यशवंतराव चव्हाण (3)

परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या स्थापना समारंभप्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणातील हा एक उतारा

“शेतीच्या शास्त्रीय शिक्षणाच्या दृष्टिकोन लोकांमध्ये वाढविला पाहिजे. यासाठी येथे शिकणारे शेतीचे सगळे स्नातक निव्वळ शेतकी खात्याकडे अधिकारी होऊन जाणार असले आणि जावयाच्या शर्यतीमध्ये त्या निमित्ताने पुढे जाणार असले तर मी असे म्हणेन की, ती दुसरी शोकपर्यवसायी गोष्ट होईल. येथे शिकलेला मनुष्य शेतकरीही होऊ शकला पाहिजे. तसे त्याने झाले पाहिजे. तुमची शेती ही निव्वळ तुमचा विचार राहिलेला नाही. तुमची शेती हा देशाचा विषय झालेला आहे. तुमची शेती तुमची आहे तशी ती देशीचीही आहे. तुमची शेती पिकली नाही तर तुमचे नशीब पिकणार नाही एवढाच त्याचा अर्थ नाही, तर त्याचबरोबर देशाचेही नशीब पिकणार नाही.”

आमच्या सगळ्या शेतकरी समाजाच्या मनावर त्यांच्या अशा नव्या विचारांचे खोलवर परिणाम होत गेले. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचं स्थापनेच्या वेळचं त्यांचं भाषण किती दूरदर्शी व खोलवर शेतीचा विचार करणारं आहे हे जाणवलं. राज्य शासनाचे त्याचे नवे निर्णय होत गेले. पाणी व दुष्काळी प्रदेशाच्या, मागासलेल्या प्रदेशातल्या शेतीच्या प्रश्नांची यशवंतरावांनी फार आस धरलेली होती. बर्वे कमिशन तसेच पाणी-प्रश्नाची व दुष्काळी कोरडवाहू शेतीला निदान दोन-तीन पाण्याच्या व्यवस्थेची रचना नव्या योजना आखून केली जात होती. तेव्हाच्या त्यांच्या भाषणातला प्रत्येक शब्द, त्यामागची भूमिका व विचार आजही समर्पक आहे. त्या वेळीही तो माझ्यासारख्याला हलवून गेला होता. उजनी धरणाच्या भूमिपूजनाच्या वेळचा दुष्काळी सोलापूर जिल्ह्याच्या निमित्तानं मांडलेला पाणीप्रश्नाचा खालील विचार किती सोप पण नवा, शेतक-यांना पटणारा व त्यांनी स्वीकारावा असा आहे. हे सगळं ऐकून-वाचून, विचारांनी मी यशवंतरावांच्या जवळ गेलो.

“पंढरीच्या विठ्ठलाच्या या परिसरात, त्याच्या या पंचक्रोशीत आज मोठ्या आनंदानं मी आलो आहे. येताना मनात मी विठ्ठलाला म्हणालो, चंद्रभागा तुझ्या अंगणात पोहचण्यापूर्वीच आज आम्ही तिला अडवली आहे, तिला आज आम्ही साकडे घातले आहे. तुझ्या चरणांजवळ ही चंद्रभागा अठ्ठावीस युगे वाहत आली. या चंद्रभागेला उजनीजवळ आज आम्ही थांबवित आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी दरसाल आषाढी कार्तिकी एकादशीला खांद्यावर पडशी टाकून ‘ग्यानबा-तुकाराम’ म्हणत म्हणत तुझ्या दाराशी येत असतो. त्या ग्यानबा-तुकारामाच्या शेतीत आणि झोपडीत विठ्ठला, आता तू जा. तिथे तुझ्या चंद्रभागेला तू भेट. जनाबाईच्या मदतीला तू धावून गेलास आणि तुझी भक्ती करणा-या तुझ्या सगळ्या भक्तांच्या मदतीलाही तू धावून गेलास. तशीच तुझी भक्ती करणा-या महाराष्ट्राच्या झोपडीत गरीब शेतक-याने आज तुझी चंद्रभागा अडविली आहे. त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मदतीसाठी विठ्ठला, तू त्यांच्या शेतीत जा. तू आता पंढरपूरच्या मंदिरात राहू नकोस. विठ्ठला, मीही मनोमन प्रार्थना केली आहे. तुकारामाची, ज्ञानेश्वराची, एकनाथाची आठवण करून मी ही प्रार्थना केलेली आहे. पण कृपा करून आपण हे मात्र लक्षात ठेवा की निव्वळ प्रार्थनेनं हे सगळं घडणार नाही. त्यासाठी तुमच्या कष्टाची गंगा उपसावी लागणार आहे. त्यासाठी जिद्दीनं काम करण्याचा आपण निश्चय करू या.”

पुन्हा आठवण झाली. पाचो-याचा शेतकरी मेळावा झाला. त्या ठिकाणी राधाबाई बुधागावकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा लोकनाट्याचा प्रयोग झाला. अस्सल मराठमोळी लोकनाट्यं व खड्या आवाजातल्या लोकसंगीतातल्या रचना यशवंतरावांना प्रभावित करून गेल्या. रसिक साहित्यिक यशवंतराव तिथे पुन्हा जागे झाले. त्यांनी नोंद घेतली. पुढे नेफा-लडाखच्या युद्धाच्या कठीण परिस्थितीत ते संरक्षणमंत्री होते. त्या वेळी राधाबाई बुधगावकर व त्यांच्या कुटुंबीयांचं घरंदाज मराठमोळं वगनाट्य जवानांच्या रंजनासाठी आठवणीनं पाठविलं. त्यांचा नंतर योग्य तो गौरव केला. या सगळ्या घटनांनी मी मनानं त्यांच्या जवळ गेलो मात्र समक्ष जवळीक येण्याचं कधी कारण नव्हतं.