२० मे १९७५ ला त्यांचं एक पत्र आलं :
“पत्र लिहीन-लिहीन म्हणत होतो; परंतु एकामागून एक अनेक प्रवास करावे लागल्यामुळे तसेच राहून गेले. आपण पाठविलेला ‘वही’ काव्यसंग्रह मिळाला. आठवणीनं पाठविल्याबद्दल आभारी आहे. तुम्ही ‘गांधारी’ दिल्यानंतर मी त्याच वेळी ते वाचून काढले होते. पुस्तकातली कथा ओळखीची वाटली, ग्रामीण जीवनातला गुंता स्पष्टपणे, निर्भींडपणे त्यात मांडला आहे. व्यक्तिचित्रे रेखीव वाटली. खरं सांगायचं तर तुमच्या कवितांतच माझे मन रमते. त्यामुळे तुमच्या कांदबरीहून माझे मन तिकडेच जास्त वळले हे मला कबूल केले पाहिजे. अर्थात तुम्ही गद्यही त्याच जिव्हाळ्याने व सहजतेने वापरू शकता ‘गांधारीने’ सिद्ध केले आहे, यात शंका नाही. मानवी जीवनातला संघर्ष, त्यातील सामाजिक असमतोल जिथे जिथे असेल तो जसा तुम्ही ‘गांधारी’ मध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तसा ‘गोदावरी काठच्या’ प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर अनेकविध त-हेने रेखाटता येण्याची शक्यता आहे.
माडगुळकरांची मायदेशी माणसे किंवा पेंडश्यांची कोकणची माणसे त्यांच्या कथा-कादंब-यांत जशी जिवंत उभी राहिली आहेत तशीच मराठवाड्यातील जिवंत प्रतिमा तुमची लेखणी उभी करू शकेल असा विश्वास ‘गांधारी’ ने उत्पन्न केला आहे यात काही शंका नाही. अर्थात यासाठी तुम्हांला मराठवाडाभर व त्याच्या बाहेरही भटकावे लागेल. अनेकविध थरातील जीवनाचा जागता शंका नाही. अर्थात यासाठी तुम्हांला मराठवाडाभर व त्याच्या बाहेरही भटकावे लागेल. अनेकविध थरातील जीवनाचा जागता परिचय करून घेतला पाहिजे. हिदुंस्थानच्या इतर भागांतही अधून – मधून जाण्याचा प्रयत्न करीत राहिले पाहिजे म्हणजे वैविध्यपूर्ण विशाल भारतीय जीवनाचा अनुभव तुमचे साहित्य संपन्न करील. अनुभवांची संपन्नता प्रतिभेला साहाय्य करते असे मला वाटते.
‘वही’ अजून वाचायचा आहे. पुढच्या आठवड्यात प्रवासात जाताना बरोबर घेऊन जाणार आहे. पुन्हा भेटलो तर सांगेन किंवा जमले तर कधी तरी लिहीन.
रानातल्या कविता वाचत असताना बालकवींची आठवण येत होती. परंतु ह्या कवितांमध्ये बालकवींच्या कवितांपेक्षाही काही अधिक आहे असे मला वाटत होते. कविता किंवा कवी यांची तुलना करणे योग्य नव्हे, परंतु फरक काय आहे हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे. काही आठड्यांपूर्वी दिल्लीला नागपूर येथील मराठीचे तरूण व विद्वान प्राध्यापक सुभेदार ‘मराठीतील नव्या वाड्मयासंबंधी’ बोलण्यासाठी आले होते तेव्हा त्यांचे व्याख्यान ऐकण्यास गेलो होतो. ऐकायला गेलो म्हणून अध्यक्ष झालो. त्यावेळी त्यांनी तुमच्या कवितांचे विश्लेषण करताना मी जे शोधायचा प्रयत्न् करीत होतो ते एका वाक्यात सांगितले, व मला वाटते ते खरेही आहे. त्यांचे व्याख्यान इंग्रजीत झाले. त्यांनी सांगितले की बालकवींच्या कविता म्हणजे ‘Itreflectsnature’ आणि महानोरांच्या कविता ‘It springs from nature’ अकारण तुमची स्तुती करावी म्हणून काही लिहिले नाही. परंतु जे गुण आहेत ते सांगितले पाहिजेत. ते टिकावेत, वाढावेत असा अनौपचारिक सल्ला देणे कितपत बरोबर आहे मला माहीत नाही, परंतु तसे घडावे अशी इच्छा मात्र जरूर आहे.
दिल्लीलाही अवश्य या. पार्लमेंटमध्ये सेशन असताना या म्हणजे मराठी खासदारांना एकत्र जमवून तुमच्या कविता ऐकविता येतील. कुसुमाग्रजांनी दिल्लीकरांबद्दल तुम्हाला जे सांगितले ते सर्वांशाने खरे आहे हे कबूल केले पाहिजे, परंतु दिल्ली देशाची राजधानी आहे. तुमच्यासारख्या प्रतिभावान माणसाने हे सर्व पाहिले पाहिजे, अनुभवले पाहिजे.
पत्र फार लांबले. पुन्हा केव्हातरी.
कळावे”