तर माझ्याच थोडेसे मागच्या सीटवर एक गोर्या गोमट्या मध्यमवर्गीय बाई आपल्या कुत्र्यासमवेत विमान प्रवास करीत होत्या. त्यांच्या पांढर्याशुभ्र केसाळ कुत्र्यासाठी स्वतंत्र सीट ! ते कुत्रे त्या कुरवाळीत होत्या आणि ते आवाज काढीत होते. मी पुढे जायचा मागे वळलो. जागेवर येऊन बसलो. आणि एक प्रचंड अपराधीपणाची भावना माझ्या मनात दाटून आली. ती अजूनही जात नाही. एका बाजूला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या प्राथमिक गरजा पुर्या होत नाहीत म्हणून जनावरांच्या पातळीवर जगणारी या ग्रंथातली माणसे. एकमेकांना दारिद्र्याने ग्रासल्याने खाऊ की गिळू करून संतापून भांडणारी, पंचायती बसवणारी माणसे, लक्ष्मण मानेंनी अतिशय समर्पक भाषेत आपल्या समोर मांडली आहेत. ही माझी माणसे माझीच आहेत. या दोघांतले जीवघेणे अंतर आता आम्ही कसे मिटवणार आहोत ? श्रीमंतीला काही मर्यादा आहे काय ? बाबा, आम्ही खूप काही केल्याचा गर्व मला असे, पण ही दोन टोके पाहिली की मनाच्या चिंध्या होतात, उद्ध्वस्त होतो. स्वातंत्र्य काय यासाठी मिळवले होते ? पंडितजींनी पाहिलेला समाज काय असा होता ? बाबा, याचे दुःख होते की आता राजकारण गरिबांचा हक्क राहणार नाही. तो पैसेवाल्यांचा खेळ केव्हाच झाला आहे. ज्या बहुजनांसाठी, त्यांच्या सुखी संसारासाठी लोकशाही स्वीकारली. तो विचारच विमानातून फिरणार्या या वर्गाला भिडत नाही. याचे मला अत्यंत यातना देणारे दुःख होते. जेव्हा हातात होते तेव्हा काही करण्याचा प्रयत्न जरूर केला, पण तो अत्यंत अपुरा आहे. मी निराश बिल्कुल नाही. ज्या समाजात माणूसपणाची जाणीव नाही, तेथे स्वत्व कसे येईल ? ते येऊ लागले याचा इसार हा ग्रंथ आहे, आणि त्यांचे शिक्षण हा इलाज आहे. मी, तुम्ही आपण सार्यांनीच या वर्गाच्या शिक्षणाकडे आईच्या मायेने पाहणे आवश्यक आहे. मी लक्ष्मणशी यासंबंधी बोललो आहे. आपण सर्वांनी एक काम एकत्र करण्याचा निर्णय केला आहे, या वर्गाच्या शिक्षणाला पर्याय नाही. उरलेल्या काळात हे काम अंगावर घ्यायचे आहे, चांगला संच जमला आहे. भटक्याविमुक्तांच्या नव्या जाणिवांनी उभ्या राहणार्या या मुलांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू, आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या तरी नक्कीच सुजाण होतील यासाठी आपण काम करायला लागेल. लक्ष्मण माने यांना लागेल ती मदत य कामात करण्याचे मी ठरवले आहे. मराठी भाषा, साहित्य या निमित्ताने समृद्ध होत आहे याचाही मला तेवढाच आनंद आहे.''
