• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३०-३१०२०१२-१

दयाने सांगितले, ढोरे फाडायची, मांस वाटून घ्यायचे, इतके मांस एकावेळी शिजवून खाता येत नाही.  हे सारे मृत जनावरांचे मांस.  ते घरी आणायचे, दोर्‍या बांधायच्या, त्या दोर्‍यांवर मांसाच्या बोंबलासारख्या पट्ट्या काढून वाळायला घालायच्या.  त्यांना म्हणतात चाण्या.  चारपाच दिवस असे मांस वाळवायचे.  ते अगदी कडकडीत बोंबलासारखे वाळले की त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे.  बोटाएवढे त्याला बोटी म्हणायचे.  त्या बोट्या मग डेर्‍यात भरून उतरंडीला लावायच्या.  पावसाळ्याच्या दिवसांत त्या काढायच्या.  सुगडात शिजवायच्या.  किंवा खरपूस भाजायच्या.  छानपैकी खिशात घालायच्या.  शेंगदाणे, फुटाणे खात हिंडावे तसे खिशात घालून आम्ही खात फिरायचो.

डल्ली, डुल्ली म्हणजे ?  साहेबांनी विचारले.  
डल्ली, डुल्ली म्हणजे मोठ्याचे मांस.

काय विलक्षण जग आहे दया.  भाषेचे वैभव म्हणून या गोष्टीकडे खरेच मराठी माणसांनी पाहिलेच नाही.  दलित साहित्याने मराठीला फार समृद्ध केले असे मी मानतो.  मी मनापासून त्याचा समर्थक आहे.  मला ही भाषा माझीच वाटू लागते.  पण लक्ष्मण, त्या शिव्यांचे मध्येच राहिले.

मी सांगू लागलो.  साहेब, शिव्या आणि ओव्या तितक्याच उत्कट असतात.  दोन्हीतली उत्कटता काळजाच्या देठापासून आलेली असते.  रागाचा नि लोभाचा तो आविष्कार असतो.  तो थेट या हृदयीचा त्या हृदयी जात असतो.  कविता आणि शिवी तेवढीच ताकदीने येत असते.  'अंधार्‍या कोठडीत म्हातारी मेली, पाच मुलं असून दोघांनीच नेहली.  ओळखा ?'  साहेब हसू लागले.  कोणालाच उत्तर कळेना.  ताई शांत बसल्या होत्या ऐकत, दया नि साहेब म्हणाले, नाही बाबा कळत.  तुम्हीच सांगा.  ताई म्हणाल्या, थांबा मी सांगते, लहानपणी फलटणला असताना मी ऐकलय सांगू ?  हां ताई सांगा.  नाकातला शेंबूड !  साहेबांना इतके हसू आले की डोळ्यांतून पाणी आले.  इतके छान की कविताच की ती.  साहेब, मराठी भाषा आणि तिच्यातल्या शिव्या यावर संशोधन झाले पाहिजे.  मुडद्या, किरड्या, तुझा मुडदा गेला, भाड्या, तुला खाल्ला आराबानं, तुझी डोली शिनगारली, या शिव्या 'उपरा'त आल्या आहेत.  'उपरा'च्या समीक्षेत समीक्षकांची भाषा न समजल्याने मोठीच गोची होते.  खरडा माहीत नसतो, शिंच्या ही शिवी वाटत नाही.  शिंच्या म्हणजे शिंदळीच्या म्हणजे ठेवलेल्या बाईच्या.  ही शिवी वाटते का ?  सहज येते.  शिंच्या तेवढ्याच सहज येते.  शिंच्या व रांडच्या दोन्हीचा अर्थ एकच, पण एक येतं झणझणीत तांबड्या रस्यासारखा तर दुसरा एक येतो बुळबुळीत तूप लावल्यासारखा.  रांडच्या शिवी वाटते, तुझी डुली म्या शिनगारली म्हणजे एका समीक्षकाने लिहिले डोली म्हणजे हिंदी सिनेमातली डोली.  जिच्यात नवरी मुलगी बसून येते.  साहेब, समीक्षकांना बारामतीचे डोले पाहायला नेले पाहिजे नाही, मराठी भाषिक अलंकाराची जाण खेड्यापाड्यातल्या लोकांना नसते.  अलंकारांची ओळखही नसते.  पोटपुजा करणार्‍यांनी व्याकरणे निर्माण केली.  'घेणं ना देणं आन् खंदील लावून येणं.'  आहे का कुठे इंद्रियगोचरता, पण अर्थ अश्लिल आहे.  कित्येकदा अभिव्यक्तीतले शब्द इंद्रियगोचर असतात, पण अर्थ फार साळसूद असतो.  अशा असंख्य शिव्या मी साहेबांना सांगितल्या.  लहानपणी तर मीही या शिव्या ऐकल्यात, दिल्यात नि घेतल्यात.  बहुसंख्य शिव्या आई, बहिणीवरून येतात.  बहीणच्योत अशी सामान्य शिवी.  भगिणी भोग्या असे कुणी म्हणीत नाही.  मादरच्योत म्हणजे मातृगमण्या असे कुणी म्हणीत नाही.  माझे शिव्यांचे भांडार पाहून ते आणि ताई अवाकच झाले.  तरीही ताई तेथे असल्याने मला मर्यादा होत्या.  आमच्या लोकात इतक्या सहजपणे शिव्या देतात की त्या शिव्या वाटतच नाहीत.  यांच्या नाकाला रूमाल लागतात.  मला सुकटीचा वास सर्वांत सुंदर वास वाटतो.  मोगर्‍याचा नाही.  मोगरा माझ्या वाट्यालाच कधी आला नाही.  तरवडाची फुले सर्वांत सुंदर.  धोतर्‍याचे फूल सर्वात देखणे.  असे माझे तर्‍हेवाईक म्हणता येतील असले सिद्धांत.  मराठीतल्या संतांनी दिलेल्या शिव्या, चव्हाणसाहेबांचे वाचन किती अफाट होते.  सहजपणे ते श्लोक मुखोदगत म्हणत असत.  तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास आणि त्यांनी दिलेल्या शिव्या साहोंना भराभर आठवत होत्या.  जनाबाई, नामदेव आणि पांडुरंगभक्तांनी वाहिलेली लाखोली.  त्यांच्या पांडुरंग भक्तीचे पुरावे म्हणून आजही मराठी माणूस या संतांना काही शिवराळ म्हणत नाही.  साहेबांना मराठी भाषेतला हा तिखटजाळ रस्सा खास पुरण पोळीतल्या येळवणीसारखा वाटला.  खूप वेळ बोलत बसलो होतो.  एखादा फड जमावा तसे.  मध्येच ताई आत गेल्या.  जेवणाचे वाढले होते.  पिठले-भाकरी-वांगे असा खास मराठी बेत.  बाजरीची, ज्वारीची भाकरी खात गप्पा सुरू होत्या.