पत्र -२२
दिनांक १६-०९-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
चव्हाणसाहेबांबरोबर अनेकदा प्रवास करण्याचा प्रसंग आला. असेच एकदा कोल्हापूरला निघालो होतो. भेटल्याबरोबर साहेबांचा पहिला प्रश्न असे, 'काय लक्ष्मण, आई काय म्हणते ? शशी कशी आहे ? मुलं काय मजेत ना ?' या तीन गोष्टींची चौकशी केल्याशिवाय आणि माझ्याकडून माहिती घेतल्याशिवाय प्रवास सुरू होत नसे. इतक्या आस्थेने ते चौकशी करीत तशी चौकशी माझ्या तरी आयुष्यात कुणी केली नाही. माझी आई आता टोपल्या विणते का ? अजून टोपल्यांचा व्यवसाय घरी कुणी करते का ? याचे त्यांना फार कुतुहल असे. गाडीत बसले की अन्य कोणत्याही प्रश्नाची चर्चा नसायची. मी राजकारणातल्या माहितीसाठी काही विचारले तर जुजबी उत्तर द्यायचे. आज त्यांनी आणखी एक प्रश्न विचारला. मला म्हणाले
'काय लक्ष्मण, काय वाचताय ?'
मी ते सांगितले.
ते म्हणाले, 'कसे वाचता ?'
आता आली का पंचाईत. कसे वाचता म्हणजे काय ? काय सांगणार ?
'साहेब, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचतो.'
'अस्स होय, पण असे वाचण्याचा कंटाळा नाही का येत ?
'येतो ना. मग, मग पुस्तक बंद करतो. थांबतो. पुन्हा काही वेळाने वाचू लागतो.'
'आता असे बघा, मध्ये वेळ गेलाच ना ? माझे तसे नाही. मी एक नियम केलाय. एक वैचारिक ग्रंथ, एक कविता संग्रह आणि बाकी काहीही. कधी नाटक, कधी ललित लेख असे तीन ग्रंथ बरोबर घ्यायचे. एकाचा कंटाळा आला की दुसरा ग्रंथ घ्यायचा. दुसर्याचा कंटाळा आला की तिसरा वाचावयाचा. पण प्रत्येक वेळी आणखी एक अट घालायची. आपली स्वयं शिस्त. जेथवर आपण वाचले तेथवर काही ना काही खूण तर करतोच ना ? मग दुसर्यांदा जेव्हा आपण वाचायला सुरुवात करणार तेव्हा दहा पाने मागे जायचे, नि वाचायचे. म्हणजे सलगता मिळते आणि प्रत्येक वेळी दहा पाने मजकूर पुन्हा वाचला जातो. गंमत सांगू काय ? आपण व्यासंग करायचा म्हणून वाचणारे लोक. करमणुकीसाठी थोडेच वाचतो. वाचणे एका अर्थाने आपण आपल्याला लावलेले व्यसनच असते ना ? न वाचता आपण झोपूच शकत नाही. कितीही कामात असलो नि कितीही आळस असला तरी एक तासभर वाचल्याशिवाय मला तरी काही झोप येत नाही. मग आपण म्हैशीसारखे करावे. ती भराभरा खाते आणि निवांत रवंथ करीत बसते, हो ना ? म्हणजे पुन्हा चर्वण करते. आपण दहा पाने मागे गेलो ना की आपोआपच पुन्हा पुन्हा चर्वण होते. एकच पुस्तक एकाच वेळी दोन-तीन वेळा वाचून होते नि त्यावर चिंतनही करता येते. शेरडासारखा नुसता शेंडा खुडून जाण्यात काय मतलब. किंवा झाड चांगले दिसले म्हणजे नुसते ओरबाडून खाण्यात तरी काय मतलब. राजासारखे वाचले पाहिजे. काय वाचतोय, कशासाठी वाचतोय, हे महत्त्वाचे, पण वाचनाने मन संस्कारित होते आहे का ? हे समजायचे तर वाचन, चिंतन, मनन पाहिजे. अधाशीपणा काय कामाचा. वैचारिक पुस्तकांबरोबर कविता असली ना की कसा छान विरंगुळा मिळतो. कादंबरीबरोबर नाटक असेल तर फारच उत्तम भट्टी जमते. काय ? अनेकजण अनेक प्रकारे वाचतात. मी पुस्तक निवडताना पहिल्यांदा चाळतो, आवडले .की बाजूला ठेवतो. अशी बाजूला केलेली पुस्तके गाडीत असतात. माझी गाडी म्हणजे मग छोटे ग्रंथालयच बनते.'
साहेबांनी मला कसे वाचावे याचा वस्तुपाठच दिला. पण 'तुम्ही असे करा असे काही मी म्हणत नाही' असे वर सांगितल्याने तेही टेन्शन नाही.
आता, 'कसे लिहिता,
मी थोडा गोंधळलो पण धाडसाने लेखनप्रक्रिया सांगितली.
ते म्हणाले छान. ही खांडेकरी परंपरा.
मी मान हलवली. 'साहेब, मी एकटाक सलग लिहितो. एकदा लिहिलेला मजकूर फायनल असतो. पुन्हा पुन्हा खाडाखोड करीत लिहीत नाही. अगदी संपादक काही म्हणाला तर दुसरा मजकूर लिहून देतो. पण दुरुस्त्या करत बसत नाही. ते काम फार त्रासाचे असते. मला जे सांगायचे ते सांगितले. त्यात पुन्हा कारागिरी करीत बसण्यात मला काही रस नसतो. मग गरज लागली तर तो अख्खा मजकूर टोपल्यात टाकतो आणि नवीनच मजकूर लिहून देतो.'
वा ! वा ! लक्ष्मण छान एकपाठी असावे तसे, हो ना ? छान आहे.