सह्याद्रीचे वारे - ५९

तेव्हां प्रश्न आहे तो माणसाच्या कर्तृत्वाचा. हें कर्तृत्व जागृत करून, वाढवून आपण कामाला लावलें पाहिजे. कोरडवाहू शेती हें आपल्या दृष्टीनें एक मोठें ओझें झालें आहे. त्याला अशा कर्तृत्वाची जोड मिळाली पाहिजे. तुमचीआमची सगळी शक्ति एकवटून, असेल तें सर्व सामर्थ्य एकत्र करून या नव्या राज्याची प्रगति करण्यासाठीं आपण सारखें झटलें पाहिजे. हीच आपल्या दृष्टीनें मूलभूत महत्त्वाची बाब आहे.

मनामध्यें एखादी गोष्ट व्हावी असें वाटणें आणि प्रत्यक्ष ती घडण्याची शक्यता असणें यामध्यें फार फरक आहे. मोठमोठ्या रकमांची वांटणी करण्याचा जेव्हां प्रश्न उपस्थित होतो तेव्हां निरनिराळ्या भागांतील गोष्टींचा अग्रहक्क आणि हा खर्च करण्यासाठीं उपलब्ध असलेली यंत्रणा यासंबंधींचा विचार आपणांस प्रथम करावा लागतो. त्यामुळें आपल्या मनांत असलेल्या गोष्टी प्रत्येक वेळी घडून येतीलच असें नाहीं. मीं मघाशीं सांगितलें त्याप्रमाणें समाजांतील कर्तृत्व जागें करून आपण एक कर्तृत्ववान समाज निर्माण केला पाहिजे. त्यासाठीं आवश्यक त्या सोयी उपलब्ध करणें, सवलती देणें हें शासनाचें काम असून शासन ते करीत आहे. सरकारनें औद्योगिक वसाहतींची योजना तयार केली आहे. पण औद्योगिक वसाहती संपूर्ण तयार होण्यास वेळ लागतो. लोकांनींच पहिल्याने पुढें आलें पाहिजे. या बाबतींत शासनाला काय करतां येईल याचा मी विचार करीन. नवीन उद्योगधंदें सुरू करण्याच्या दृष्टीनें कोणालाहि प्रयत्न करण्यास प्रत्यवाय नाहीं. उद्योगधंद्यांच्या वाढीस अनुकूल अशी परिस्थिति आज हिंदुस्तानांत निर्माण झालेली आहे, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. थोडीशी जमीन आणि वीज यांच्या साहाय्यानें हें करतां येण्यासारखें आहे. म्युनिसिपालिट्या, बँका यांना हें काम करतां येईल. लोकांची अशी कल्पना आहे कीं, औद्योगिक वसाहत ही केवळ सरकारनेंच स्थापन केली पाहिजे. ही कल्पना चुकीची आहे. शासनाचें जें सहकार्य लागेल तें देण्यास शासन तयार आहे.

या दृष्टीनें प्रयत्न करण्याची सरकारची इच्छा आहे. या बाबतींतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाची वाढ ही होय. शिक्षणाची वाढ करणें हें महाराष्ट्र राज्याचें मी एक ध्येय मानतों. विदर्भांत शिक्षणाच्या ज्या सवलती आहेत त्या तर आम्ही कायम ठेवणारच आहोंत पण त्याशिवाय ह्या सवलती जितक्या वाढवितां येतील तितक्या वाढविणार आहोंत. येत्या बारा ते पंधरा वर्षांच्या काळामध्यें शिक्षणाचा हा प्रचंड प्रवाह महाराष्ट्रांतील प्रत्येक शहरांत व प्रत्येक खेड्यांत पोहोंचला पाहिजे आणि त्यांतून खेड्यांतील नवीन पिढी सुशिक्षित झाली पाहिजे. शिक्षणद्वारा होणारी ही क्रांति झालीच पाहिजे. असें एकहि घर राहतां कामा नये कीं, जेथें उच्च शिक्षणाची संधि पोहोंचलेली नाहीं. ही शैक्षणिक क्रांति समाजामध्यें अशी जबरदस्त शक्ति निर्माण करील कीं, ती शक्ति आपल्याला गप्प बसूं देणार नाहीं. अडाणीपणाबरोबर भित्रेपणाहि येतो. परंतु ज्यावेळीं साठसत्तर टक्के समाज सुशिक्षित असतो, त्यावेळी तो कुणापुढेंहि नमतें घेत नाहीं. खरें-खोटें, योग्य-अयोग्य, हिताचें-गैरहिताचें हें सर्व तो आपल्या शिक्षणाच्या तराजूवर तोलून बघतो. घराघरामध्यें असे तराजू लागल्यावर जें घडेल तें चांगलेंच असेल. अशी परिस्थिति निर्माण करण्याच्या आणि त्याचबरोबर समाजाला उन्नत करण्याच्या प्रतिज्ञेला महाराष्ट्र राज्य बांधलेले आहे. अशी जबरदस्त सामाजिक शक्ति निर्माण झाली म्हणजे ती या समाजाला, राज्याला व राष्ट्राला प्रगतीच्या दिशेनें पुढें रेटल्याशिवाय राहणार नाहीं अशी माझी धारणा आहे. या सामाजिक शक्तीबरोबरच ज्या प्रमाणांत वाढ करतां येईल त्या प्रमाणांत सहकारी संस्थांचीहि वाढ केली पाहिजे.