दुस-या खंडाच्या काही घटनांसंबंधी यशवंतराव सहज मित्रमंडळींशी बोलले. छान चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या महत्त्वपूर्ण अशा ऐतिहासिक राजकीय घडामोडींचा काळ म्हणून सगळे दुस-या खंडाची – ‘सागरकाठ’ची उत्सुकतेनं वाट पाहत होते.
वेणूताई वारल्या. यशवतरावांचं त्यानंतरचं सगळंच जीवन पार बदलून गेलं. त्यांचं कशातच लक्ष लागेना. त्यांनी फार मनाला लावून घेतलं होतं. आणि ते साहजिक, नैसर्गिक होतं. आयुष्यभर फार मोठमोठ्या जबाबदारीच्या ठिकाणी असताना सावलीसारख्या वेणूताई त्यांच्याबरोबर राहिल्या. पण राजकारण व व्यासपीठापासून दूर राहिल्या. अबोल राहिल्या. यशवंतरावांच्या मोठेपणाच्या एवढ्या मोठ्या कालखंडात लोकसंग्रहात त्यांच्या मित्रांसाठी, येणा-या जाणा-यांसाठी सैदव पाहूणचार करीत स्वागतशील राहिल्या. त्यांचं शांत, हसरं, प्रसन्न व्यक्तिमत्त्व सगळ्या महाराष्ट्रात जवळून परिचित होतं. वेणूताई गेल्या तेव्हापासून यशवंतराव खचले. कशातच त्यांना रस वाटत नव्हता. एकटे असताना ते घरात लहान मुलासारखे रडायचे. नाशिकला वेणूताईंचा अस्थिकलश गंगेच्या प्रवाहात सोडला तेव्हा यशवंतराव बाजूच्या खडकावर बसून वाहत्या पाण्याकडे डोळे भरून पाहत होते. खूप वेळ एकाकी सुनसान मानानं गोदावरीच्या काठी बसून होते. बाजूला प्रचंड गर्दीचा गराडा गजबजून होता. तरीही ते एकटेच होते.
यशवंतराव वेणूताईच्या मृत्यूनंतर सार्वजनिक समारंभाला फारसे जात नव्हते. क्वचित एखादा कार्यक्रम स्वीकारीत असत. आत्मचरित्राचं कामही मंदावलं होतं. भेटणा-यांच्या जवळ ते मोकळं होत नव्हते. हळूहळू ते स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत, पण त्यांच्या घरातलं भकास एकटेपण त्यांच्या अंगावर येत होतं. तसं फार जवळच्या आप्त मित्रांशी ते बोलून दाखवीत. पुष्कळदा कोंडणा-या त्यांच्या घरातून त्यांना काढल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. नंतर त्यांनासुद्धा एखाद्या समारंभाला लोकांमध्ये जावंसं वाटू लागलं. आयुष्यभर हजारो लोकांमध्ये एकजीव झालेले यशवंतराव, त्यांची जिव्हाळ्यी माणसं सबा सम्मेलनात भेटली म्हणजे पुन्हा बहरून आल्यागत वाटायचं. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात पुन्हा थोडी फार टवटवी दिसायची.
औरंगाबादला श्री. बाळासाहेब पवार व काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शेतक-यांचे नेते भाई उद्धवराव पाटील यांचा गौरव समारंभ आयोजित केलेला होता. यशवंतरावांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविलेलं होतं. यशवंतरावांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात व नंतरच्या स्वातंत्र्यातल्या त्यांच्या दीर्घ सत्तेच्या संपन्न अशा काळात खूप मोठ्या ठिकाणी असतानाही काँग्रेसच्या माणसांबरोबरीनंच समाजवादी, कम्युनिस्ट, शे. का. प., भा. ज.प., रिपब्लिकन अशा सारख्या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांशी सामान्य, कार्यकर्त्यांशी, सामान्य माणसांशी कमालीची जवळीक व आपलेपणाचे ऋणानुबंध जतन करून ठेवलेले होते. त्यांना शत्रू कधी मानलं नाही. विरोधी पक्षातल्या कितीतरी बड्या मंडळींशी खूप आदराचे व जिव्हाळ्याचे संबंध यशवंतरावांनी ठेवले एसेम्सारख्या माणसांशी शेवटपर्यंत घरातल्या नात्यानं आदरानं वागले. औरंगाबादेला आलेले शेतकरी कामगार पक्षाचे शेकडो कार्यकर्ते यशवंतरावांशी जुन्या इतिहासातल्या काल-परवाच्या घटनांची आठवण देऊन मनसोक्त आपुलकीनं गप्पा मारीत होते. यशवंतराव कुठल्या कुठल्या आठवणी सांगत होते व इतिहास उभा करीत होते. कार्यकर्त्यांच्या जवळ जायचे व विचारपूस करायचे. शेतकरी कामगार पक्षाचे, इतर समाजवादी पक्षाचे व अन्य कितीतरी जुन्या पिढीतले लोक यशवतंरावांशी खूप आपुलकीनं व आदरानं बोलत होते. शेतकरी दिंडीत चांदूर रेल्वेला यशवंतरावांसोबत अटक झालेली माझ्या गावची वीस-पंचवीस तरुण मुलं मुद्दाम भेटीसाठी आलेली पाहून त्यांना फार बरं वटालं. नामदेव सोनुने, देवचंद शिनगारे ही मुलं दिंडीत होती. शेतक-यांची गाणी म्हणून मराठी कविता गाऊन रंजन करायची. ती आता मजुरी न करता थोडीबहुत शेती घेऊन पोटापण्याला लागली हा शेतकरी दिंडीचा आपल्यासारख्या एक नेत्यांच्या विचारांचा प्रसाद आहे. आमचं जीवन बदललं, आम्ही नुसतं भेटायला, आशीर्वाद घ्यायला इथे आपल्याकडे आलो आहोत असं सांगितल्यावर यशवंतराव उल्हासित झाले व आमच्या मुलांशी खूप वेळ बोलले. त्या समारंभाची सुरूवात शाहीर अण्णाभाऊ साठे व अमर शेख यांच्या क्रांतिगीतांनी करावी असं त्यांनी मला सुचवलं.