• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १९-८९२०१२-२

माझे 'उपरा' चे लेखनही याच काळात सुरू होते.  मी काही प्रथितयश लेखक नव्हतो.  किंबहुना लेखन हा माझा प्रांतच नव्हता.  मी आपला सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता.  त्यावेळी लोक मला 'दाभोळकरांची पोरं' याच गटात आलेखत होते.  माझी स्वतंत्र अशी ओळख नव्हतीच.  मोर्चे, मेळावे, परिषदा, घेराव, सत्याग्रह अशा गोष्टीत मला क्रांती दिसत होती.  पडेल ते काम करायचे.  परिवर्तनाची चळवळ गतिमान करायची, म्हणजे बिनपगारी फुल अधिकारी !  चोवीस तासाची बिगारी.  थँकलेस जॉब.  फार फार तर, वर्तमानपत्रात एखाद दुसरी ओळ छापून यायची.  फार तर नाव.  पण त्यानेसुद्धा आभाळ ठेंगणे व्हायचे, ते वेगळेच.  कुणीतरी शाबासकी द्यावी, खूप चांगलं करतोस म्हणावे, असे वाटायचे, पण कसले काय ?  आम्ही सारी गोरगरिबांसाठी लढणारे लोक.  चहासुद्धा कुणी द्यायचे नाही.  आम्ही ज्याचे काम करायचो ना, तेच उघडे.  त्यांच्याजवळ काय असणार ?  पितळीने प्यावा लागायचा बिनसाखरेचा चहा.  त्यातही बिन दुधाचा.  नाही म्हणायला, सरकारी कारकुनकी मिळाली होती.  त्यामुळे दोन वेळचे जेवण आणि खोलीचे भाडे याची काळजी नव्हती.  दाभोळकरांमुळे दवाखाना, औषधे असला खर्च नव्हता.  भाई, समता या दोन्ही मुलांच्यावेळी शशीची सर्व काळजी शैला वहिनींनी घेतली.  आजही मुलांना काही झाले, तर त्यांचाच जीव कासावीस होतो.  त्यावेळी मी मंगळवार पेठेतल्या आमच्या लोकांच्या वस्तीत राहत होतो.  जयसिंग पोळ या बौद्ध बांधवाने दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या.  आत एक खोली, बाहेर एक खोली.  आत किचन, बाहेर बैठक. शेजारीपाजारी आमच्याचसारखे दोन खोल्यांतले.  समोर मोठी झोपडपट्टी.  मावळतीला मातंगवाडा, बौद्धवाडा, पाठीमागे वडारवाडा, पूर्वेला मेहत्तर गल्ली.  बाकी उरलेली सहकार खात्यातील चतुर्थश्रेणी कामगारांची घरे अशी मोठी झोपडपट्टी.  रोज संध्याकाळची भिसे नावाच्या बांधवाच्या शिव्यांची लाखोली पुन्हा गावाकडल्या आठवणी ताजी करायची.  सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक नळ कोंडाळी, नळावरची भांडणे या सगळ्या वातावरणात 'उपरा' लिहिले गेले.  खरे तर 'उपरा' मी नाइलाजानेच लिहिले.  एकदा अनिल अवचटना मी माझ्या पूर्वायुष्यातल्या काही गोष्टी सांगितल्या, त्याने लिहावे म्हणून.  पण झाले भलतेच.  त्याने मला लिहायला भाग पाडले.  मी भीत भीत थोडे लिहिले.  आपण लिहिण्याचे काम कसे करणार ?  लिव्हणं बामनाचं, दाणं कुणब्याचं, अन् गाणं म्हाराचं.  मी अनिलला खूप समजावायचा प्रयत्‍न केला.  पण, त्याने आणि शशीने जो तगादा लावला, त्यानं लिहिता झालो.  उपरा २५ डिसेंबरला मुंबईला 'ग्रंथाली'ने प्रसिद्ध केले.  त्याला जो प्रतिसाद मिळाला तो अभूतपूर्व होता.  मी एकाच प्रयत्‍नात लेखक झालो.  प्रतिसादाची पत्रे, वर्तमानपत्रे, आकाशवाणी सर्वांनी मला खूप उचलून धरले.  माझ्या स्वप्नातही न पाहिलेले प्रेम लोकांनी दिले.  अमेरिकेतला फोर्ड फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला.  दोन लाख ही रक्कम त्यावेळी फार मोठी होती.  मी लेखक झालो.

