सह्याद्रीचे वारे - ५२

आणि दुस-या एका गोष्टीचा मी आतां येथें उल्लेख करतों. उल्लेख म्हणण्यापेक्षां आपण त्याला घोषणा म्हटलें तरी माझी त्याला कांहीं हरकत नाहीं. रत्नागिरीच्या माझ्या मागच्या दौ-यानंतर सद्यःपरिस्थितीचा विचार करून जाहीरपणें एक गोष्ट मी बोललों होतों. ती अशी कीं, देशावरच्या जिल्ह्यांनीं कांहीं काळ आपली प्रगति थांबवून कोंकणचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याकरितां त्याग करावयाची तयारी दाखविली पाहिजे. माझी ही एक भावना होती आणि त्या दृष्टीनें मी कांहीं प्रयत्न करीत होतों. असा प्रयत्न करीत असतांना आम्ही या निर्णयाला आलों आहोंत कीं, द्वितीय पंचवार्षिक योजनेंत अंतर्भूत केलेल्या योजनांवर खर्च होणा-या पैशांपैकीं त्या योजनेच्या काळांत जो पैसा शिल्लक राहील त्यांतील एक कोटी रुपये रत्नागिरी, ठाणें आणि कुलाबा या जिल्ह्यांतील रस्त्यांसाठीं, बंदरांसाठीं आणि मच्छीमारीच्या धंद्यांसंबंधींच्या कामासाठीं द्यावेत व योजनेच्या राहिलेल्या दोन वर्षांच्या काळामध्यें या तीन महत्त्वाच्या कामांसाठींहि एक कोटी रुपयांची रक्कम खर्च करावी. अशा प्रकारचा निर्णय सरकारनें नुकताच घेतलेला आहे.

मी ही फक्त कामाची सुरुवात आहे असें मानतों. याच दिशेंने जर आम्ही प्रयत्न करीत गेलों तर तुम्हीं जो विधायक प्रयत्न सुरू केलेला आहे तो ख-या अर्थांने यशस्वी होईल, आणि कोंकण विकास परिषदेच्या मार्गदर्शनाचा पाठपुरावा या राज्याचे दुसरे विभागहि करतील अशी मी आशा करतों. कारण कोंकणचा विकास व्हावा हें जसें माझ्या मनांत आहे, त्याचप्रमाणें या राज्यांतील प्रत्येक विभागाचा विकास व्हावा अशी आपली अपेक्षा असली पाहिजे. प्रादेशिक विकासाच्या पाठीमागची हीच कल्पना आहे. नुसता देश मोठा होऊन भागत नाहीं, तर वेगवेगळ्या ठिकाणीं, वेगवेगळ्या घरांत राहणारा माणूस विकसित झाला पाहिजे. विकासाच्या पाठीमागची आमची ही भूमिका आहे. आणि याच विचाराच्या भूमिकेवरून आम्ही हा प्रयत्न करीत आहोंत. मला माझ्या मर्यादेंत शक्य होईल तें सहकार्य माझ्याकडून आपणांला मिळेल असें मी आपणांला आश्वासन देतों आणि आपण हा सुरू केलेला प्रयत्न ख-या अर्थानें होवो अशी प्रार्थना करून या परिषदेचें उद्घाटन झालें असें मी औपचारिक रीत्या जाहीर करतों.