सह्याद्रीचे वारे - ५८

विदर्भामध्यें काय किंवा उरलेल्या महाराष्ट्रामध्ये काय, कांहीं जमीन जरूर चांगली आहे. कृष्णाकांठची जमीन, किंवा नाशिकजवळची काळी कपाशीची जमीन, किंवा मराठवाड्यांत परभणी-नांदेडकडील जमीन, ही सर्व जमीन सुंदर आहे. पण केवळ चांगली काळी जमीन आहे म्हणून शेतीबाबतचे सर्व प्रश्न सुटलेले नाहींत, सुटणारहि नाहींत. याचें कारण काय ? पंजाबप्रमाणें आपल्या जमिनीला भरपूर पाणी मिळत नाहीं हें त्याचें कारण आहे. पंजाबला पाण्याचा जो भरपूर पुरवठा आहे त्याचें कारण पंजाबच्या वाट्याला वर्षांतून चारसहा महिने दुथडी भरून वाहणा-या नद्या आल्या आहेत हें आहे. परंतु आमच्या येथील गरीब शेतीला मदत करणा-या नद्यांची स्थिति तशी नाहीं. विदर्भाला काय किंवा महाराष्ट्राच्या इतर भागांना काय, भूगोलानें नद्यांचे कांही फायदे दिलेले असले तरी त्याबरोबरच त्यानें कांही तोटेहि दिलेले आहेत. आमच्या बहुतेक नद्या एक तर पूर्ववाहिनीं आहेत किंवा दक्षिणवाहिनी तरी आहेत. या दोन्ही प्रकारच्या नद्यांचें वर्णन दोन सिस्टिममध्यें करण्यांत येतें. एक गोदावरी सिस्टिम आणि दुसरी कृष्णा सिस्टिम. विदर्भात आणि नाशिकजवळ निघणा-या बहुतेक सर्व नद्या गोदावरीला मिळतात आणि ही गोदावरी आम्ही सिरोंचाजवळ आंध्राच्या ताब्यांत देतों. तीच गोष्ट कृष्णा सिस्टिममधील नद्यांची, दक्षिण साता-याच्या सरहद्दीवर भरलेल्या सर्व नद्या आम्ही कृष्णेसह कर्नाटकच्या हवालीं करतो. म्हणजे सगळ्या नद्यांची शेपटेंच फक्त आमच्या ताब्यांत आहेत. उत्पादनाच्या दृष्टीनें महत्त्वाचे असलेले त्यांचे भाग दुस-यांच्या ताब्यांत आहेत. याचा परिणाम साहजिकच महाराष्ट्रांतील शेतीवर होतो. या दृष्टीनें पाहिले तर पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिति कांहींशी बरी आहे. पण विदर्भाच्या बाबतींत ती अवघड आहे. आपल्या वांट्याला येणा-या पाण्याचा थेंबन् थेंब जरी आपण वापरला तरी पंधरा ते वीस टक्के एवढीच जमीन आपण पाटाच्या पाण्याखालीं आणूं शकतो. याचाच अर्थ असा कीं, सबंध महाराष्ट्रांतील आणि विशेषतः विदर्भांतील शेतीचा प्रश्न हा कोरडवाहू शेतीचा प्रश्न आहे. तेव्हां कोरडवाहू शेतीवर आधारलेली अर्थव्यवस्था कशी प्रगत करावयाची हा तुमच्याआमच्यापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे. जनतेला नवीन जीवनानें सजविलें पाहिजे, जनतेपुढें नवे आदर्श निर्माण केले पाहिजेत असें आपण आग्रहाने सांगतो. पण केवळ शब्दांच्या फुलो-यानें हें होत नाही. नाटकांतील राजाच्या आज्ञा जेवढ्या परिणामकारक ठरतात तितकेच परिणामकारक शब्दांचे हे फुलोरेहि ठरतील. तेव्हां यांतून मार्ग काढण्यासाठी स्वयंप्रेरित, स्वयंचलित अशा शक्ति आपण निर्माण केल्या पाहिजेत. कोरडवाहू शेतीचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर छोट्या छोट्या विहिरी काढाव्या लागतील, त्या दृष्टीनें आपण आतां विचार केला पाहिजे.

शेतीसंबंधी एवढें सांगितल्यावर, आतां उद्योगधंद्यांच्या प्रश्नाकडे वळूं. अशी एक सर्वसाधारण समजूत आहे कीं, धनपतींच्या भांडवलाच्या मदतीनें आणि त्यांच्या मेहेरबानीनेंच मोठमोठाले कारखाने निघूं शकतात. पण ही समजूत खरी नाहीं, जेथें जेथें आवश्यक असा कच्चा माल मिळतो तेथें तेथें भारत सरकार कारखाने काढतें हें आपल्याला माहीतच आहे. हीच गोष्ट अर्थात् उद्योगपतींच्या बाबतींहि खरी आहे. परंतु उद्योगपतींनीं उद्योगधंदे सुरू करावेत म्हणजे आपलें कल्याण होईल अशा प्रकारची आशा ठेवून त्यावर अवलंबून राहणारा समाज प्रगत होऊं शकत नाहीं. त्यासाठीं स्वतःच्या प्रयत्नांनीं स्वतःची शक्ति उपयोगांत आणून आम्हीं धडपड केली पाहिजे. गांवोगांवीं आणि शहरोशहरीं असे प्रयत्न झाले पाहिजेत. ह्या दृष्टीनें पंजाबचें उदाहरण मी उत्कृष्ट म्हणून सांगूं इच्छितो. आपल्याला माहीतच आहे कीं, मुंबई शहर हें भारतांतील एक फार मोठें भरभराटलेलें शहर आहे. या शहराचा तसा लौकिक आहे. आणि म्हणूनच आम्हीं या शहरासाठी आग्रह धरला होता. तें आतां महाराष्ट्राला मिळालें आहे. त्याचा प्रश्न नाहीं. प्रश्न आहे तो असा कीं, मुंबई शहरासह महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न पंजाबपेक्षां कमी आहे. हें असें कां? याचें कारण अगदीं उघड आहे. पाण्यांत सतत न्हाणारी शेती आणि कुणावरहि अवलंबून न राहतां स्वतःचे दोन हात व मनगटें यांचा वापर करणारा पंजाबी माणूस यामुळेंच पंजाबची आज एवढी भरभराट झाली आहे. पंजाबमधील कांही शहरें मीं पाहिलीं आहेत. तेथें प्रत्येक घरांत रेडियो आहे. पंजाबी माणूस तसा षोकीन आहे. हे लोक चांगलें खातील, चांगले कपडे वापरतील. पण त्याचबरोबर त्यांच्या घरांत एखादा उद्योगहि चालू असलेला तुम्हांला दिसेल. त्यांचें एक एक घर म्हणजे एक एक छोटासा कारखाना आहे. त्यांचें एक एक दुकान म्हणजे मालाच्या विक्रिवर केवळ कमिशन मिळविण्याची जागा नव्हे. तेथें तुम्हांला एखादा 'लेथ' दिसेल, लहानसा कारखाना दिसेल, त्यांत दहापांच माणसें सारखीं काम करतांना दिसतील. मुंबईतील मोठमोठ्या कारखान्यांत लागणा-या छोटया वस्तू पंजाबमधील छोटे कारखानदार पुरवीत असतात असें मला आढळून आले. मुंबईमध्यें चढाओढीनें काम करणा-या या कारखान्यांना सुद्धां पंजाबमधल्या छोट्या कारखान्यांत तयार होणारा माल घ्यावयाला परवडतो ही गोष्ट महत्त्वाची आहे.