• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २९-०२१०२०१२-१

येताना दिल्लीला आलो.  आम्ही दिल्लीला येत असल्याचे साहेबांना आधीच कळवले होते.  विमान मध्यरात्री पोचणार होते.  साहेबांनी आमच्यासाठी गाडी पाठवली होती.  आम्ही विमानतळात बाहेर आलो.  गाडी शोधली, पण दिसलीच नाही.  इतक्या मध्यरात्री साहेबांनी गाडी नसेल पाठवली असे समजून आम्ही भाड्याची गाडी केली.  पण जायचे कुठे ?  दया सिनियर.  तो म्हणाला, दिल्लीत महाराष्ट्रीय लोकांचे महाराष्ट्र भवन आहे तेथे जाऊ.  गाडीने आम्हाला तेथे नेले.  सोबत मोठ्या बॅगा.  जिना चढून वर गेलो.  बेल वाजवली.  त्यांनी दार उघडले.  त्रासानेच आत घेतले.  आम्ही थेट अमेरिकेहून आलोय.  आम्हाला एक रूम हवी आहे.  उद्या ती आम्ही सोडू असे सांगितले.  त्या गृहस्थाने सारे ऐकून घेतले.  मराठी भाषक असल्याने ते चांगले बोलत होते.  आम्ही दोघे लेखक आहोत म्हटल्यावर त्यांनी आस्थेने विचारावयास सुरुवात केली.  दयाने काय लिहिले आहे ते त्याने सांगितले, मी काय लिहिले आहे ते मी सांगितले.  आमच्या पुस्तकांचे विषय समजले.  न सांगता आमची जातही समजली.  झाले !  गृहस्थ गप्प झाले.  शांतपणे म्हणाले, क्षमा करा, पण इथे एकही रूम नाही.  मी देऊ शकत नाही.  शिल्लकच नाही.  आता काय करायचे ?  जायचे तर कुठे ?  सकाळपर्यंत आम्हाला इथे थांबू द्या. पहाटेचे चार वाजलेत.  सारे सांगून झाले.  मात्र त्यांनी आम्हाला अक्षरशः हाकलून दिले.  बॅगा घेऊन खाली फुटपाथवर आलो.  बॅगाना टेकून उभे होतो.  थंडीचा कडाका पडलेला.  अंगात उबदार कपडे होते, पण बेचैन होतो.  अशोक जैन महाराष्ट्र टाइम्सचे दिल्लीतील प्रतिनिधी होते.  त्यांचा फोन दयाकडे होता.  पण इतक्या अवेळी फोन कसा करावा ?  दोन तास फूटपाथवर आम्ही दोघे उभे राहिलो.  सकाळी सहा वाजता, दयाला थोडा अनुभव असल्याने, तो पुन्हा भवनात गेला.  तेथून चव्हाणसाहेबांचा नंबर मिळवून त्यांना फोन केला.  आता उजाडले होते.  साहेबांनी फोन घेतला.  अरे बाबांनो, तुम्ही आहात कोठे ?  मी रात्रभर काळजीत आहे.  गाडी मोकळीच परत आली.  तुम्ही आलात की नाही ?  काय झाले काय ?  दयाने सारे सांगितले.  साहेब शांत झाले.  म्हणाले आता टॅक्सी करा नि १ रेसकोर्स सांगा.  मी वाट पाहतोय.  आम्ही साहेबांकडे गेलो.  साहेबांनी विचारपूस केली.  त्यांनी तीन वाजताच गाडी पाठवली होती.  तासभर वाट पाहून ती मोकळीच परत आली.  आमचाच वेंधळेपणा नडला होता.  त्यांची काय पंचाईत झाली असेल या विचाराने आम्ही फार शरमून गेलो.  दयाने अशोक जैनांना फोन केला.  अशोकला सारी स्थिती सांगितली.  तोही आवाक झाला.  म्हणाला, माझ्याकडे या.  साहेब म्हणाले, आता चार दिवस माझ्याकडे राहा, पण आम्हाला अपराधी वाटत होते.  आम्ही अशोककडे जातो असे सांगितले.  संध्याकाळी गप्पा मारायला येतो असे सांगितले.  साहेब म्हणाले, आता बॅगा उचला नि आत चला.  