• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३९-०५११२०१२-२

निवडणुकांचेही नगारे वाजू लागले होते.  साहेब पुन्हा निवडणुकांसाठी गुंतणार होते.  संस्था सुरू झाली तरी साधे पाय ठेवायला जागा नव्हती.  बँकेत खाते उघडण्याची साधी प्रक्रिया मला माहीत नव्हती आणि आम्ही संशोधन करणार होतो !  साहेबांचे अनुदानासाठी प्रयत्‍न करणे सुरू होते.  काही मित्रांना मी चव्हाणसाहेबांबरोबर काम करीत असल्याचे मान्य नव्हते.  त्यांचा एक लाडका सिद्धांत होता.  रचनात्मक कामात माणसे गुंतून गेली की ती संघर्ष विसरतात.  त्या कामात गुंतून पडतात.  लक्ष्मणला संघर्षाच्या कामातून यशवंतराव बाहेर नेत आहेत.  तो आता संपला.  सारी भ्रष्टाचाराची संस्कृती काँग्रेसवाल्याबरोबर येईल आणि आता आपल्यासारख्यांनी इथे थांबून उपयोग नाही.  असे म्हणून ते बाहेर पडले.  खरे तर आता यशवंतराव थकले होते.  वेणूताईंच्या जाण्याने खचले होते.  ते माझ्यासारख्या उपेक्षित समाजातल्या माणसाबरोबर काम करणार होते.  याचा आनंद होण्याऐवजी मित्रांना त्यात राजकारण दिसू लागले.  त्यांचा आणि माझा कैक वर्षांचा संबंध त्यांनी संपवला, मीही संपवला.  आमच्या वाटा वेगळ्या झाल्या.  मी तसा सातार्‍यात एकटा झालो.  बाकी सारे बाजूला गेले.  मी चव्हाण साहेबांना अध्यक्ष केल्याने अनेकांना ते रुचले नाही.  न बोलता, न भांडता ते वेगळे झाले हेच खूप झाले.  

अनेक प्रसंगी साहेबांना भेटत होतो.  साहेबांचे मित्र अनंतराव कुलकर्णी, मी आणि साहेब खिंडीतल्या गणपतीला गेलो होतो.  मी कधी देवळात जात नसे.  ते दोघे गेले देवदर्शन करून परत आले.  येताना जकातवाडीतल्या बोगद्याजवळ आलो.  अनंतरावांनी गाडी थांबवायला सांगितले.  यशवंतराव, लक्ष्मणच्या कामाला ही जागा कशी वाटते बघा.  साहेब खाली उतरले.  बोगद्यासमोरच्या कट्ट्यावर आम्ही तिथे उभे राहिलो.  समोर तीन ओढे असलेली तीव्र उताराची जमीन होती.  साहेबांनी मावळतीकडे पाहिले.  मावळतीला सज्जनगड, उगवतील अजिंक्यतारा, क्या बात है !  अनंतराव मिळाली; जाग मिळाली, काय लक्ष्मण कशी आहे जागा ?  मलाही फार आवडली.  पाच-दहा सुबाभळीची झाडे, पाच-दहा निलगिरीची झाडे, बाकी सारा उजाड माळ.  साहेबांना जागा खूप आवडली आम्ही सर्किट हाऊसला आलो.  साहेबांनी प्रतापराव भाऊंना बोलावले.  तेही रेस्ट हाऊसमध्ये होते.  ते भाऊंना म्हणाले, प्रतापराव, तुम्ही मंत्री आहात.  आम्हाला जकातवाडीतली राज्यशासनाची जागा पाहिजे आहे.  मी लगेच पत्र देतो.  झाले, प्रतापरावांनी जागा देण्याचे मान्य केले.  साहेबांनी जिल्हाधिकारी सातारा यांना जागा मागणी करणारे पत्र लिहिले.  सातबाराचा उतारा, नकाशा जोडला नि सारी फाइल तयार करून प्रशासनाला दिली.  साहेब फार समाधानी दिसले.  ते त्यांचा विरंगुळा यात पाहत होते.  

सुप्रिया, या अत्यंत नाजूक काळात मला त्यांच्यासोबत राहता आले, ऐकता आले, पाहता आले.  अत्यंत अनमोल मार्गदर्शन.  एका अर्थाने आयुष्याचे नवनीत ते माझ्या तळहातावर ठेवीत होते.  मी जेवढी माझी कुवत होती तेवढे घेत होतो.  वाईट याचे वाटते, ते सारे चित्रीत करता आले नाही की टेपही करता आले नाही.  अनेक सुंदर प्रसंग, सुंदर मूड्स मी टिपू शकलो नाही.  आम्ही चुकूनही राजकारणावर बोलत नसू.  पण इतिहास, तत्त्वज्ञान, संरक्षण, वाङ्‌मय, शिल्प, चित्रकला, संगीत कितीतरी विषयांवर ते बोलले मनापासून.  मनाने निवृत्त झालेले साहेब मला नव्या मार्गाला घेवून आले.  ते भेटले नसते तर मी कोणत्या दिशेने केला असता प्रवास ?  कदाचित ताडमाडासारखा वाढलो असतो, पण कोणाच्या उपयोगाचा राहिलो असतो की नाही ते मला सांगता येणार नाही.  तुझी, तुझ्या बाबांची साधी ओळख तरी झाली असती का ?  माझी वाटचाल मी पाहतो नि खरेच मी इथवर आलो ते या माझ्यावर प्रेम करणार्‍या ज्येष्ठांमुळे.  साहेबांच्या उन्मळून गेलेल्या मनाला चार घटका हसवू शकलो.  त्यांचे बोलणे शेअर करू शकलो.  माझे आयुष्य समृद्ध झाल.  आणखी काय लिहू ?

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका