सह्याद्रीचे वारे - १०९

लोकशाही राज्यकारभाराची कसोटी

विदर्भ विभागांतील जिल्हाधिका-यांची परिषद भरविण्याचें मीं जेव्हां ठरविलें तेव्हां माझ्या मनांत एकदोन महत्त्वाचे विचार होते. त्यांतील एक विचार असा होता कीं, जे नवे विभाग मुंबई राज्यांत आले आहेत त्या विभागांत काम करणा-या अधिका-यांना मला एकत्र भेटतां यावें व त्यांची ओळख व्हावी. अधिकारी कसे आहेत हें मुख्यमंत्र्यांना व मुख्यमंत्री कसे आहेत हें अधिका-यांना पाहावयास मिळावें हा यामागील हेतु होता. ही उभयान्वयी परीक्षाच म्हणतां येईल. पण अशा परीक्षेची आवश्यकता आहे. तुम्हीं आणि मीं आतां जें काम सुरू केलें आहे, तें तुमचें आणि माझें सर्वांचेंच काम आहे. एका राज्याचा प्रमुख म्हणून मला जी जबाबदारी पार पाडावयाची आहे, ती मी एकटाच पार पाडूं शकणार नाहीं हें उघड आहे. हें काम करण्यासाठीं आपण जी यंत्रणा उभारली आहे, त्या यंत्रणेंतील अगदीं शेवटच्या इसमापासून तों या यंत्रणेंतील प्रमुख जागांवर असलेल्या व्यक्तींपर्यंत सर्वांच्या सहकार्यावर आणि परस्परांच्या विचारांच्या व भावनांच्या देवाणघेवाणीवर विसंबून, हें काम पार पाडावयाचें आहे. त्यासाठीं अशा प्रकारचा वैयक्तिक संबंध प्रस्थापित होण्याची आवश्यकता असल्यामुळें ही परिषद घेण्याची कल्पना माझ्या मनांत आली.

त्याचबरोबर दुसरीहि एक गोष्ट मला सांगावयाची आहे. राज्यकारभार करीत असतांना प्रश्न जसजसे उद्भवतील तसतसे ते सोडवीत जावयाचे याला कांहीं योजनाबद्ध राज्यकारभार म्हणतां येणार नाहीं. तर त्यासाठीं विचारपूर्वक अशा कांहीं पद्धति, कांहीं तत्त्वें निश्चित करून त्याप्रमाणें जर आम्ही काम करीत गेलों, तर त्याला योजनाबद्ध राज्यकारभाराचें स्वरूप प्राप्त होईल. या दृष्टीनें राज्यकारभाराच्या बाबतींत आपल्या कांहीं मूलभूत कल्पना असतील तर त्या आपण एकदां स्पष्टपणे सांगितल्या पाहिजेत. या साध्या गोष्टी आहेत, पण त्यांची एकदां उजळणी करण्याची आवश्यकता आहे. ही परिषद बोलावण्यांत हाहि माझा एक हेतु आहे.

प्रथम मला हें सांगावयाचें आहे कीं नव्या विभागांचें व त्यांतील जनतेचें मी ज्याप्रमाणें स्वागत करतों आहें, त्याचप्रमाणें व तितक्याच आपलेपणानें मी नव्या विभागांतून आलेल्या सर्व अधिका-यांचेंहि स्वागत करीत आहें. जे येथे हजर आहेत, त्याचप्रमाणें जे येथें हजर नाहींत, असे जिल्ह्यांतील सर्व अधिकारी व अगदीं शेवटच्या पायरीपर्यंतचे सर्व नोकर, यांचें राज्याचा प्रमुख या नात्यानें, या नव्या जबाबदारीच्या कामामध्यें मी स्वागत करीत आहें.

नव्या राज्याचा कारभार हा कांहीं अंशीं गुंतागुंतीचा कारभार आहे. परंतु गुंतागुंतीचें आणि अवघड काम करण्याकरतांच शहाण्या व कर्तृत्ववान माणसांची जरुरी असते. काम साधें असेल, अगदी सहजासहजीं होण्यासारखें असेल, तर त्यासाठी कर्तृत्ववान माणसांची फारशी आवश्यकता नसते. कर्तृत्वाची खरी परीक्षा अवघड कामामध्येंच होत असते. तेव्हां एका महान् स्वरूपाच्या, नवीन पण अवघड अशा कामामध्यें आपणां सर्वांच्या कर्तृत्वाची परीक्षा होणार आहे, ही गोष्ट आपण सतत ध्यानांत ठेवली पाहिजे.