• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे -८२

नवपदवीधरांकडून अपेक्षा

मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाचें अभिभाषण देण्याचा हा योग म्हणजे माझ्या जीवनांतील एक आनंदाचा क्षण व गौरवपूर्ण संधि आहे असें मी मानतों. हें विद्यापीठ आपल्या राज्यांत नवीनच उदयास आलें असलें तरी दक्षिणेंतील काशी म्हणून नांवाजलेलें व विद्यापीठ म्हणून शेंकडों वर्षे मान्यता पावलेलें प्रतिष्ठान क्षेत्र याच मराठवाड्यांत आहे याची आठवण झाली कीं मराठवाड्यांतील विद्यादानाच्या महान् परंपरेचा धावता चित्रपट माझ्या नजरेसमोर येऊन जातो. या सर्व काळांत विद्याक्षेत्रांचीं स्थानें बदललेलीं आहेत. एवढेंच नव्हे तर विद्येच्या क्षेत्रामध्येंच विचाराच्या व विस्ताराच्या दृष्टीनें मौलिक परिवर्तन झालें आहे.

या सर्व परिवर्तनाचा मागोवा घेणें एका अर्थानें उद्बोधक आहे. तपशिलांत न शिरतां स्थूलमानानें या परिवर्तनाचें स्वरूप समजून घेतलें तर आजच्या विद्यापीठाच्या कार्याचें व कर्तव्याचें स्वरूप कांहीसें स्पष्ट होईल. ज्ञानाच्या कल्पनेचा मौलिक विचार अनेक वर्षांपासून या भागांत झाला आहे. त्यांतील कांहीं तत्त्वें आजहि मार्गदर्शक ठरूं शकतील. कारण मानवी प्रवृत्ति व दृष्टिकोन हे निरनिराळ्या काळांत बदलत असले तरी मानवी मूल्यें हीं चिरंतन टिकणारीं आहेत. मानवी जीवनास आधारभूत असलेली हीं मूल्यें सर्व काळांत आणि सर्व देशांत उपयुक्त ठरलीं आहेत. अखंडपणें वाहत असलेल्या कालप्रवाहांत निश्चल अशा दीपस्तंभाप्रमाणें मानव जातीला सतत प्रकाश देत राहिलेलीं ही सत्यें प्राचीन काळांतील ज्या संतांनीं, महात्म्यांनी व द्रष्ट्यांनीं शोधून काढलीं व प्रसारित केलीं त्यांच्याविषयीं आपण सदैव कृतज्ञच राहिलें पाहिजे. या मूल्यांचा व सत्यांचा आपल्या जीवनांत अंगिकार करून त्यांचें लोण भावी पिढ्यांपर्यंत पोहोंचविणें हें आपले कर्तव्य आहे. मराठवाड्याच्या ह्या पवित्र भूमींत प्राचीन काळीं विद्यादानाचीं हीं जीं तीर्थक्षेत्रें होतीं त्यांचें महत्त्व हें असें आहे. आधुनिक काळांतील शाळा, विद्यालयें व महाविद्यालयें यांच्याहून यापूर्वीच्या विद्यापीठांचे स्वरूप पुष्कळसें भिन्न होतें हे जरी खरें असलें, तरी ज्ञानदानाचें अमोघ असें कार्य त्यांनीं केलेले आहे यांत संदेह नाहीं. एका आंग्ल कवीनें म्हटलें आहे कीं, कारागृह हें कांहीं त्याच्या दगडी भिंतींनीं बनलेलें नसतें. हीच गोष्ट एका अर्थानें विद्यालयें अथवा विद्यापीठें यांच्या बाबतींतहि खरी आहे. तेव्हां प्राचीन काळांतील विद्यादानाची ही स्थानें एक प्रकारचीं विद्यापीठेंच होतीं. अर्थात् त्यांचीं उद्दिष्टें व कार्यपद्धति हीं त्या काळांतील परिस्थितीस अनुरूप अशीच होतीं.

त्या काळांत संतमहात्म्यांनी ज्ञानाचा प्रसार समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत पोहोंचेल अशा रीतीनें केला. ज्ञानदानांत कोणत्याहि प्रकारचा आप-पर अथवा उच्च-नीच असा भाव असतां कामा नये अशी त्यांची धारणा होती. ज्ञानाचा प्रसार सर्वत्र होऊन मानवी जीवन नवचैतन्यानें उजळून निघावें या निष्ठेनें व ध्येयानें ते प्रेरित झाले होते. त्या काळीं अध्यात्म, ईश्वरोपासना, विश्वाचें अनादि व अनंत असें स्वरूप, निसर्गाचें असीम सौंदर्य व भव्यता, नीतिशास्त्र हे ज्ञानाचे विषय होते, हें स्वाभाविकच आहे. तथापि आतां केवळ काळ बदलला असून जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांत परिवर्तन घडलें आहे व घडत आहे. अर्थात् याबद्दल खेद वा खंत बाळगण्याचें कारण नाहीं. काळ हा स्थिर नसून आपण काळाच्या प्रवाहाबरोबर राहिलें पाहिजे.