• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे -८४

मला आणखी एक गोष्ट सांगावयाची आहे. विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी स्थानिक भागाच्या अडचणी व प्रश्न यांची दखल घेऊन ते सोडविण्याच्या कामीं साहाय्य केलें पाहिजे, याचा अर्थ संकुचित प्रादेशिक भावनांना उत्तेजन मिळावें असा मात्र नाहीं. कोणत्याहि प्रदेशाचे हितसंबंध हे सबंध देशाच्या हितसंबंधाचा एक अविभाज्य भाग असतात आणि म्हणून नेहमीं सर्व देशाच्या दृष्टींतूनच विचार केला पाहिजे. मराठवाड्याचा प्रदेश हा महाराष्ट्र राज्याचा एक घटक आहे आणि महाराष्ट्र राज्य हा भारताचा एक घटक आहे, याचें विस्मरण तुम्हीं कधींहि होऊं देतां कामा नये. भारताच्या या एकतेंतच आपलें सामर्थ्य सामावलेलें आहे. ही एकता भंग पावली तर आपली अधोगति झाल्याशिवाय राहणार नाहीं. हें सत्य सदैव नजरेसमोर ठेवून तें आचरणांत आणण्याचा आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. त्यांतच आपणां सर्वांचें व आपल्या देशाचें हित आहे.

महाराष्ट्रात राज्य स्थापनेनंतर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक या सर्व क्षेत्रांत आज नवें चैतन्य निर्माण झालें असून या नव्या राज्याच्या साधनसामुग्रीचा विकास करण्याचा आज गंभीरपणें विचार होत आहे व त्या दृष्टीनें लोक कार्यप्रवृत्त झाले आहेत.. मराठी भाषेचा विकास हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा एक स्वाभाविक परिपाक होय. शिक्षणाचें माध्यम व राज्यभाषेचा दर्जा तिला आतां प्राप्त होत आहे. कै. माधव ज्युलियनांनीं आपल्या एका कवनांत आशा व्यक्त केल्याप्रमाणें आपल्या या मायबोलीला आज दिव्य सुखाचे दिवस लाभत आहेत. मराठीचें माहेरघर असलेल्या मराठवाड्यांत मराठी भाषेच्या विकासास विशेष चालना मिळेल अशी मी आशा करतों.

अर्थात् मराठीच्या अभ्यासाबरोबर राष्ट्रभाषा म्हणून हिंदी, सर्व भाषांची मायभाषा व आपल्या प्राचीन संस्कृतीची भाषा म्हणून संस्कृत व आंतरराष्ट्रीय व्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजी या भाषांचाहि अभ्यास करणें आपल्याला आवश्यक आहे. इतिहासानें इंग्रजी भाषेशीं आपला जो घनिष्ठ संबंध आला, त्यामुळें इंग्रजी भाषा आपल्याला परकी राहिलेली नसून तिनें आपलें फार मोठें हितच साधलें आहे. कारण ज्ञानाची अपार भांडारें इंग्रजीनें आपल्याला खुलीं केलीं आहेत व त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यवहारहि सुलभ केला आहे.

भाषेचा विकास हा केवळ त्या भाषेंतील ललित साहित्याच्या संदर्भातच होतो ही समजूत चुकीची आहे. निरनिराळ्या वैज्ञानिक शास्त्रांचा अविष्कार जेव्हां भाषा करूं लागेल तेव्हांच तिचा खरा विकास झाला असे म्हणतां येईल. तेव्हां साहित्यिकांबरोबर शास्त्रज्ञ, इतिहासकार, तत्त्ववेत्ते हे सर्वजण मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासास चालना देतील असा मला विश्वास वाटतो. या दृष्टीनें तुमच्या विद्यापीठाच्या ज्या पदवीधरांनीं निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत पारंगतता मिळविली असेल त्या सर्वांनी मराठीच्या विकासास हातभार लावावा, अशी मी त्यांना या निमित्तानें विनंती करतों.

आपला शिक्षणक्रम पुरा करून तुम्ही आज जीवनाच्या क्षेत्रांत पदार्पण करीत आहांत. जीवनांतील कठोर वास्तवतेनें तुम्ही विचलित होऊं नका. आपलें काम परिश्रमपूर्वक व प्रामाणिकपणें करीत राहिल्यास जीवनाच्या आनंदाचा लाभ तुम्ही मिळवूं शकाल. विद्यापीठाचा उंबरठा ओलांडून आपल्या जीवनाची यात्रा आज तुम्ही सुरू करीत असतांना माझ्या आशीवार्दाची छोटीशी शिदोरी तुमच्या पदरी बांधण्याची परवानगी मला द्या. तुमच्या जीवनांत तुम्हांला सुख, समाधान व सुयश लाभो, अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतों.