आपण वाचन केले पाहिजे, चिंतन केले पाहिजे.  जेलमध्ये तर वाचन केलेच पाहिजे पण जेलच्या बाहेर गेल्यानंतरही वाचन व चिंतन सुरू ठेवले पाहिजे.  प्रत्यक्ष जनतेच्या कामात असताना आलेल्या अनुभवाच्या आधारे यासंबंधीचे निर्णय घेतले पाहिजेत.