एके दिवशी सकाळी दहा-साडेदहाच्या आसपास मी ऑफिसला जाण्याच्या घाईत असताना एक गाडी घरासमोर थांबली.  त्यातून एक पायजमा-शर्ट घातलेला, उत्तम भांग पाडलेला तरुण उतरला.  काळासावळा रंग, नाकाची दांडी उभी, भव्य कपाळ, तरतरीत डोळे.  'मानेसाहेब आहेत का ?  मी प्रल्हाद चव्हाण.  कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती.'  मी स्वागत केले.  त्यांना घरात बोलावले.  ते म्हणाले, 'आपलं घर बघायला चव्हाणसाहेबांनी पाठवलंय.  त्यांना आपल्याला भेटायला यायचंय.'  मी उडालोच.  प्रल्हादभाऊ, मी भेटेन ना त्यांना जाऊन, मी म्हणालो.  ते म्हणाले, 'नाही.  मला आपलं घर फक्त बघायला सांगितलंय.  साहेब एकटेच येणार आहेत.  बँकेत तसा निरोप होता.'  ते बिचारे चहा घ्यायलाही थांबले नाहीत.  मी मात्र बुचकाळ्यात पडलो.  ऑफिसला जावे की वाट पाहावी ?  एवढा मोठा माणूस कशाला येईल ?  आपणच त्यांना जाऊन भेटू शकतो ना ?  मी जेवायला बसलो होतो.  मुले शाळेत गेली होती.  आणि काय आश्चर्य !  खुद्द यशवंतरावजी चव्हाण दारात उभे.  मी घास तसाच ठेवला आणि बाहेर आलो.  दोघांनी वाकून नमस्कार केला.  त्यांनी गळ्यात हार घातला.  सातारी पेढा भरवला आणि मिठी मारली.  म्हणाले, 'लक्ष्मणराव, मराठी शारदेच्या गळ्यातला कंठमणी मराठीला दिलात.'  फार फार आनंद झाला.  साहेब एकटेच होते.  गाडीत आणखी कुणीतरी होते.  पण ते काही आत आले नाहीत.  साहेब कॉटवर शांतपणे मांडी घालून लोडाला टेकले.  शशीने पाणी दिले.  मी तिचा परिचय करून दिला.  मग 'आई कुठे असते, वडील सध्या काय करतात ?  पाट्या वळणं थांबलं की नाही ?  गावोगाव फिरणं थांबलं की नाही ?  अशी एकामागून एक विचारपूस.  मी 'हो' किंवा 'नाही' किंवा मानेनेच उत्तर देत होतो.  दोघांनाही काही सुचत नव्हते.  शशीने चहा दिला.  साहेबांनी चहा घेतला.  'लक्ष्मण, आता निवांत बोलू.  माझ्या गावात मराठी बोलू लागली.  वेणूबाईंनाही खूप आवडलं 'उपरा'.  त्यात त्यांच्या भावाच्या शाळेत शिकलात तुम्ही.  बाईंच्या माहेरचा माणूस.  आम्हाला खूप आनंद झाला.  येतो मी', असं म्हणत साहेब उठले.  आम्हा दोघांचे डोळे पाण्याने भरले होते.  एवढा आभाळाएवढा माणूस आम्हा गरीबाघरी झोपडपट्टीत आला.  कडकडून भेटला.  कैक पिढ्यांचे नाते असावे तसा.  साहेबांची गाडी गेली.  आम्ही मात्र दोघेही स्वप्न पाहावे तसे भारावून गेलो होतो.  असे कितीतरी धक्के त्या काळात अनपेक्षितपणे बसत असत.  त्यापूर्वी त्यांचा आणि माझा परिचय होता, पण स्नेह नव्हता.  'उपरा'ने आमच्यातले नातेच बदलून टाकले.  साहेबांच्या अखेरच्या क्षणापर्यंत हे आमचे नाते तसेच राहिले.  ते उत्तरोत्तर अधिक घट्ट होत गेले.  ते इतरांशी फार बोलत नसत.  ऐकत फार.  पण माझा अनुभव उलट आहे.  वयाचे मोठे अंतर असूनही ते माझ्याशी फार मोकळेपणाने बोलत.  गावजीवन, गावकी, कुणबावा, त्यातले बाहेरून-आतून पाहिलेले गाव, अनुभव यावर त्यांचे नि माझे विलक्षण प्रेम.  अंतःकरणात असलेला जिव्हाळा वयाचे अंतर केव्हाच पार करून गेला होता.  ते माझ्या आणि मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो.  त्यांचे ते प्रेम कधीही न विसरता येणारे पाथेय.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका