• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २०-१२०९२०१२

पत्र - २०
दिनांक १२-०९-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

मावळतीला सूर्य कलला होता.  त्याची तिरपी किरणे सोनेरी रंगांची थकलेली, भागलेली, उंच उंच असलेल्या सह्याद्रीच्या शिखरावर पसरलेली.  तशी ती माझ्यासारख्या झोपडपट्टयांमध्ये रहाणार्‍यांचया अंगणात, घरावरही पडलेली.  ''सूर्य कधीच विचार करीत नाही.  हा गरीब याला कशाला देऊ प्रकाश ?  हा मध्यमवर्गीय हा ओरबाडेल, याचेकडे कशाला जाऊ ?  हा श्रीमंत तो सर्वांचा मोठा भाऊ, याचेकडे दिले की देईलच की सर्वांना म्हणून काही फक्त श्रीमंतांच्या हवेल्यावर सूर्य आपली किरणे पसरत नाही.  तो सर्व चराचरांवर पसरतो.  झाडाच्या प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश घेण्याचा तेवढाच अधिकार हक्क आहे, जेवढा अधिकर उंच उंच वाढलेल्या वृक्षाला आहे.  तेवढाच अधिकार जमिनीवर सरपटणार्‍या गवताला आणि झाडांच्या आधाराने वरवर जाणार्‍या वेलीला आहे.  प्रत्येक पान न्हाऊन निघते सूर्याच्या प्रकाशाने.  अशी समता, ममता, माया तो सर्वांवर करीत असतो.  कुणी कृतज्ञता व्यक्त करावी, कुणी गुणगान गावे यासाठी काही तो राबत नाही.  त्याच्या अंतरीचा उमाळा त्याला गप्प बसू देत नाही.  कोणी काही म्हणावे म्हणून तो काहीही करीत नाही.''  चव्हाणसाहेब मला सांगत होते.

सुप्रिया, मी कर्मसिद्धांतवाला नाही.  नशीब, कर्म असल्या गोष्टी मी मानत नाही की कर्मविपाकाचा सिद्धांतही मी मानीत नाही.  पण चव्हाणसाहेबांचा जो सहवास मिळाला, वि.स.खांडेकरांचा जो सहवास मिळाला तो माझ्या आयुष्यातला अत्यंत परमोच्च बिंदू होता असे मी मानतो.  चव्हाणसाहेब इतरांशी बोलत नसत फार, ऐकत खूप असत.  माझा तसा अनुभव नाही.  ते खुलले की खूप मस्त बोलत असत.  १९८१ साल माझ्या आयुष्यात अत्यंत क्रांतिकारक साल म्हणावे लागेल.  ज्या माणसाच्या केवळ दर्शनासाठी आम्ही तासन् तास उतावीळ होऊन उभे असायचो, तो माणूस लांबून तरी दिसावा म्हणून लहान असताना बाच्या खांद्यावर बसून ज्या माणसाला मी गर्दीतनं पाहायचो अशा माणसाबरोबर मी प्रवास करतोय ही कल्पनाच रोमँटिक नाही वाटत ?  गर्दीतल्या रेटारेटीतून केवळ गाड्या मोजायच्या.  लालपिवळ्या दिव्यांच्या गाड्या, त्यात कुठेतरी यशवंतराव चव्हाण नावाचा माणूस बसलेला असायचा.  आम्ही नुसती रस्त्याच्या कडेला उभी राहिलेली पोरे गाड्यांचा ताफा मोजायचो.  ज्यांच्या पाठीमागे जास्त गाड्या ते यशवंतराव, ज्यांच्या पाठीमागे तेवढ्या गाड्या नाहीत तो कुणीतरी साधा मंत्री असे आमचे गणित होते.  त्यातल्या एखाद्यानेच पाहिलेले असायचे यशवंतराव.  बाकी सारे तो सांगेल त्याला माना हलवत असायचे.  अशी स्वप्नवत स्थिती होती माझी.  आपण ज्याच्यावर लहानपणी प्रेम केलेले असते तो माणूस खरेच दिसतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा ?  याचे कोण कुतूहल लहानपणी असते.  तेव्हा कुणी मला सांगितले असते की तुझ्या भाग्यकाळात यशवंतराव भेटणार आहेत.  त्यांचे-तुझे अंतरीचे नाते जमणार आहे.  तर मी त्याला हसलो असतो किंवा फार तर सांगणार्‍याच्या बुद्धीची कीव केली असती.  पण आज मी तो प्रत्यक्ष अनुभव घेत होतो.

त्याचे असे झाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेतून बँकेचे मॅनेजर आप्पासाहेब भोसले यांचा माणूस मला निरोप द्यायला आला होता, 'दुपारी आपण बँकेत यावे, आपणास चव्हाणसाहेबांनी बोलावले आहे.'  ठरल्यावेळी मी बँकेत पोहोचलो.  अप्पासाहेबांचा माझा परिचय होता, तो दाभोळकरांची पोरे या सदरात.  त्यांनी हसून माझे स्वागत केले.  साहेबांचा निरोप होता.  तुम्हाला बोलावण्याचा.  ते कराडला निघालेत,  तुम्हाला वेळ असला तर आपण त्यांच्याबरोबर जायचे आहे.  माझी गाडी कराडला येईल.  त्यातून तुम्ही परत या.  तुम्हाला हवा तेवढा वेळ गाडी तुमच्याबरोबर राहील.  ते येतीलच येवढ्यात.  आमचा चहा झाला.  आप्पासाहेब भोसले म्हणजे फार भारदस्त माणूस, अत्यंत उत्तम व्यक्तिमत्त्व.  बँकेच्या त्या टोलेजंग इमारतीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा हा माणूस कमालीचा मृदू, शांत, मनमिळावू, माझ्या आणि चव्हाणसाहेबांच्या मध्ये दुवा असावा तसा.  माझ्या घरी तेव्हा फोन नव्हता.  आतासारखा मोबाईल असता तर काय मजा आली असती.  त्यावेळी घरात फोन असणे ही फार प्रतिष्ठेची गोष्ट होती.  घरा गाडी म्हणजे चारचाकी गाडी असणे, फोन असणे ही श्रीमंत माणसाची खूण होती.  १९८६ साली तुझ्या बाबांनी माझ्या घरी फोन बसवण्याची व्यवस्था खात्याला सांगून केली.  तोपर्यंत फोन नव्हता.  अप्पासाहेबांनी मला निरोप द्यायचा, मी बॅग भरायची आणि बँकेच्या गाडीने मला साहेबांपर्यंत पोहचवायचे असे आमचे अलिखित मेतकुट जमले.  हा माणूस साहेबांवरील प्रेमाने हे करायचा.  साहेब आता मंत्री नव्हते, सत्तेच्या कोणत्याच पदावर नव्हते, खासदार होते.  मला जो त्यांचा काळ पाहता आला तो उतरतीचा.  राजकीयदृष्ट्या ते मागच्या प्रवासाला निघाले होते.  वैभवाचा काळ संपला होता.  गर्दी हटली होती, सरली होती.  देण्यासारखे आता त्यांच्याजवळ काही उरले नव्हते.  चव्हाणसाहेबांची गाडी रेस्ट हाऊसला पोहचली असा बँकेत निरोप आला.  मी आणि अप्पासाहेब बँकेतून उठलो नि रेस्ट हाऊसला पोहोचलो.