अनेक युगांपूर्वी पायीं रखडणारा माणूस बैलगाडींतून प्रवास करूं लागला आणि आज तो विजेनें धावणा-या रेल्वेगाड्यांतून व हवेंत उडणा-या विमानांतून प्रवास करतो. अशीं हीं प्रगतीचीं पावले पुढें पुढें पडत आहेत. विज्ञानाची ही प्रगति आज एवढ्या झपाट्यानें होत आहे कीं, कोणी सांगावें, मानवाला नजीकच्या भविष्यांत केवळ या पृथ्वीतलाचाच नव्हे, तर अब्जावधि योजनें दूर असलेल्या ग्रहता-यांचा कारभार हाकावा लागेल. विज्ञानाच्या क्षेत्रांत या प्रकारें क्रांतिकारक परिवर्तन घडत असतांना विश्वविद्यालयांतून होणा-या विद्यादानाचें स्वरूप आहे तसेंच राहावें अशी अर्थातच कोणी अपेक्षा करणार नाहीं. निसर्गाचीं रहस्यें शोधून काढून त्यांचा आपल्या जीवनांत उपयोग करून घेणें, सुधारणेचा एक टप्पा गाठला कीं दुसरा टप्पा गाठण्यांसाठीं प्रयत्न करीत राहणें, आणि अशा रीतीनें सतत प्रगति करणें ही माणसाची उपजत प्रवृत्ति आहे. या प्रवृत्तीमुळेच आज प्रत्येक क्षेत्रांत त्यानें आघाडी मारली आहे. विद्यापीठें हीं या प्रवृत्तींना चालना देणारीं ज्ञानसत्रें असल्याकारणानें बदलत्या काळाबरोबर त्यांच्या स्वरूपांत बदल होणें अपरिहार्यच नव्हे, तर आवश्यकहि आहे. या दृष्टिनें विद्यापीठ हें ज्या भागांत बसलें असेल त्या भागांतील परिस्थितीपासून तें तुटक वा अलग राहूं शकणार नाहीं. तसें तें राहिलें तर त्याची उपयुक्तता अथवा परिणामकारकता संपुष्टांत येईल. तेव्हां विद्यापीठें हीं त्यांच्या भोवतालच्या प्रदेशाशीं व परिस्थितींशी पूर्णपणें तादात्म्य पावलीं पाहिजेत.
विद्यापीठीय शिक्षणकार्याचें हें जें विशेष अंग आहे त्याचा तुम्हीं काळजीपूर्वक विचार करावा अशी माझी तुम्हांस विनंती आहे. ज्या प्रदेशांत व ज्या काळांत आपण राहत आहोंत त्याच्या संदर्भांत वस्तुस्थितीचा व घटनांचा अभ्यास करणें हें तुमचें आद्य कर्तव्य ठरतें. प्रत्येक देशाला किंबहुना देशांतील प्रत्येक भागाला त्याचे असे कांहीं विशिष्ट प्रश्न व गरजा असतात. नव्या रक्ताच्या तुम्हां तरुणांनीं या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून ते सोडविण्याचा सातत्यानें प्रयत्न केला पाहिजे व अशा प्रकारें तुम्हीं तुमच्या प्रदेशांतील लोककल्याणाच्या कार्याचा एक अविभाज्य व जिवंत घटक बनलें पहिजे. पूर्वीच्या काळीं लोक विद्वान व व्यासंगी पुरुषांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करीत असत. आज विद्यापीठांतून शिक्षण घेतलेल्या तरुण स्त्री-पुरुषांकडून अशा मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. कारण एका अर्थानें आजचीं विद्यापीठें हीं प्राचीन काळांतील संत, सत्पुरुष व द्रष्टे यांचें ज्ञानप्रसाराचें कार्य पुढें चालवीत आहेत. अर्थात् ज्ञानदानाची पूर्वीची पद्धत व आजची पद्धत यांत पुष्कळच फरक झालेला आहे. त्याचप्रमाणें सुखसमृद्धीच्या कल्पनाहि आज बदललेल्या आहेत. थोडक्यांत म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वीपेक्षा आज आमूलाग्र बदलला आहे. तथापि, अखिल मनुष्यमात्राचें जास्तींत जास्त कल्याण साधण्याचें मानवाचें अंतिम ध्येय हें बदललें नाहीं अथवा बदलणारहि नाहीं.
मराठवाडा विद्यापीठ हें नव्यानें स्थापन झालें असलें तरी त्याची आज झपाट्यानें प्रगति होत आहे. या विद्यापीठांत शिक्षण घेण्याची संधी ज्या विद्यार्थ्यांना लाभली आहे त्यांना माझी अशी विनंती आहे की, त्यांनीं आपल्या भोवतीं घडत असलेल्या घटनांचा बारकाईनें अभ्यास करावा. एवढेच नव्हे तर त्या घटनांना योग्य प्रकारें वळण लागेल अशा प्रकारें त्यांनीं प्रयत्न करावेत. या प्रदेशाचे भावी नागरिक या नात्यानें त्याच्या उन्नत्तीसाठीं व उत्कर्षासाठीं प्रयत्न करणें हें त्यांचें कर्तव्यच ठरतें. आपण ज्या समाजांत वावरतो त्याचे गुणदोष काय आहेत याचा शोध घेऊन गुणांचा विकास व दोषांचें निराकरण करणें, आपल्या प्रदेशाचे जे निकडीचे प्रश्न असतील त्यांचा अभ्यास करणें आणि जनहिताच्या दृष्टीनें हे प्रश्न सोडविण्यास साहाय्य करणें हीच सुशिक्षित तरुणांकडून आज अपेक्षा आहे. तुमच्या वाडवडिलांना ज्या संधि मिळूं शकल्या नाहींत त्या तुमच्याकडे चालून येत असतांना तुम्हीं दवडल्यात आणि ऐन मोक्याच्या वेळीं आपलें कर्तव्य बजावण्यास तुम्ही चुकलांत असें तुम्हां तरुणांच्या बाबतींत भावी पिढ्यांना म्हणण्याचा प्रसंग येऊं नये. अगदी अलीकडच्या काळांत अत्यंत बिकट व दुर्धर अशा आपत्तींतून सहीसलामत बाहेर पडलेले मराठवाड्याचे तरुण आपल्याला असें दूषण लावून घेणार नाहींत असा माझा विश्वास आहे. तुमच्या या विद्यापीठानें सत्कार्याची दिशा तुम्हांला दाखवून दिली व तें पार पाडण्याची पात्रता व सामर्थ्य तुमच्या ठिकाणीं निर्माण केलें. आतां त्याचा उपयोग करून घेण्याचें काम तुमचें आहे. यापुढें ज्या निरनिराळ्या संधि तुम्हांला लाभतील त्यांचा कुशलतेनें उपयोग करून घेऊन तुम्हीं आपलें व त्याबरोबर आपल्या देशाचें हित साधलें पाहिजे.