पत्र - २१
दिनांक १५-०९-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
चव्हाणसाहेबांचा विरंगुळा वेगळा, वेळ सायंकाळची; साडेसहा-सातची. मी दुपारपास्नं साहेबांबरोबर होतो. तुरळक कुणीतरी येत असे. एरवी शुकशुकाट असायचा. आम्ही दोघे साहित्य, संगीत, कला अशा गोष्टींवर बोलत होतो. जगप्रसिद्ध ठिकाणांबद्दल साहेब खूप गोष्टी सांगायचे. तेथले प्रसंग, मानवी स्वभावांचे विविध नमुने, अनेक विनोदी किस्से आणि गमती. माझ्याकडे सगळा अशा अमतीजमतींचा खजिना, पण अठरापगड जातींतल्या माणसांचा. साहेब जरा आनंदात असले की त्यांच्या आवडीच्या विषयावर ते बोलत असत. बोलताना अतिशय गंभीर विषयही ते फार छान समजावून सांगत. सातारा, कराड तासाचे अंतर, त्याने साहेब कराडला आले की आम्ही तासभर गाडीत बोलायचो आणि बंगल्यावर तास दोन तास. मग मी साताराला परतायचो. गाडी अर्थातच अप्पासाहेब भोसल्यांनी दिलेली असायची.
एकदा मी माझी चित्रकला त्यांना सांगत होतो. काहीकाही विषयांत ना मी फारच 'ढ' होतो. सूर्य उगवतानाचा आणि मावळतीचा, पण शक्यतो उगवतीचा सूर्य किंवा सूर्योदयाचा देखावा लहानपणी शिक्षक हमखास काढावयास सांगत. ड्रॉइंगचा कोरा कागद, रंगपेटी, पेन्सील, रबर शिक्षक देत असत. आपण चित्र काढून द्यायचे. असे चित्र मी काढले, डोंगरांना रंग दिला तो मोठा गमतीचा. लोकांचे डोंगर खालून वर रंगवलेले असतात, तर मी डोंगर वरून खाली रंगवलेले ! त्याने माझे डोंगर आभाळातून कोसळत असल्यासारखे रंगलेले. गुरुजींनी सार्यांना माझे चित्र दाखवले आणि अख्खा वर्ग हसू लागला. क्षणभर मला काहीच कळेना की मुले का हसताहेत. मी दोन डोंगराच्या मधला भाग रंगवला होता. साहेबांना एका कागदावर मी चित्र काढून दाखवले नि ते ही मोठमोठ्याने हसू लागले. सांगायचा मुद्दा काय, तर एवढी तर चित्रकलेतली मला जाण. चित्र मला आवडतात, पण काढता येत नाहीत.
लक्ष्मण, चला मी तुम्हाला सुंदर चित्र दाखवतो. चित्र मीही लहान असतानाच काढत होतो. पण मोठा झाल्यावर त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोण बदलला. आधिक जाणकाराकडून मी समजावून घेतला. साहित्य, संगीत हे जसे आवडू लागले तसे शिल्प आणि चित्रही आवडू लागले. त्यातही डोळे उघडे ठेवून मी जगभर हिंडलो. असे हिंडत असताना देशोदेशीचे शिल्पकलेचे नमुने पाहत होतो. सुंदर सुंदर निसर्ग सौंदर्यस्थळे पाहत होतो. सुंदर नद्या पाहत होतो. तशी सुंदर वस्तुसंग्रहालयेही पाहत होतो. याबाबतीत जगाची राजधानी शोभावी असे शहर म्हणजे पॅरिस. जगभरातल्या बंडखोरांना आपल्या पोटात सामावून घेणारे शहर. साहित्य, संगीत, कला, राजकारण, देशोदेशीचे बंडखोर कलावंत या शहरात राहिले. सुंदर ललनांची वस्ती या शहराला लाभलेली मोठी नैसर्गिक देणगी. त्यामुळेच जगभरातील सौंदर्याची राजधानी म्हणजे पॅरिस. मोकढेढाकळे स्त्रीपुरुष आणि त्यांची रसिकता. आपल्यासारखे आंबटशौकीन तिथेही नसतील असे नाही, पण अभिजात सौंदर्याची जाण त्या गावाएवढी जगभर मला इतरत्र क्वचितच दिसली असेल. तर असे पॅरिस या शहरातले वस्तुसंग्रहालय 'लुब्र' फार प्रसिद्ध आहे. मी अनेकदा ते पाहिले. कितीही वेळा पाहिले तरी समाधान होत नाही. या संग्रहालयातच 'मोनालिसा'चे जगप्रसिद्ध चित्र आहे. पॅरिस आणि चित्र. पॅरिस आणि पेंटिंग.