पत्र - ३०
दिनांक ०३-१०-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
दिल्लीतल्या मुक्कामात दुसर्या दिवशी सकाळी दया पवार आणि मी साहेबांकडे दुपारच्या जेवणाला जाणार होतो. मी दिल्ली पहिल्यांदाच पाहत होतो. म.गांधींची समाधी, पं. नेहरूंची समाधी पाहायला आम्ही सकाळी सकाळी गेलो. बर्यापैकी भटकून झाल्यावर आम्ही साहेबांच्या बंगल्यावर पोचलो. साहेब अस्वस्थपणे एका खुर्चीवर बसले होते. आम्हांला पाहिले आणि हसतहसत स्वागताला आले. या, कालच्या गप्पा छानच झाल्या. साहित्याचा या अंगाने खरेच मराठीत विचारच झालेला नाही. भाषिक लोकशाही आपण स्वीकारली नाही. बोली भाषांसाठी वेगळा विचारच केला नाही. ते काही केल्या माझ्या डोक्यातून जात नव्हते. मी सारखा देवराष्ट्रातल्या माझ्या लहानपणी पाहिलेल्या, ऐकलेल्या माणसांबद्दल त्यांचे भाषेबद्दल विचार करू लागलो. असा विचार मनात यायचा, पण अभिजनांच्या भाषेच्या शिकवणुकीचा इतका प्रभाव होता की आपण मराठी बोलावे ते शुद्धच असावे, उच्चारही शुद्ध असावेत यावर माझा नेहमी कटाक्ष राहिला. सदाशिवपेठेचे मानसिक दडपण मनावर असायचेच. बोलत बोलत आम्ही दिवाणखान्यात गप्पा मारीत बसलो. ताईंनाही या गप्पा ऐकायच्या होत्या. दया पवारांच्या कविताही ऐकायच्या होत्या. त्याही येऊन बसल्या. दोघांच्या खर्ुच्या ठरलेल्या असाव्यात. ते आपापल्या आसनावर बसले. आम्ही समोर कोचावर बसलो. साहेब फार कौतुकाने बोलीभाषांवर आपली मते मांडीत होते. कोल्हापुरी मराठी, वर्हाडी मराठी, अहिराणी, कोकणी, मराठवाड्यातली, उर्दूच्या प्रभावाखालची मराठी, सातारी मराठी आणि सदाशिवपेठी मराठी अशी आमची चर्चा सुरू होती. आता भाषेच्या समृद्धीबद्दल आम्ही बोलत होतो. भाषेचे सामर्थ्य साहेबांएवढे कोणाला समजतेय. खेड्यापाड्यातल्या स्त्रियांचे मराठी, साहेब सांगत होते, विठाईच्या भाषेतील गोडवा, ओव्या, जात्यावरली गाणी, सारी तर बोली भाषेतच होती.
'नको बाळांनो डगमगू, सूर्य चंद्रावरला जाईल ढगू' हे त्यांनी कितीतरी वेळा वेगवेगळ्या संदर्भात म्हणून दाखवले. साहेब मराठीवर किती मनापासून प्रेम करतात ते समजत होते. स्त्रियांना तसेही फार अदबशीर बोलावे लागते. मोजूनमापून त्या बोलतात. पल्हाळ नसतो, पण जे बोलतात त्याने सारे मनातले, पोटातले ओठावर येते. स्त्रीची स्थिती स्त्रिया किती छान पद्धतीने सांगतात. मी साहेबांना सांगत होतो. बाबा आढावांच्या आई, त्यांना बाई म्हणत असत, त्या फार छान बोलत. अगदी उखाण्यात बोलावे तसे त्यांचे बोलणे सहज असे. 'बायाजी जात, कांद्याची पात, दिली लाथ, गेली वाहत' किंवा 'काय बाई जमीनजुमला बाबांसाठी केला नाहीत ?' असे गमतीने म्हणावे तर त्या म्हणाल्या, 'न्हाय न्हाय, तसं कसं ? बाबाला जमीन हाय की, थुक्यानं भिजवतो आन् चांदण्यात वाळवतो.' साहेब आणि वेणूताई हसू लागल्या. तसे बाबांचे मराठीही ऐकण्यासारखे. ते एका पोक्तशा बाईचा किस्सा सांगत होते. हडपसरला ते त्यावेळी प्रॅक्टिस करत असत. त्यांच्या साहाय्यक डॉक्टराने तिला तपासले. तिचा काहीतरी समज झाला. ती त्याला म्हणाली, 'मूठभर कॅस, कवळीभर काया, आन् त्याजवर भुललास व्हर रं माझ्या राया.' बाई संतापाने बाबाकडे तक्रार करीत होती. मराठीतले हे वैभव मराठी भाषेत आले नाही. लिहिणारी, वाचणारी, चर्चा करणारी तोवर एकच जात होती ना ? इतरांनी नुसते त्यांचे भजन करायचे !
दयाने मराठीतल्या शिव्यांबद्दल साहेबांना सांगितले. लक्ष्मणने मराठीतल्या शिव्यांबद्दलही वेगळी भूमिका मांडली होती. मी पण उडालो होतो. त्याचा आक्रमकपणा हा खास त्याचाच असतो. अशी प्रस्तावना केली नि मी शिव्यांबद्दल सांगू लागलो. आम्ही कोल्हापुरातल्या कॉलेजातले मित्र, 'रांडेच्या' ही एकच शिवी किती पद्धतीने देत असू ते सांगितले. प्राध्यापकाने एखादा विषय छान शिकवला तर आम्ही म्हणायचो, 'काय रांडचं शिकवितय', मित्राला तंबाखू मागायची तर काड रांडच्या तंबाखू, रांडच्यानू चहा देशिला की नाही. हा रांडच्या शब्द इतका वेगवेगळ्या पद्धतीने कोल्हापुरी लोक वापरतात की ती शिवी वाटतच नाही. रांडच्या म्हणजे ठेवलेल्या बाईच्या असे काही कुणाला म्हणायचे नसते. रांडच्या बाहेर ये तुला दाखवतोच, मिशाला ताव मारीत तिरीमिरीने बोलला की ती शिवी होते. साहेबांच्या भाषणांतही कधीकधी शिवी येते. असे म्हटल्यावर तर ते अवाकच झाले. अहो, काय म्हणताय काय ? होय साहेब, सातारचा माणूस, च्या आयला म्हणल्याशिवाय राहतच नाही. इतक्या सहजपणे तो हा शब्द वापरतो की त्याचे त्यालाही माही नसते. इतका तो लोकभाषेत गुंतलेला असतो. त्याने आपल्या भाषणातही तो येतो. च्याआयला लक्ष्मण, हे भलतेच निरीक्षण आहे, असे डोळे मिचकावीत म्हणून साहेब हसू लागले. दया ते 'बलुत्या'तले कवाखान्यातले जगणे समजले. चानी, बोटी, असे उल्लेख आले. मीही लहानपणी ते ऐकलेत. पण अर्थ उलगडत नाही.