• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २०-१२०९२०१२-१

साहेब फ्रेश होत होते.  आम्ही आल्याचे त्यांना समजले.  त्यांनी खोलीत बोलावले.  मी, आप्पासाहेब आत गेलो.  चव्हाणसाहेब फार छान हसत.  ते हसणे एवढ्या जवळून मी बघत होतो.  'बसा' म्हणाले.  'काय लक्ष्मण, कसे आहात ?'  सुप्रिया, तुला सांगतो, 'लक्ष्मण' या शब्दाचा एवढ्या मायेने उल्लेख तर माझ्या आईनेसुद्धा केला नव्हता.  तिचा मी लक्ष्या होतो.  सारे गाव मला लक्ष्या म्हणत असते.  बाप्या कैकाड्याचा लक्ष्या हे आपले सार्वजनिक नाम होते.  पुढे ते माने झाले.  नाव मागे पडले, आडनावानेच ओळखला जायचो.  जन्मापासून हाड्या-हाड्या मागे लागलेली.  सन्मानाने, प्रतिष्ठेने भिकार्‍याच्या लेकराला कोण विचारणार, सांग ना ?  कोण त्याला सन्मानाने बोलावणार ?  या 'लक्ष्मण' शब्दाचा इतका चांगला उच्चार ते करीत की अंगावर काटा उभा राही.  माझ्या उभ्या आयुष्यात मला माझे नाव इतके सुंदर आहे, ते इतके मायेने उच्चारता येते, त्याचा इतका चांगला उच्चार करता येतो हे पहिल्यांदाच समजले.  असा अत्यंत चांगला उच्चार करणारी दुसरी व्यक्ती म्हणजे अनिल अवचटांची मुक्ता.  तीही चव्हाणसाहेबांसारखी, 'लक्ष्मणकाका' म्हणते.  आजही ती मला भेटली की 'कायरे लक्ष्मणकाका' म्हणते नि मला साहेबांची प्रकर्षाने आठवण होते. 'काय लक्ष्मण, आई काय म्हणते ?  शशी कशी आहे, मुलं मजेत ना ?  हे विचारल्याशिवाय पुढचे आमचे बोलणे सुरूच व्हायचे नाही.  साहेब कितीही व्यस्त असोत आम्ही गाडीत बसलो की पहिल्यांदा आईची, शशीची चौकशी केल्याशिवाय पुढे बोलणेच सुरू व्हायचे नाही.  त्यात प्रसंगोत्पात काही बदल होत असेल तेवढाच.  पण माझ्या गरीब आईबद्दल आणि शशीबद्दल विलक्षण जिव्हाळा होता.  मी खुर्चीत बसलो.  माझ्या डोळ्यांना धारा लागलेल्या त्यांनी पाहिल्या.  जवळ आले नि म्हणाले, 'अरे हे काय ?  मी काय वाईट बोललो काय ?'  मी म्हणालो, नाही साहेब, मला आपण 'लक्ष्मण' असे म्हणालात की उभ्या जन्मात मला असे कुणी मायेने म्हणाले नव्हते.