अत्यंत भारावल्या शब्दांत बाबांनी या सभेचा समारोप केला. माझ्या पाठीशी उभे राहण्याचे त्यांनीही जाहीर केले. आमच्या संस्थेच्या कामाला गती मिळाली होती. सभा संपली, साहेब मला म्हणाले, 'लक्ष्मण, एका अत्यंत चांगल्या मित्राला मी भेटून आलोय. आपल्या कामासंबंधी त्यांच्याशी बोललोय.' मी कुतूहलाने विचारले कोण ? ते म्हणाले, अण्णासाहेब शिंदे, माजी मंत्री, माझे सहकारी होते. फार मोठ्या मनाचा माणूस आहे. इकडे येण्याअगोदर मी त्यांच्याकडेच होतो. आपल्या या प्रश्नाची मोठी जाण आहे. एकदा जाऊन भेटून ये, आवडतील तुला. मी गाडीपर्यंत पोचवायला निघालो. बरोबर शामराव पवार, रामभाऊ जाशी होते. दारातून बाहेर पाऊन पडले आणि प्रचंड कडकडाट करीत मुसळधार पाऊस सुरू झाला. गाडीपर्यंत जाईपर्यंत साहेब पावसाने चिंब भिजले. मीही भिजलो होतो. ते गाडीत बसले. हात हातात होता. पावसाचे बरसणे सुरू होते. साहेबांनी दिल्लीला यायला सांगितले. ही माझी-त्यांची नियतीने शेवटचीच भेट घडवली होती. हे आम्हा दोघांना ठाऊक नव्हते. काळ अनंत असतो, अनादि असतो, आणि तो निष्ठुरही असतो. त्यानंतर त्यांचे-माझे बोलणे झाले, ते सोलापुरातून दिल्लीला मी येऊ का म्हणून विचारत होतो. ते आजारी होते. मला म्हणाले, चिंता कसली करता ? मी दोन दिवसात बरा होईन. येण्याची गरज नाही. पण साहेब पुन्हा भेटलेच नाहीत. त्यांनी दिलेली जबाबदारी मी यथावकाश पार पाडीत आहे. त्या कार्यक्रमाला गं. ना. जोगळेकर उपस्थित होते. पुण्यातले मोठमोठे विद्वान गृहस्थ सभेला होते. सारे माझे अभिनंदन करीत होते. बाबांनी त्या दिवशी केलेले भाषणही मोठे विलक्षण होते. चव्हाणसाहेबांना त्यांनी सांगितले, साहेब, आता गर्दी हटली आहे. पांगापांग सुरू आहे. हात ओला करण्याची शक्ती होती. तोवर भुते होती. त्यावर बाबांना टाळी देत चव्हाणसाहेब म्हणाले. बाबा, खरे सांगू, सोने पांघरून चिंध्या विकत होतो. गर्दी हटता हटत नव्हती. आता चिंध्या पांघरून सोनं विकतोय कुणी फिरकता फिरकत नाही. हा जगाचा शिरसता आहे. सारे संचित आपण या दुबळ्यांमागे उभे करूया. लक्ष्मण, हे काम कसे करणार मला समजत नाही. काळ मोठा विपरीत आहे. ही वार्यावरली वरात, ही वार्यावर उधळलेली पाखरे हा कशी गोळा करणार ठाऊक नाही. मी आशीर्वाद तर देतोच आहे, पण त्याने भागणार कसे ?
साहेब, आपले आशीर्वाद लक्ष्मणला मिळाले ही फार मोठी गोष्ट आहे. साहेब डोळे पुशीत होते. बाबांना फार कमी वेळा मी हळवे, कातर होताना पाहिले आहे. तेही डोळ्यांच्या कडा पुशीत होते.
सुप्रिया, एस.एम.नीही असेच डोळ्यांनी मला आशीर्वाद दिलेत. आज दिसणारा संस्थेचा परिसर अथक कष्टाने उभा केलाय. तो काही कुबेराच्या धनावर उभा नाही. तो एस.एम., यशवंतराव, बाबा यांच्या आशीर्वादांच्या बळावर उभा आहे. प्राण कंठात असेपर्यंत मी माझे ध्येय सोडणार नाही. या दुबळ्यांच्या पाठीमागे सारा समाज उभा करीन. शब्दांनीच पेटतात घरेदारे, नि माणसे हे ठाऊक आहे मला. जसे जीवभावाचे मित्र असतात, जीवाला जीव देणारे. तसे विरोधकही असतात धार लावून तलवारींना, ठाऊक आहे मला. कोणत्याही संकटाची पर्वा न करता करावा लागणारा आहे हा लांबचा प्रवास. पायातले बळ संपेपर्यंत चालणार आहे हा काट्याकुट्याचा रस्ता. तुझ्यासारखी तरुण पोरे आहेतच की सोबतीला. थोरामोठ्यांचे बळ हीच असते शिदोरी. त्यांना आठवावे, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालत राहावे. यशापयशाची चिंता करून उपेक्षितांचे, वंचितांचे प्रश्न सुटत नसतात. हेही ठाऊक आहे मला. चव्हाणसाहेबांना निरोपताना सारा महाराष्ट्र दुःखसागरात बुडाल्याचे मी पाहिले आहे. लाखांचया गर्दीत त्यांना त्यांच्या आवडत्या कृष्णाकाठावर चिरनिद्रा घेताना मी पाहिले आहे. क्वचित असे वर्ष असेल त्यांच्या जयंती-पुण्यतिथीला मी कृष्णाकाठावर गेलो नाही. आजही त्यांच्या स्मृती जागवत त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे हजारो लोक त्यांच्या समाधीवर माथा टेकवतात.
ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.
तुझा,
लक्ष्मणकाका