• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण (40)

पुस्तकं चाळताना माझा ‘पावसाळी कविता’ काव्यसंग्रह हाती आला. यशवतंरावांनी लगेच वेणूताईंना बोलविलं. माझी पत्नी व वेणूताई आल्या. ‘पावसाळी कविताची’ अर्पणपत्रिका वेणूताईंना व मला दाखवीत यशवंतराव म्हणाले, ‘मी वेणूताईंना ही अर्पणपत्रिका पुस्तक प्रकाशित झाल्यावर माझ्याकडे आल्या तेव्हा दाखविली होती. तेव्हा त्या खूप आनंदित झाल्या होत्या. पण थोड्या संकोचल्या. मला कशासाठी अर्पण केलं असं म्हणाल्या होत्या. आता कवी समोर आहे. त्यांनी कवीला विचारावं.’ मला बरंच बोलायचं होतं. पण मी काहीच बोललो नाही.

यशवंतरावांशी बोलताना मन मोकळेपणानं कृषी खात्यावर, सांस्कृतिक खात्यावर, साहित्यकलेच्या शासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर किंवा उथळ योजनांवर माझी काही मतं स्पष्टपणानं मांडली. या खात्यातल्या पुष्कळ चांगल्या योजनांना आवश्यक असूनही नीट न्याय मिळत नाही हे मी योजनांसकट संदर्भ देऊ बोललो. माझं म्हणणं अगदीच बरोबर आहे असंच ते म्हणाले. महसूल खातं किंवा त्यासारखं महत्त्वाचं मोठं खातं ज्या मंत्र्याकडे आहे त्यांच्याकडे पुन्हा सांस्कृतिक खातं उदाहरणार्थ दिलेलं असतं. शिक्षण खात्याच्या व्यापात पुन्हा ग्रंथ पारितोषिक, लायब्ररी, साहित्य-संस्कृती मंडळ, जन्मशताब्दी इत्यादी सगळं एकत्र असतं. पुन्हा एकदा उद्योगमंत्र्याकडे सामान्य प्रशासन, क्रीडा असं तिसरंच काही एकत्र केलेलं दिसून येतं. तो तो मंत्री त्याच्या मुख्य खात्याशिवाय फारसं लक्षही पुरवू शकत नाही. चित्रपट, मराठी चित्रपट, चित्रनगरी, कला, ललित कला, थोरांची जन्म वा स्मृतिशताब्दी, वाचनालयं, ग्रंथ पारितोषिकं, कलेच्या संबंधातली पारितोषिकं, योजना, कला संचालनालय, साहित्य-संस्कृती मंडळ, लोकसाहित्य या क्षेत्रांतल्या नव्या कल्पना व योजना, चांगल्या पुस्तकांचं पुनर्मुद्रण संपादन, इतिहास संशोधन या अत्यंत महत्त्वाच्या विभागांकडे त्यामुळे फारच दुर्लक्ष होतं. इतकं महत्त्वाचं असूनही ज्यांना कळत नाही, किंवा या क्षेत्रात रस नाही त्या मंत्र्यांकडे हे विभाग आल्यावर फक्त करमणूक तेवढी होते.

राज्यात अन्न आणि पुरवठा, रोजगार हमी अशी नवीन स्वतंत्र खाती व मंत्री आपण निर्माण केले. या चित्रपण, साहित्य, सांस्कृतिक कार्यासाठी सगळं एकत्र करून एक मंत्री किंवा राज्यमंत्री दिला तरी पुष्कळ न्याय मिळू शकेल. नाहीतर आज कोणीही त्यात लक्ष घालीत नाही. सहजासहजी चालेल तेवढंच त्यात होत आहे. शरदराव मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना व्यवस्थितपणानं असं करता येईल म्हणून मी १९७८ च्या सुमारास एक आराखडा करून दिला होता. त्यांनी ते का केलं नाही कळत नाही किंवा करणार असतील तोपर्यंत त्यांचं राज्य गेलेलं असावं.

यशवंतरावांना ही दृष्टी होती. हे असं नीट एकत्र करावं व त्याचं वेगळं खातं करावं हा यशवंतरावांचाही विचार होता, हे मला नंतर कळलं. या क्षेत्रातल्या बहुसंख्य योजना त्यांनीच नव्यानं सुरू केल्या व त्या क्षेत्रातले प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करून प्रतिष्ठा निर्माण करून दिली. ती त्यांची सगळी व्यवस्था व दालनं दुर्लक्षित झाल्यासारखी पुष्कळदा खिळखिळी झालेली पाहून फार दु:ख होतं.

मधल्या काळात एसेम्. जोशी, गोविंदराव तळवलकर, य. दि. फडके, सर्जेराव घोरपडे, भालचंद्र नेमाडे व अन्य काही लोकांकडे जुन्या कोणत्याही घटनांचे संदर्भ यशवंतरावांनी मागितले आहेत ते पाठवायचे आहेत असं काही समजलं म्हणजे त्यांचं आत्मचरित्र लेखनाचं काम चांगलं चाललेलं आहे, पुढे गेलं आहे हे लक्षात येत होतं. त्या काळात आणि त्यांना भेटून त्रास देणा-यांना थांबविण्याचं काम जमेल तेवढं करीत होतो. यशवंतरावांनी १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भातली कादपत्रं, काही माहिती मागितली तेव्हा दुस-या खंडाच्या लेखनाला प्रारंभ झाला असावा हे लक्षात आलं. त्याच वेळी पिहला भाग ‘कृष्णाकाठ’ लोकांसमोर आला. त्या पुस्तकाचं सगळ्याच थरांतल्या वाचकांकडून उत्स्फूर्त स्वागत झालं. यशवंतरावांनाही त्यामुळे पुढे लिहायचा उत्साह वाढला. दुस-या व तिस-या भागाची लोक फार उत्सुकतेनं वाट पाहत होते. ‘कृष्णाकाठ’चा प्रकाशन समारंभ इत्यादी सगळं लोकांनी आग्रह धरला होता तरी यशवंतरावांनी टाळलं त्या निमित्तानं मात्र श्री. सर्जेराव घोरपडे यांच्या घरी त्यांनी पाच-सात मित्रांना तेवढं बोलविलं. केवळ साहित्यावर त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत जेवण घेतलं व सही करून ‘कृष्णाकाठ’ची एकेक प्रत भेट दिली. सर्वश्री शरदराव पवार, सौ. प्रतिभाताई, व्यंकटेश माडगूळकर, भालचंद्र नेमाडे, विनायकराव पाटील, गोविंदराव तळवलकर, गो. मा. पवार व मी आणि प्रकाशक सर्जेराव घोरपडे एवढेच लोक त्या ठिकाणी होते.