साहेब, कसली आलीय टक्केवारी ? मी मॅजेस्टिक गप्पांमध्ये बोलत होतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष होते ना.ग.गोरे, अनिल अवचट, प्र.ना.परांजपे आणि अरुण खोरे माझी खुली मुलाखत घेत होते. एका प्रश्नाचे उत्तर देताना मी म्हणालो, आजचे साहित्य, संगीत, कला आणि संस्कृती साडेतीन टक्क्यांची आहे. म्हणजे मूठभर लोकांची आहे. त्यात सारे साहित्यिकप्रवाह आले. अभिजन आले नि दलितग्रामीणही आले. सारा साहित्य-कलांचा व्यवहार समाजातील मूठभर लोकांचा असतो, असे मला म्हणायचे होते. कार्यक्रम छान झाला. दुसर्या दिवशी वर्तमानपत्रांनी मथळे केले आणि माझ्यावर आगपाखड सुरू झाली. मी ब्राह्मण द्वेष्टा ठरवला गेलो. अनेक ब्राह्मण मित्रांनी तोंडे फिरवली. मी लढणारा कार्यकर्ता, मी गडबडलो. मग मला अर्थ कळला, साडेतीन टक्के लोकसंख्या ब्राह्मणांची आहे. साडेतीन शहाणे, यातील साडेतीन शब्दाला पेशवाईचा वास आहे. मग मी त्याचेच हत्यार केले आणि सांस्कृतिक संघर्ष सुरू केला. माझ्या पद्धतीने. आता बघा, मी 'उपरा'त जी भाषा वापरली ती अशुद्ध आहे. आम्ही बोलतो ती अशुद्ध आणि पुण्यातल्या सदाशिव पेठेतली स्त्री जी भाषा बोलते ती शुद्ध. मी विचारले, हे कुणी ठरवले शुद्ध आणि अशुद्ध ? भाषा भाषाच असते, ती शुद्ध नसते अशुद्ध नसते. ती श्लील ही असते आणि अश्लीलही नसते. 'पाणी'तला न नळाचा की बाणाचा यावर मास्तर मार्क देणार. ण आणि न काय फरक आहे ? आमचे खेड्यापाड्यातले लोक असे नाकातून बोलत नाहीत. म्हणून त्याची भाषा अशुद्ध हे मला मान्य नाही. उलट सदाशिवपेठी मूठभर लोक 'ण' म्हणतात बाकी सारे 'न' म्हणत असतील तर भाषा शुद्ध कोणाची ? भाषेत लोकशाही का नको. आम्ही सारे काळ्या रंगाचे. माझी आई काळी, बहीण काळी, बायको काळी, आपण तिघेही काळे, पण माझ्या आईला सून हवी ती गोरीपान. हे गोर्या रंगाचे वेड कशासाठी ? आपली माती काळी, आमच्या भूमातेचा रंग काळा, आमचा रंग काळा. तरीही आमची मानसिकता गोरी का ? मी या मानसिक गुलामगिरीविरुद्ध आहे. ही गुलामी टाकून दिली पाहिजे.
साहेब सारे मन लावून ऐकत होते. वेणूताई खुर्चीत केव्हा येऊन बसल्या ते समजलेच नाही. पुन्हा चहा झाला. गप्पा पुन्हा रंगल्या. साहेबांच्या चेहर्यावरची उदासी काही वेळ तरी गेली. साहेबांकडे कुणीतरी भेटायला आले आणि आमचे बोलणे थांबले. या या मंडळी, म्हणून साहेब उठून आत गेले. काही स्त्रिया होत्या. स्थानिक असाव्यात. आम्ही आपसात बोलत बसलो.
थोड्या वेळाने पाहुणे गेले. आम्ही जेवायला उठलो. जेवतानाही मी माझे सौंदर्यशास्त्र सांगतच होतो.
रा.भा. पाटणकरांना ऐकवले का, लक्ष्मण ? साहेब म्हणाले.
साहेब, ती मोठी माणसे, काय बोलतात, सौंदर्यशास्त्रावर मला काही कळत नाही. त्यांचा मोठा ग्रंथ आहे. तो मी पुन्हा पुन्हा वाचला, पण त्यातले मला काही समजले नाही. मग मी नाद सोडून दिला.
साहेबांचा निरोप घेतला. अशोककडे परत गेलो. साहेबांनी पुन्हा सकाळी बोलावले होते. ते आता खूप खूष होते.
ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.
तुझा,
लक्ष्मणकाका