१९८० ची ही निवडणूक यशवंतरावांसाठी मोठी कसोटीची होती. वसंतरावदादा पाटलांच्या पत्नी शालिनीताई पाटील या इंदिरा काँग्रेसच्या उमेदवार होत्या. चव्हाणसाहेबांविरोधात निवडून येणे तसे सोपे नव्हते. पण वातावरण तापत गेले. आतासारखी कार्यकर्त्यांची उठाठेव नव्हती. साहेबांनी कधी कुणाला पैसे दिले नाहीत, जेवणावळी घातल्या नाहीत. कुणाला वाहने पुरवली नाहीत. पोस्टर-बॅनर नाहीत. तरीही प्रचार सुरू होता. परिस्थिती नाजूक होती. साहेबांनी ज्यांना मोठे केले तीच माणसे साहेबांविरूद्ध काम करत होती. मी पत्रकार म्हणून फिरत होतो. अनेक सभांना माणसे जमत नव्हती. काही शिलेदार तोंड चुकवून बसले होते. साहेबांना अशा स्थितीला कधी तोंड द्यावे लागले नव्हते. त्यात ताईंचा प्रचार त्यांच्या शिवराळ पद्धतीने सुरू होता. त्यांचे एक विधान साहेबांना यश देऊन गेले; ताईंच्या पराभवाला कारण झाले. जनमानसातील त्यांची प्रतिमा धुळीला मिळाली. ते वाक्य सभ्य माणूस उच्चारू शकत नाही. त्यामुळे मीही तुला ते सांगू इच्छित नाही. पण फार खालच्या पातळीवर जाऊन त्या बोलल्या होत्या. त्याने माझ्याही तळपायाची आग मस्तकाला गेली होती. मी काँग्रेसवाला नव्हतो. पण यशवंतराव सातार्याचे भूषण होते. आम्हा सर्व सातारकरांचा अभिमान. त्यालाच ताईंनी तडा दिला होता. लोक संतापले. राजकारण, निवडणुका बाजूला गेल्या. मतदार ताईंवर बिघडला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत कार्यकर्त्यांची एक सभा झाली. त्यात नेतेमंडळी खालच्या पातळीवर जाऊन बोलू लागली. ताई काय म्हणाल्या होत्या, हे तोपर्यंत सगळ्या जिल्ह्यात झाले होते. साहेबांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. एका शब्दाने झाल्या प्रकाराचा उल्लेख केला नाही. सातार्याच्या गांधी मैदानावर सायंकाळी जाहीर सभा होती. आता साहेब काय उत्तर देणार ? हा एकच प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात घोळत होता. मतदारही आज जुगलबंदी होणार म्हणून मोठ्या संख्येने जमा झाले होते. गांधी मैदान माणसांनी फुलून गेले होते. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. नेहमीपेक्षा कितीतरी मोठी सभा जमली होती. चव्हाणसाहेब निवडणुकांच्या प्रचाराची शेवटची सभा नेहमी सातारला गांधी मैदानावर घेत. तीच त्यांची मतदारसंघातली मोठी सभा असायची. बाकी सारा प्रचार पक्ष, कार्यकर्ते शिस्तबद्धपणे करत असत. पदरचे खाऊन आपापल्या गावात, आपापल्या गल्लीत आपापली घरे माणसे सांभाळत. त्याचे मतदान होईल हे पाहणे हे कार्यकर्त्यांचे काम होते. त्याला पैकापाणी लागत नसे. गरीब-श्रीमंत सारे झटून काम करत. निवडणुका महाग होत गेल्या, त्यानंतर. तर सभा सुरू झाली. स्वागत झाले, प्रास्ताविक झाले आणि चव्हाणसाहेब बोलायला उभे राहिले. तोच जोश, तोच आत्मविश्वास. मी पत्रकारांच्या कक्षात बसलो होतो. साहेबांनी सुरुवात केली. देशाची स्थिती, लोकशाहीची अवस्था हे बोलत असताना साहेब विषयावर आले. ते म्हणाले, 'मी ज्यांना भावासारखे मानत आलो, थोरल्या भावाचा मान देत आलो, त्या वसंतरावदादा पाटलांच्या सौभाग्यवती माझ्याविरोधी आहेत. त्या ज्या पद्धतीने बोलतात, ती त्यांची संस्कृती आहे. आपली संस्कृती तसली नाही. आपल्या कुटुंबात थोरली भावजय ही आईसमान मानली जाते. आई रागावली तर पाठीत धपाटा घालते. रागाने तोंडाला येईल तशा शिव्या देते. आपण त्या शिव्या खातो, धपाटा खातो. पण चांगला मुलगा आईला उलटून शिव्या देत नाही. ते त्या मुलाला शोभणारे नाही. त्यामुळे मी चांगला माणूस आहे. मी त्यांचे त्यांना देऊन टाकतो. असली घाण आपण अंगावर घेण्याचे कारण नाही.' लोकांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा पाऊस पाडला. यशवंतराव काय चीज आहे, हे पाहून सगळेजण अवाक झाले होते. सारी सभा यशवंतरावांनी खिशात घातली होती. जे ताईंवर चिडले होते, त्या माझ्यासारख्यांनी त्यांना माफ करून टाकले, आणि मतपेटीत साफ करून टाकले.
त्यावेळी यशवंतरावांनी दाखवलेली समयसूचकता, संयम राजकीय जीवनात ज्यांना काम करावयाचे आहे, त्यांच्या अंगी खरोखरी असावी लागते. त्या एका सभेने यशवंतरावांनी निवडणूक जिंकली असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यांच्यावर प्रेम करणारे मतदार घराघरात होते. ते नावानिशी, गावानिशी, लोकांना ओळखत असत. राज्यात रेड्डी काँग्रेसचे ते एकमेव उमेदवार निवडून आले. त्यांना पाडावे म्हणून सर्व शक्ती काम करीत होत्या. आतल्या आणि बाहेरच्या, सगळ्यांनाच ते पुरून उरले. देशाचे उपपंतप्रधान झालेले यशवंतराव जिल्ह्यात बिघडलेल्या राजकीय वातावरणाला विटले होते. गटातटात वाटलेले आपले कार्यकर्ते बघण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. एका माणसाच्या हट्टासाठी, हेकेखोरपणासाठी पक्ष मोडीत निघाला होता. चव्हाणसाहेब फार व्यथित होते. त्यांचा माझा तर परिचय होताच, पण निवडणुकांमध्ये मी सक्रिय झालो होतो, त्याचा त्यांना आनंदही होता. मात्र त्यांच्याशी जाऊन बोलणे वगैरे शक्य नव्हते. तेवढे धाडसही नव्हते. लांबून लांबूनच आमचा परिचय होता हे खरे.