पत्र - ४०
दिनांक ०५-११-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
पुण्याच्या दैनिक सकाळमधून 'बंद दरवाजा' नावाने सदर मी सुरू केले होते. हे यापूर्वी तुला मी सांगितले आहे. ते सदर खूपच गाजले. भटक्याविमुक्तांचे जग लोकांसमोर मराठीत पहिल्यांदाच येत होते. प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सकाळचे संपादक श्री.ग.मुणगेकर, सदा डुंबरे, अरुण खोरे, वा.दा. रानडे या सकाळमधील मित्रांनी फार मोलाचे सहकार्य केले. मी वर्षभर मुक्तपणे लिहिले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात, दर्याखोर्यांत, वाड्यावस्त्यांवर, तांड्यावरून मिळेल त्या कागदावर मी मजकूर लिहीत असे. ता लिहिलेला मजकूर एस.टी.ने ड्रायव्हरमार्फत स्वारगेटच्या स्टँडवर पाठवत असे. अरुण खोरे तेथून तो मजकूर सकाळमध्ये नेहत असे. तसा तो वाचकांपर्यंत जात होता. या सर्व काळात माझ्यासारखेच हे सारे मित्र झपाटून गेले होते. रविवार सकाळच्या पुरवणीची केवढीतरी जागा मुणगेकरसर मला देत होते. या सर्व लेखांचे पुस्तक तयार करण्याचे व प्रकाशन करण्याचे 'ग्रंथाली'चे दिनकर गांगल यांनी मनावर घेतले. पुस्तक उत्तम तयार झाले. माझे मित्र संजय पवार यांनी उत्तम कव्हर केले. पुस्तकाच्या प्रकाशनासाठी चव्हाणसाहेबांना बोलावण्याचे ठरले. त्यावेळी मी डॉ. बाबा आढावांसोबत म. फुले समता प्रतिष्ठानचा सरचिटणीस म्हणून काम करीत होतो. बाबांना ही कल्पना सांगितली. त्यांनीही तात्काळ मान्य केली. म.फुले समता प्रतिष्ठान, भटक्याविमुक्त जमाती संघटना यांच्यामार्फत पुस्तकाचे प्रकाशन ठरले. चव्हाणसाहेबांच्या कानावर घातले. चव्हाणसाहेबांनी पुस्तक प्रकाशनाचे निमंत्रण आनंदाने स्वीकारले.
पुण्यातल्या इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात प्रकाशन होणार होते. हॉल कार्यकर्त्यांनी पूर्ण भरलेला. जाणकारांचीही बर्यापैकी हजेरी. कार्यकर्त्यांनी आपली मनोगते सभेपुढे मांडली. मीही दोन शब्द बोललो. सभेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव. चव्हाणसाहेबांनी पुस्तकाचे प्रकाशन केल्याचे जाहीर केले. व्यासपीठावर बाबा, साहेब, मी, प्रमुख कार्यकर्ते, समोर विनायकराव कुलकर्णी, सदा डुंबरे, वा.दा.रानडे, अरुण खोरे आणि कितीतरी जण. साहेबांच्या सोबत आलेले त्यांचे भाचे शामराव पवार आणि रामभाऊ जोशी, सारे उत्सुकतेने साहेब आता काय बोलणार म्हणून लक्ष देऊन ऐकायला तयार. सारे सभागृह कमालीचे शांत. टाचणी पडली तरी आवाज येईल, सारे व्यासपीठावर नजरा खिळवून होते. चव्हाणसाहेब माईकच्या पुढ्यात उभे निःशब्द, अत्यंत करुण, गंभीर चेहरा, बोलण्यासाठी ओठ उत्सुक, पण तोंडातून शब्द फुटेना. डोळ्यांतून नुसत्या धारा वाहत होत्या. सारे श्रोतेही अचंबित होऊन समोरच दृश्य पाहत होते. साहेब मुक्तपणे रडत होते. सारे सभागृहच कारुण्याने भरले होते. बाहेर आकाशात प्रचंड ढग जमले होते. भरदुपारी विजांचा कडकडाट चालू होता आणि जाहीर सभेत चव्हाणसाहेबांचा अश्रुपात सुरू होता. सभागृहात कमालीचे गरम होत होते. साहेबांनी स्वतःला सावरले आणि बोलू लागले, ''काय बोलावे या ग्रंथाबद्दल ? अपराध्याच्या पिंजर्यात उभे असल्यासारखे वाटते. जो समाज लक्ष्मणने या ग्रंथात उभा केलाय तो मला नवा नाही, पण यासाठी काही करता आले नाही. विसरून राहून गेले असे म्हणून पळता येत नाही. मी कर्ता होतो, आणि म्हणूनच अधिक खजिल व्हायला होते. राहून गेल नाही, राहिले हे वास्तव आहे. आता उरलेले आयुष्य लक्ष्मणच्या या प्रश्नासाठी द्यायचे आहे, हा मनाचा निर्धार आहे.''
आता साहेब मोकळे झाले होते, सावरले होते ते मोकळेपणाने बोलू लागले, ''वडार, कैकाडी, रामोशी, कोल्हाटी यांच्याच तर वाड्यावस्त्यांत आम्ही लहानाचे मोठे झालो. कितीतरी रामोशी समाजातले सहकारी सत्याग्रहात तुरुंगातही सोबती होते. आणि सर्व जातीजमातींचा 'सामाजिक दस्तऐवज' या ग्रंथरूपाने लक्ष्मणने मराठी सारस्वतापुढे मांडला आहे. सार्यांचे डोळे उघडले असतील इतके अंजन त्यांनी आम्हां कर्त्यांच्या डोळ्यांत घातले आहे. भाषेच्या संबंधी सर्वांनीच त्यांची प्रशंसा केली आहे. पण एक अनुभव सांगतो, मी दिल्लीवरून या पुस्तकाच्या प्रकाशनाला येत होतो, ग्रंथ हातात होता, पुन्हा पुन्हा वाचत होतो. वाडे, तांडे, बिर्हाडं, गाढव, कुत्री, माणसे, झोपडपट्ट्या, चिंध्या पांघरलेली खोपटी. सारे डोळ्यांपुढून हलत नव्हते. एवढी चित्रमयता लक्ष्मणच्या भाषेत आहे. हे सारे डोळ्यापुढून सरकत असताना कानावर कुत्रे ओरडल्याचा आवाज येऊ लागला. मला या ग्रंथाने झपाटून टाकले होते. वाटले, कोण ताकद आहे या ग्रंथाची. नजरेसमोर चित्र उभे राहतेच पण कानावर कुत्र्यांचे आवाजही येतात. फार कौतुक वाटले. पुस्तक मिटले आणि तंद्री लावून डोळे मिटून बसलो, तरीही कानावर कुत्र्याचा आवाज येतच होता. विमानात कुत्रे कुठून येईल ! माझं कुतुहल जाग झाले, ग्रंथ बाजूला ठेवला आणि बाथरूमच्या निमित्ताने उठलो आणि बाथरूमकडे जाऊ लागलो.