विशाल सह्याद्रींत काय आलें आहे, केसरीनें काय म्हटलें आहे, न्यू एजमध्यें काय आलें आहे, साधनेमध्यें काय आलें आहे - उदाहरणादाखल मी हीं नांवें घेतों आहें - हें पाहणारे लोक पक्षवाले लोक आहेत. पण समोर आलेले प्रश्न आणि समोर आलेलीं माणसें यांची आपल्या दृष्टींने परीक्षा करून विचार करणारी अशीं जीं माणसें आहेत तीं, यांचें काय म्हणणें आहे, त्यांचें काय म्हणणें आहे हें सर्व तपासून पाहत असतात. अशा प्रकारें तपासून पाहण्याची दृष्टि समाजामध्यें वाढत आहे. मी आपणांला सांगू इच्छितों कीं ही जी दृष्टि आहे तिचें महत्त्व समाजामध्यें वाढत राहणार आहे. आणि मी असें मानतों कीं, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनें जर सगळ्या पक्षांना विचार करावयाचा असेल तर त्यांनी ज्या या समाजाबद्दल मी हें बोलतों आहें त्याला काय आवडेल आणि त्याच्या काय गरजा आहेत हें पाहण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळें मला मदत केल्यासारखें होणार आहे. माझें स्वतःचें असें मत आहे कीं, हा समाज आज दबलेला समाज आहे, तो दलित समाज आहे, तो न बोलणारा समाज आहे. पण तो मुका समाज नाहीं; फक्त त्याला अजून बोलावयाचें धारिष्ट होत नाहीं. पण त्याच्या मनामध्यें एक चित्र निर्माण झालें आहे, एक स्वप्न रंगलेलें आहे. तें स्वप्न समजून घेण्याचा प्रयत्न करून, त्याला मूर्त स्वरूप देण्याचे काम तुम्हांआम्हांला आतां करावयाचें आहे.
हें कार्य पार पाडण्याचा यापुढें माझा प्रयत्न राहील. माझ्यामधील दोष त्यामध्यें येऊं न देण्याचा मी प्रयत्न करीन. पण माझे कांहीं दोष त्यांत आलेच तर मला सांगायला तुम्ही घाबरूं नका. जसें आपण मला चांगला म्हटलेंत तसें जरी आपण मला वाईट म्हटलेंत तरी त्याबद्दल मी खेद मानणार नाहीं किंवा त्याबद्दल मी आपणांला कधीं दोष देणार नाहीं. कारण मी नेहमीं सांगत असतों कीं, मुलाला मारण्याचा अधिकार सख्ख्या आईचाच असला पाहिजे. सावत्र आईचा नाहींच नाहीं, पण बापाचाहि असूं नये असें मी मानतों. कारण कधीं मारलाच पाठीवर एखादा धपाटा, तर दुस-याच क्षणीं ज्याला लागलें त्याच्यापेक्षां जिनें मारलें तिच्याच डोळ्यांतून पाणी येतें आणि ती आपल्या मुलाला पोटाशी धरतें. हा सख्ख्या आईचा धर्म आहे. तीच गोष्ट जनतेची आहे. माझा गेल्या चार-पांच वर्षांतला स्वतःचा अनुभव याचें उत्कृष्ट उदाहरण आहे. मीं माझ्या डोळ्यांनी पाहिलें कीं लोक खूप रागावले होते. पण मी लोकांच्यावर रागावलों नाहीं. कारण माझ्या मनांत शंकाच नव्हती. मला एवढेंच वाटत असे कीं आपल्याला जी गोष्ट बरोबर दिसते ती आपण लोकांना सांगितली पाहिजे. पण माझी अशी खात्री होती कीं, जर लोकांना पटलें तर तेच प्रेमानें जवळ करतील. परंतु इतक्या लवकर ही गोष्ट होईल असें मलाहि वाटलें नव्हतें. जे रागावलेले लोक होते तेच आज इतक्या प्रेमाने जवळ करतात. सख्ख्या आईसारखे हें नातें नाहीं तर मग दुसरें कोणतें आहे ?
परवां मला एक अनुभव आला. मी मराठवाड्यांत दौ-यावर गेलो होतो. मी दौ-यावर गेलों म्हणजे खूप लोक सभांना जमतात. अनेक ठिकाणी हारतुरे घालतात. हें तर अगदी प्रेमाचे लक्षण झालें आहे. या दौ-याच्या वेळी मराठवाड्याच्या एका तालुक्यांतून मी प्रवास करीत होतों. नाथांच्या पैठण तालुक्यांतून. एका छोट्या गांवाशेजारी पांचपंचवीस घरांची वाडी असेल, तेथें आपलीं दहापांच माणसें बसली होतीं. त्यामध्यें दोनचार मुलें आणि दोनचार म्हातारे होते. मला वाटलें, कां कोण जाणे, आपण येथें थांबले पाहिजे. तेथें कोणी हार घेऊन उभें राहिलें नव्हते. किंवा तेथें कमानहि नव्हती.