पत्र - २९
दिनांक ०२-१०-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
फोर्ड फाउन्डेशनने अमेरिकेला बोलावल्याचे निमंत्रण मला सातारला मिळाले. माझा आनंद गगनात मावेना. गाढवांच्या मागे जाणारा, हागणदारीत राहणारा, रोज शिव्याशाप खाणारा मी माणूस, अमेरिकेला विमानात बसून जाणार होतो ! साध्या एस.टी.ने सुद्धा मी जाताना दहा वेळा विचार करत असे. आता अमेरिकेला आणि तेही त्यांच्या खर्चाने जाणार होतो. सातारकरांनाही मोठा आनंद झाला होता. लोक फार मोठ्या संख्येने भेटायला येत असत. रोज फुलांचे हार, गुच्छ यांनी घर भरलेले असे. शशीसाठी, माझ्यासाठी ही मोठी आनंदाची बाब होती. भाईला कळू लागले होते. तर समता अगदीच लहान होती. आम्ही अजून झोपडपट्टीतल्या जागेतच राहत होतो. राज्यभरातून लोक येत असत. लक्ष्मण माने या माणसाला पाहायला. खरे तर माझे काहीही झाले असते. म्हणजे असे यश 'उपरा'ला मिळेल हे काही माझ्या स्वप्नातही नव्हते. माझ्या कानात वारे शिरले असते तर, पाय जमिनीवर राहिले नसते तर ? तर मी आज जसा आहे तसा नसतो हे नक्की. माझे पाय जमिनीवर राहिले ते शशीमुळे, मित्रांमुळे, बाबा आढाव, अनिल अवचट, सुनंदा अचवट आणि यशवंतराव या माझी सातत्याने काळजी घेणार्या ज्येष्ठांमुळे. फोर्ड फाउन्डेशनच्या दिल्लीच्या प्रतिनिधी पुष्पा सुंदर यांची तार मला मिळाली. त्यांनी तात्काळ दिल्लीला बोलावले होते. काही कागदपत्रे पुरी करायची होती. मी अपपासाहेब भोसल्यांकडून साहेबांना तसे कळविले. साहेबांचा निरोप आला. येथे पोहचल्यावर फोन करा. मी दिल्लीला कधी गेलो नव्हतो. आता कसे करावे ? बाळासाहेब थोरात नावाचे समाजवादी युवक दलातले माझे एक स्नेही होते. फार छान माणूस. तेही मला जावई मानत असत. त्यांनी बरोबर यायची तयारी दाखवली. आम्ही सातार्यातून ट्रेनने दिल्लीला गेलो. पहिल्यांदाच मी देशही पाहत होतो. रेल्वेच्या प्रवासाने सारा प्रदेश न्याहाळीत प्रवास करता येतो. आम्ही दिल्लीला पोहोचलो. साहेबांना फोन केला. पुष्पा सुंदर यांना भेटायचे आहे. कागदपत्रे, व्हिसा, पासपोर्ट असे कायकाय करायचे आहे असे सांगितले. साहेब म्हणाले तुम्ही आहात तिथेच थांबा मी गाडी पाठवतो. अर्ध्या तासात गाडी आली. गाडीत साहेबांचे पुतणे अशोकराव होते. ते मला ओळखत असल्याने त्यांनी आम्हाला साहेबांच्या घरी नेले. मी पहिल्यांदाच रेसकोर्सवरले त्यांचे घर पाहत होतो. साहेबांनी अनपेक्षितपणे जे मनापासून स्वागत केले त्याने मी अगदी भारावून गेलो. छानसा मोगर्यांच्या फुलांचा हार साहेबांनी माझ्या गळ्यात घालायला हात वर नेले. मी वाकून त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी दिलेला हार वरच्या वरच धरला. साहेब, तुमचे आशीर्वाद मिळाले यातच सारे आले. साहेबांनी सोफ्यावर बसायला सांगितले आणि आत गेले. वेणूताईंना बरे नव्हते. अंगात ताप होता. तरीही तशाच बाहेर आल्या. मी वाकून नमस्कार केला. त्यांनी सांगितले, 'उपरा' त्यांनी तीन वेळा वाचले. फलटणचे लहानपण आठवले. त्यांना खूप थकवा होता. साहेबांनी त्यांना पुन्हा आत नेऊन बेडवर झोपवले. चहा आला. साहेब म्हणाले, तुम्ही मोदी इस्टेटला जाऊन या, पुष्पा सुंदरला नमस्कार सांगा. फार छान बाई आहेत. तुम्हाला त्या सगळी मदत करतील. परत या. जेवू नि मग पासपोर्ट आदी गोष्टी करूया.
ताईंना बरे नसल्याने साहेब थोडे काळजीत होते. मी त्यांच्या गाडीने अशोकरावांना घेऊन फोर्ड फाउन्डेशनच्या कचेरीत पुष्पा सुंदरना भेटलो. त्यांना मला कामकाजासंबंधी कागद द्यायचे होते. नॅरेटिव्ह रिपोर्ट, टाइम बजेट, आर्थिक खर्चाचे नियोजन असे सारे कागद दिले. माझे दिल्लीचे काम झाले होते. मला लगेच परतायचे होते. वेळ थोडा होता. आम्ही साहेबांच्या घरी आलो. बाळसाहेब थोरातही बरोबर होते. त्यांची ओळख साहेबांशी करून दिली. त्यांचे थोरले बंधू फलटणला मोठे पत्रकार होते. शाहे थोरात. ते आणि साहेब एकमेकांना ओळखत असत. आम्ही बाजरीची भाकरी, भरलेलं वांगे, मटकीची उसळ असे छान जेवलो. गाडीनेच साहेबांनी आम्हाला रेल्वे स्टेशनला सोडले. दिल्ली पाहायला परत या. निवांत वेळ काढून माझ्याकडेच राहयचेय. शशी-मुलांना घेऊन या. असे हसत हसत त्यांनी आम्हाला निरोप दिला. यशवंतराव, ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी, दिनू रणदिवे, काकोडकर या सर्वांनी मला पासपोर्ट-व्हिसासाठी सारी मदत केली. माझ्यासोबत दया पवार यांना फोर्ड फाउन्डेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. आणखी एक तामिळनाडूतल्या सी.एस.लक्ष्मी नावाच्या बाई होत्या. त्यानाही फोर्ड फाउन्डेशनचीच शिष्यवृत्ती मिळाली होती. दया माझ्यापेक्षा ज्येष्ठ. त्याचे 'बलुतं' खूप गाजले होते. ते आणि मी मुंबईहून अमेरिकेला गेलो. २५ डिसेंबर ८१ रोजी अमेरिकेत मोठा कार्यक्रम करून फाउन्डेशनने आम्हाला शिष्यवृत्त्या दिल्या. दोन दिवस कार्यक्रम होता. त्यानंतर आम्ही जवळपास तीन आठवडे न्यू यॉर्कमध्ये होतो. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही भारतात परत आलो.