दिवस मावळतीला गेला होता.  साहेब गाडीत मागच्या सीटवर बसले.  मी पुढच्या सीटवर बसलो.  आमची गाडी कराडकडे निघाली होती.  आयुष्यात पहिल्यांदाच साहेबांच्या बरोबर मी प्रवास करू लागलो होतो.  सूर्याची किरणे गाडीच्या काचेतून आत येत होती.  फार सुंदर संध्याकाळ होती ती.  'लक्ष्मण, मावळतीला निघालेला हा सूर्य आता थकल्यासारखा झालाय.  पण किरणं किती शांत आहेत नाही !'  साहेब सूर्यावर बोलत होते.  आयुष्यातला अत्यंत मोलाचा क्षण होता.  सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा या सर्वांच्या पलिकडेचा थकलेला एक सूर्य मीही पाहत होतो.  आज सत्तेचा, लाल दिव्यांच्या गाड्यांचा ताफा नव्हता की मागे-पुढे शेकडो गाड्या नव्हत्या.  हजारो माणसांची गर्दी नव्हती.  सुप्रिया, त्या नितळ सायंकाळी एक अत्यंत अनुभवसमृद्ध पिता सूर्याबद्दल बोलता होता.  म्हटले तर माझ्याशी आणि स्वतःशीही मावळता सुंदर सूर्य.  'सूर्य आणि त्याची सोनेरी किरणे.  सह्याद्रीच्या शिखरावर पडलेली.  आता मावळतीला जात असल्याने सावल्याही गडद झालेल्या.  दर्‍यांमध्ये दाटून आलेल्या सावल्या आणि झाडांच्या उंच शेंड्यावर सूर्याची किरणे विसावलेली.  ती पाहा लक्ष्मण, पहिल्यांदा ती त्या झाडांच्या शेंड्यावर पडली आहेत.  नंतर ती झिरपत झिरपत खाली गेली आहेत.  अगदी पार मुळाशी असलेल्या गवतापर्यंत, किती छान !  गवतात तरी तो पंक्तीप्रपंच करतो काय   अठरापगड जातींची गवते, कित्येकांना फुलायचे असते, कित्येक कळ्यांना त्याची ऊब हवी असते.  अशी ऊब तो मायेने त्या पात्यांना, पानांना, कळ्यांना देतो.  त्या फुलतात.  फळतात नि गोड फळे देतात.  ती तरी कुठे स्वतःसाठी फळे तयार करतात ?  वृक्षांनी, वेलींनी तयार केलेली फळे ती थोडीच खातात.  खाणारा खावून जातो, नि वर झाडाला दगडगोट्यांचा मारही खावा लागतो.  दगड मारणारांनाही लक्ष्मण, ती झाडे फळेच देतात.  फळांनी बहरलेले वृक्षच देतात पांथस्थाला आसरा आपल्या सावलीत विसाव्यासाठी आणि लोकही असे की विचारू नका.  ज्या झाडाखाली झोपतात त्याच झाडाला दगड मारतात.  फळे पाडतात, पण वृक्ष कधीच तक्रार करीत नाही.  मला हे मोठे सिम्बॉलिक वाटते.  लक्ष्मण, आंब्याच्याच तर झाडाला लोक दगड मारतात.  बाभळीच्या झाडाला नाही.  मग हा विशाद कशासाठी वाटतो आहे ?  कंठ असा का दाटून येतो आहे.  पाखरे बसतात त्यांना हवा तेवढा वेळ झाडांवर.  वेळ झाली की भुर्रकन जातातच उडून, म्हणून झाड काही तक्रार करीत नाही गेलेल्या पाखरांबद्दल.  आणि ती बसतही नाहीत उंच गेलेल्या ताडामाडाच्या झाडांवर.  या झाडांबद्दल लक्ष्मण, मला लहान असताना फार कुतूहल असायचे.  अगदी उंचच्या उंच गेलेली ही झाडे आणि त्यांच्या शेंड्यावर पडलेली सोनेरी किरणे मान दुखेपर्यंत पाहत असे.  मनातला चंडोल केव्हाच शेंड्यावर पोहचलेला असे.  खरे सांगू, याच्या पायथ्याला ना सावली, ना पांथस्थ, ना गुरेढोरे.  याची फळे तरी कुणी कधी खाल्लीत ?  नुसता उंचच्या उंच वाढलेला ताड.  एकदा मनात यायचे व्हावे या ताडासारखे उंचच्या उंच, नि सार्‍यांनी मान दुखेपर्यंत पाहावे आपल्याला या उंच जागेवर.  पण या उंचीचा उपयोग काय नि कुणाला ?  फार तर मला एकट्याला.  मी क्षणात विचार फेकून दिला मनातून.  नाही असे व्हायचे नाही, एकलकोंडे.  ऊन-वारा-पाऊस झेलीत, फुलत-फळत वाटसरूला, गाईगुरांना पोटाशी घेत आणि प्रत्येकाला दगडांनी मार खात आपल्याला आंब्याच्या झाडासारखेच झाले पाहिजे.  जाईल पक्ष्यांचा थवा उडून.  गेला तर गेला.  चार तरी राघू रहातील ना खोडाच्या बुंध्यात.  त्यांच्या पिलांसाठी पोटात आसरा तयार केला पाहिजे.  घालतीलच साद ती आपल्या जीर्ण झालेल्या खोडाला.'

सुप्रिया, हे स्वगत होते,  प्रकट आत्मचिंतन होते की स्वतःचे सांत्वन ?  मला समजत नव्हते.  मी संकोचून बसलो होतो.  एका म्हटलं तर शोकांतिकेच्या नायकाच्या बगलेत.  ज्याने मोठ्या कर्तबगारीने गाजवले होते आपले सारे जगणे.  हिमालयाच्या मदतीला गेला होता हाच धावून सह्याद्री बनून.  तेव्हा सार्‍या देशाने याला डोक्यावर घेतले होते.  निरोपताना हा सूर्याच्या प्रतिमांची, वृक्षांच्या प्रतिमांची जी मनाशी जुळवाजुळव करीत होताना शब्दांची, आपल्याच सांत्वनासाठी, तीच मोठी विलक्षण गुंतागुंत होती.  पांढर्‍याशुभ्र रूमालाने मध्येच डोळ्यांच्या कडा पुसणारा हा माणूस झाडांशी, पानांशी, फळांशी, गाईगुरांशी बोलणारा हा हाडाचा शेतकरी थकला होता.  परतीच्या प्रवासाला निघाला होता.  आपल्या कृष्णा-कोयनामाईच्या संगमाकडे.  कर्‍हाड केव्हा आले ते समजलेच नाही.  मी मुग्धता तशीच ठेवली होती.  गेली वीस-पंचवीस वर्षे, कुणालाच नव्हते सांगायचे, पण नातीला तर सांगितले पाहिजेना त्यांच्या !  म्हणून सांगतो आहे एवढेच.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका