ग्राफिक्सचे अनेक अर्थ होतात, पण चित्रकलेत प्रिंटमेकींग ह्या अर्थाने घ्यायचा. तांबे, जस्त, लाकूड किंवा खराच्या सपाट प्लेटवर हाताने चित्र काढून हँडस्प्रेसच्या साहाय्याने त्याच्या अनेक प्रती काढल्या जातात. प्लेटवर हाताने चित्र कोरतात. अनेकदा रासायनिक प्रक्रियाही करतात. याला ग्राफिक्स असे म्हणतात. ग्राफिक्समुळे अनेक प्रती निघू शकतात. रेम्ब्रॉ, गोया, दोमिए, दगा, तुलुज लोत्रेक, पिकासो, दाली मिरो अशा अनेक श्रेष्ठ कलावंतांनी हे तंत्र मुक्तहस्ते वापरले आहे. आपले लोकही आता उत्तम ग्राफिक्स करतात. या सर्व क्षेत्रांत लक्षात राहिलेला आणखी एक चित्रकार आहे. तो आहे सेझान पॉल. गेल्या शंभर वर्षांतला सर्वांत थोर आणि महत्त्वाचा चित्रकार. ज्येष्ठ साहित्यिक एमिल झोलाचा हा मित्र. इम्प्रेशनिस्ट चळवळीचा म्होरक्या. त्याने रंग आणि छटांच्या विश्लेषणाचे महत्त्वाचे सिद्धांत मांडले. दृश्य वस्तूखाली दडलेला आकृतिबंध व्यक्त करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. शंकू, दंडगोल, वर्तुळ यांचा चित्रकाराने निसर्गात पाहायला शिकले पाहिजे. हाच पुढे पिकासोने निर्माण केलेल्या क्युबिझमचा मूळ आधार होता. त्याच्या मृत्यूनंतर क्युबिझमचा उगम झाला.
लक्ष्मण, पिकासो म्हणजे ज्वालामुखी होता. तो केव्हा फुटेल हे जसे सांगता येत नाही तसेच पिकासोचे होते. पिकासो दीर्घायुषी होते तर हेन्री तुलुज लोत्रेक अल्पायुषी. याचा बाप सरदार होता. लहानपणी झालेल्या अपघातात दोन्ही पाय अधू झाल्याने त्याच्या शरीराची वाढ खुंटली. हेन्रीने पॅरिसला येऊन आपला चित्रकलेचा नाद जोपासला. व्हान गॉग, गोगाँ, सरा वगैरे त्याचे मित्र होते. तो अप्रतिम रेखाटनकार होता. वेश्या, धोबीणी, सर्कस, घोडे असे विषय घेऊन अनैतिक चित्रे करून त्याने सनातन्यांचा रोष ओढवून घेतला. जगातले पहिले पोस्टर त्यानेच केले. लिथोग्राफीने. याचा पोस्टर्सनी क्रांती केली. याचा पिकसोवर मोठा प्रभाव होता. आणखी एक महत्त्वाचा चित्रकार पिकासोच्या जडणघडणीत वाटेकरी होता. तो म्हणजे व्हिन्सेन्ट व्हान गॉग. अत्यंत नाट्यमय, अत्यंत वादळी जीवन जगला. मृत्यूनंतर त्याच्यावर कथा, कविता नि चित्रपट तयार झाले. तो जन्माने डच होता. अनेक उद्योग करून वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी तो चित्रकलेकडे वळला. पॅरिसला दाखल झाला. गेगाँबरोबर राहत असताना त्याला वेडाचे झटके यायला लागले. आणि याच भरात वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी त्याने आत्महत्या केली. या दहा वर्षांत त्याने बेफाट काम केले. इम्प्रेझिम चिसिन्थेटीझम अशा अनेक विचार प्रवाहांचे पितृत्व त्याच्याकडे जातं. विसाव्या शतकातल्या जर्मन एक्स्प्रेशनिस्ट चित्रकारांवर त्याचा खूप प्रभाव होता. पिकासो म्हणे, प्रतिभावंत असायचे तर भगंणपणा आला. इतरांच्या रीतीभाती आल्या, त्याला त्या पाळता आल्या नाही तर तो बदनाम होतो. कलावंत जोवर यशस्वी नसतो तोवर त्याच्या घरचे जवळचे लोक त्याला प्रतिभावंत म्हणून वागवतात. पण एकदा का त्याला यश आणि पैसा मिळाला की मग काय त्यांच्या दृष्टीने तो प्रतिभावंत उरत नाही. उरतो तो फक्त यशस्वी आणि पैसेवाला कलाकार. आपल्याकडे नाही का, पैसा नसेल तर पोराला उनाड ठरवत लोक, तसेच हे आहे.
साहेबांचे हे रूप क्वचितच कुणी पाहिले असेल. पूर्ण चित्रकलेत रमलेले. या माणसाच्या व्यासंगाचे विषय तरी किती असावेत ! वरकरणी राजकारणी असणारे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते म्हणजे काय ? अष्ठावधानतला आली होती ती त्यांनी कष्टाने कमावली होती. त्यांचा हजरजबाबीपणा हाही त्यांनी व्यासंगाने कमावला होता. मी पिकासोच्या झपाटलेपणाने गोंधळून साहेबांचा निरोप घेतला. कृष्णामाईचे हे लाडके पोर जगातल्या चित्रकारांबद्दल विलक्षण ताकदीने झपाटून गेलेलं मी पाहिले. मी जसा आधी दगड होतो तसाच होतो. साहेबांनी मला चित्र कशी पाहावीत हे अनेक प्रकारे समजावले. खरे तर मला आणखी जवळून जाणण्याची संधी आधी मिळाली असती तर ? सुप्रिया, मी एक वेडा माणूस आहे. तोही एक वेडा माणूस होता. जगाचे सारे नियम त्याला लागू नव्हते अन्यथा तोही कोट्यधीश झाला असता. अब्जाधीश झाला असता. सारी मदार त्याच्या केवळ एका शब्दावर होती. तो सांगील ते धोरण आणि बांधील ते तोरण. अशी त्याच्या शब्दांची किंमत होती. त्याला नोटांचे बंगले बांधता आले असते ग, पण तो एक वेडा लोक-लोक, लोकांचे, लोकांसाठी करीत राहिला. जमेल तेवढी बेरीज करीत राहिला. वजाबाकी करायचीच नाही. शेवटी घराची लाइट बिलेही भरायलाही पैसा नव्हता. पण तो खरा धनवान होता. त्याचे धन त्यांच्या विचारात नि ग्रंथालयात होते. लाखोकरोडो रुपयांची त्याची इस्टेट होती, ती या वेड्या माणसांनी भरलेल्या पुस्तकांच्या कपाटांत. त्याचा सांभाळ आता पुढच्या पिढ्यांनी करावा.
ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.
तुझा,
लक्ष्मणकाका