भाई उद्धवराव पाटलांचा डोळ्यांत भरावा, खूप काळ विसरता येणार नाही, इतका सुंदर देखणा भव्य सत्कार औरंगाबादेला झाला. एसेम् जोशी, यशवंतराव, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, वर्ध, बापू काळदाते अशी त्यांच्यासोबत काम केलेली नामवंत मंडळी, खूप कार्यकर्ते, नेते सभा सम्मेलनात बोलले. भाई उद्धवराव पाटील, यशवंतराव यांचे संबंध जेव्हा उद्धवराव पाटील व यशवंतरावांच्या भाषणांमधून काही घटना, प्रसंग आठवणींतून लोकांसमोर आले तेव्हा बहुतेक नवे लोक ते ऐकताना थक्क झाले. सुसंस्कृत, सुजाण, परिपूर्ण राजकारण कसं करायचं असतं त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण. व्यासपीठावर सगळ्याच पक्षांची बडी मंडळी होती. विरोधापुरताच विरोध, तोही विशिष्ट काळापुरता मर्यादित, बाकी सगळे मिळूनच, सत्ताधारी व विरोधी अस एकत्र येऊनच राज्याचे, देशाचे प्रश्न सोडवायचे असतात. देशाची उभारणी करायची असते. यशवंतराव व एसेम् जोशी यांच्या भाषणांमधून हे महत्त्वाचं सूत्र प्रामुख्यानं सांगितलं गेलं. एसेम्, यशवंतराव, उद्धवराव या नेत्यांच्या दिवसभराच्या चर्चा, खाजगी चर्चा, गप्पागोष्टी ऐकल्यावर व जिव्हाळा नि आदर पाहिल्यावर नव्यानं पुढारी झालेल्या व अपरिपक्व राजकारण करणा-यांना फार अवघडल्यासारखं वाटलं. वेड्यासारखं पुन्हा पुन्हा हे खरंच आहे हे पाहत असूनही त्यांना खरं वाटेना. नवलाईचं, अद्भुत वाटलं.
बापूसाहेब काळदाते यांचं भाषण सुरू झालं तेव्हा पाऊस सुरू झाला. दहा हजार लोक सभामंडपात होते. अंगावर पाणी गळत होतं. कोणीही जागचं हललं नाही. उठले नाहीत. गडबड केली नाही. शातंपणानं पावसात थोडं भिजत ऐकत राहिले. थोड्या वेळानं पाऊस थांबला. बापूसाहेब काळदाते त्यांच्या लांबलचक पल्लेदार अलंकारिक वक्तृत्वानं बोलत गेले. शेतक-यांच्या व दुष्काळाच्या प्रश्नांवर बोलले. बापूंच्यानंतर यशवंतराव बोलले.
बापूसाहेब बोलायला उभे राहिले तेव्हा पाऊस सुरू झालेला होता. बापू सुरूवातील बोलताना म्हणाले होते, मी बोलायला उभा राहताच पाऊस आला वगैरे. दुष्काळी प्रदेश, पाणी यासंबंधी व शेतीच्या वाढत्या मोडकळीच्या प्रश्नांसंबंधी अगोदरच्या सगळ्या वक्त्यांचा उल्लेख करून यशवंतरावांनी काही योजना व उपाय गांभीर्यानं सांगितले. उद्धवरावांच्यासारख्या शेतकरी नेत्याच्या गौरवात ते जरूरीसुद्धा होतं.
यशवंतराव म्हणाले, ‘आता सत्याऐंशी दुष्काळी तालुके राहिले नाहीत. आता शंभराच्या पुढे दुष्काळी तालुके गेले. तिथे पाऊसच पडत नाही, काय करणार? पावासाचा प्रश्न पहिल्यांदा गहन आहे. तो सुटला तर पुष्कळ गोष्टी सोप्या होतील. बापूसाहेब काळदाते यांची भाषणं सगळ्या दुष्काळी प्रदेशात व तालुक्यात ठेवा म्हणजे तेवढा तरी पाऊस हातचा होईल. आताच बापू म्हणाले म्हणून मी म्हणतो. एवढी पावसाची कळसूत्री आपल्या जवळच असल्यावर पुष्कळ आधार झाला. बापू, यशवंतराव, एसेम्, उद्धवराव सगळ्यांसकट प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात हसले, भाषण संपविलं.
मोजकं, नेमकं बोलण्याची कला यशवंतरावांजवळ होती. भाई उद्धवराव पाटलांचा गौरव करताना भाईंच्या डोळ्यांत पाणी आलं. सगळेच भारावले. यशवंतराव खूप गौरवानं बोलले व म्हणाले, ‘बाईसाहेबांचासुद्धा सत्कार आपण या वेळी त्यांच्यासोबत केला ही चांगली गोष्ट केली. त्यांच्या खडतर आयुष्यात बाईसाहेबांचा वाटा फार फार मोठा आहे.’ आणि त्यांचे डोळे नकळत भरून आल्यासारखे वाटले. वेणूताईंची आठवण सहज त्यांच्या मनाला पांघरून गेली असावी.
समाजजीवनात आपण सगळेच मित्र आहोत. सहकारी आहोत. विरोधाचे काही क्षण, वेळा व प्रसंग तेवढे सोडून राष्ट्राच्या उभारणीत सगळ्यांचा वाटा व प्रतिष्ठा सारखीच आहे. केवळ सत्ताधा-यांची ती नाही, हा विचार त्यांनी मुख्यत: मांडला. तसं आयुष्यभर जगले म्हणून त्यांच्या बोलण्याचा विशेष अर्थ होता. महत्त्व होतं.