आम्ही गाडीत छान बोलत होतो. मागे शामराव पवार यांचे भाचे बसलेले. आमची साहित्याच्या निर्मितीप्रक्रियेची चर्चा सुरू होती. शामराव कुतूहलाने ऐकत होते. अगदी शांतपणे. गाडी कोल्हापूरकडे निघाली होती. भोवताली सारी हिरवीगार ऊसाची शेती. मध्येच काढणीला आलेला पिवळा भात आणि वितवित लोंब्या. कंबरेला बसलेला बागयती भात. कोल्हापूर, कराड म्हणजे काळीभोर जमीन. कसदार माती. शेतकरी अत्यंत कष्टाळू. राबराबून शेतात घाम गाळून मोती पिकवणारे शेतकरी. साहेबांचा विक पॉईन्ट. भोवतालची समृद्धी पाहून मन कसे हरखून जात असे. पावसाळा चांगला झाला. धरणे भरली की चिंता मिटली. शेती, शेतकरी, राधानगरी धरण हे विषय आले की शाहू महाराजांची आठवण झाली नाही असे कधी व्हायचे नाही. मी आणि साहेब असलो की भटक्या-विमुक्तांविषयी हमखास बोलणे व्हायचे. मग महाराजांच्या असंख्य आख्यायिका-आठवणी ते सांगत. मीही शेअर करीत असे. त्यांचे शिक्षण संस्थानकाळात कोल्हापूरला झालेले. त्यामुळे त्यांच्या आठवणीही फार छान असायच्या.
'लक्ष्मण' हा राजा मोठा विलक्षण होता. सामाजिक लोकशाहीचे अनेक प्रयोग याने केले. असे जगात कुठे दिसणार नाही. असले प्रयोग आख्यायिकांच्या रूपात जनमानसात रुजले. सामाजिक समतेसाठी त्यांनी केलेले प्रयोग त्याकाळात खूपच गाजले. एकदा काय झाले, महाराजांच्या लक्षात आले की आपण अस्पृश्यता विरोधी कायदा केला असला तरी समाजातले मोठे लोकच तो पाळत नाहीत. सरदार, जहागीरदार, इनामदार, घरंदाज घराण्यातले लोक यांचे काय करावे ? एकदा एक प्रयोग त्यांनी केला. सर्व खासे खासे लोक जेवणासाठी बोलावले. खानसाम्याला बोलावून जेवण उत्तम बनवायला सांगितले. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुके मटणे, फार छान बेत केला. मात्र खानसाम्याला सांगितले मीठ मात्र कश्यातही घालू नको आणि वाढप्याच्या जागेवर महारांची पोरे बोलावून त्यांना वाढण्याची कामे दे. जी हुजूर म्हणून तो कामाला लागला. ही गोष्ट दोघांनाच ठाऊक. झाले ! सारे खासे मंडळी, पंगत बसली. महाराज म्हणाले, घ्या, करा सुरुवात आणि खाली मान घालून लागले जेवायला. सर्वजण जेवताहेत याची खात्री करून घेतली. चार चार घास जेऊ दिले सर्वांना आणि एकदम खानसाम्यावर ओरडले,
लेकानो, तुम्हाला किती वळण लावले तरी समजत कसे नाही. मीठच नाही कशात. ये कांबळ्या, पळ ना, मीठ वाढ सर्वांना. च्या मारी म्हारांनो किती सांगायचं रं तुमास्नी. पोरांनी पळपळून मीठ वाढलं.
लोक जेवत होते. कोणाची हिंमत नव्हती उठण्याची. सार्यांना कळून चुकले. खानसाम्यापासून वाढप्यापर्यंत सारे अस्पृश्य समाजातले लोक काम करीत होते. जेवणाला नावे ठेवायला जागा नव्हती इतके सुंदर जेवण. सारे पोट भरून जेवले नि मग महाराज खुशीत सर्वांशी बोलत होते. सर्वांना बाटविले, त्याना मनापासून आनंद झाला होता. आहे का असा राजा ? आपली लोकशाही आली. लोकांचे राज्य आले पण माया गेली. मायेचा कळवळा गेला. असा लोकराजा पुन्हा होणे नाही.'
'होय साहेब', मी म्हणालो.
सोनतळी कॅम्प हे त्यांचे या सामाजिक प्रयोगशाळेचे केंद्र होते. ते तेथेच राहत. राजवाड्यात नाही. शेजारी सारी वसाहत भटक्या-विमुक्तांची. पारध्यांवर त्यांचा मोठा लोभ होता. रानातले हिंस्त्र पशू जर माणसाळविता येतात तर ही माणसे का नाही ! प्रेमाने शिकारी चित्ते महाराजांनी माणसाळावले होते. तर प्रेमाने पारधी का माणसाळणार नाहीत. महाराजांनी अनेक प्रयोग केले. एकदा पारध्यांना अटक करून सैनिकांनी महाराजांसमोर त्यांना उभे केले.
महाराज हे चोर्या करतात, दरोडे घालतात आणि आता तर ते कॅम्पावरच धाड घालायला आले होते.
महाराजांनी त्यांना कसलाच त्रास दिला नाही. याउलट त्यांची जेवणाची नुसती चंगळ उडवून दिली. पंचपक्वान्न वाढले, बापजलमात ते असे जेवले नव्हते. महाराजांनी त्यांना समोर बोलावले. आणि विचारले, का रे, अशा चोर्या करता ? तुरुंगात जायची हौस आहे होय तुम्हाला ?
तुरुंगाची हौस कुणाला असंल ?
मग चोर्यामार्या का करता ?
जगण्यासाठी. त्यांनी उत्तर दिलं
उद्योगधंदा का करीत नाही ?