सारे उरका, मग पाहू काय करायचे ते.  साहेबांनी एका रूममध्ये आम्हांला नेले.  फ्रेश होऊन हॉलमध्ये आलो.  साहेबांची काळजी,  जागरण हे सारे कुठल्याकुठे पळून गेले होते.  पोहे पोटात गेले, चहा झाला.  आता रात्रीचा प्रसंग सांगून आम्ही हसायला लागलो.  साहेब म्हणाले, आपण सांयकाळी सातच्या सुमारास या.  गप्पा मारायच्या आहेत.  अनेक विषयांवर मला तुमच्याकडून समजावून घ्यायचे आहे.  आम्ही बॅगा उचलल्या.  साहेबांनी त्यांच्या गाडीने आम्हाला अशोक जैन यांच्या घरी नेऊन सोडले.  अशोककडे आम्ही दोन दिवस राहिलो.  अशोक त्यावेळी 'ग्रंथाली'चा विश्वस्त असावा.  'ग्रंथाली' माझी व दयाची प्रकाशक.  दिवसभर दिल्लीत भटकलो.  सायंकाळी साडेसहा-सात वाजता पुन्हा साहेबांकडे गेलो.  आम्ही दोघे सोफ्यावर बसलो.  साहेबांनी हसत आपुलकीने स्वागत केले.  ते एका खुर्चीवर बसले.  शेजारी दुसरी खुर्ची रिकामी होती.  ताई आता होत्या.  दया म्हणाला, साहेब, लोकांचा राबता फारच कमी झालाय असे दिसते.  मागे मी आलो होतो कोण गर्दी होती तेव्हा.  साहेब खिन्नपणे उदास हसले.  दया, उगवत्या सूर्याला सारेच नमस्कार करतात.  मानवी प्रवृत्तीच आहे ती.  ते त्या उदासवाण्या स्थितीततून बाहेर येऊन म्हणाले, त्याचे काय आहे, दिल्लीचा एक नबाब राज्यावर होता.  त्याचे कुत्रे आजारी पडले तेव्हा त्या कुत्र्याचा समाचार घेण्याकरिता दिल्लीतल्या लोकांनी त्याच्या वाड्याबाहेर रांग लावली होती.  पुढे राज्य गेले आणि नबाब स्वतः आजारी पडला तेव्हा त्याच्या समाचाराला त्याचे ते कुत्रेसुद्धा फिरकले नाही !   त्यांच्या बोलण्यातले उदास मन रेसकोर्सवरच्या त्यांच्या प्रचंड घरात गोठून राहिल्यासारखे वाटत होते.

त्या मोठ्या दिवाणखाण्यात साहेब आणि आम्ही दोघे दोन तास गप्पा मारत बसलो होतो.  त्यांनी आणखी एक छान गोष्ट सांगितली.  ते म्हणाले, गर्दीचं मानसशास्त्र मोठे विचित्र असते.  सोने पांघरून चिंध्या विकत होतो.  गर्दी हटता हटत नव्हती.  आता चिंध्या पांघरून सोने विकतो आहे.  कुणी फिरकत नाही.  काय करावे !  चला, आता मला तुम्हा लोकांना काही विचारायचे आहे.  खरे सांगतो, लक्ष्मण जसे बोलतो तसे बोलावे असा मोह मलाही तरुणपणी होत असे.  पण मी लगाम घालत आलो.  आमचे वास्तव वेगळे होते.  आजचे वेगळे आहे.  तुम्ही ताकदीने भाषा वापरता, वाकवता, तिची तलवार करता आणि विरोधकाला घायाळ करता.  बाण कसा लक्ष्यभेद करतो तसे दलित साहित्य आरपार जाते.  शब्दांचे मोठे सामर्थ्य तुम्हा लोकांना बाबासाहेबांनी शस्त्रासारखे दिले आहे.  म्हणून अभिजन काहीही म्हणोत, मी दलित साहित्याचा चहाता आणि समर्थक राहिलो आहे.  दुःख आणि वेदना ही वंचना वाट्याला आल्याशिवाय समजत नाही.  मलाही बसलेली जागा सारवावी लागली होती.  तो सल मी कधीही विसरू शकत नाही.  त्यामुळे लक्ष्मणची साडेतीन टक्क्यांची संस्कृती समजावून घ्यायची आहे.  बोला लक्ष्मण, काय टक्केवारी आहे ती.