१५२. यशवंतराव: एक शैलीदार माणूस – श्री. भा. कृ. केळकर
श्री. यशवंतराव चव्हाण दिल्लीत आले ते संकटाच्या छायेतच. चिनी आक्रमणामुळे एक काळजीची मन:स्थिती देशात निर्माण झाली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मिळविलेला लौकिक त्यांच्या पाठीशी होता. पं. नेहरूंचा वरदहस्त होता. पण दिल्ली ही फसवी नगरी आहे. पाण्यातल्या भोव-यासारखे येथे राजकारणात भोवरे आहेत. निसरडी, परंतु वरून मोहविणारी सत्तेची वाट आहे. जिभेवर मध, पण आत पाताळयंत्री मन असे दिल्लीचे राजकीय मत आहे. संसद गाठली तरी तिचा दबदबा मोठा आहे. अशा दिल्लीत यशवंतराव आले तेव्हा माझ्यासारख्या व इतर असंख्य हितचिंतकांना काळजीच होती.
यशवंतराव आले तेव्हा अनेकांना पोटदुखी सुरू झाली. मत्सर, असूया यांनी ग्रासलेली राजकीय पुढा-यांची मने हा दिल्लीचाच नव्हे तर सगळीकडचा अनुभव. यशवंतराव दिल्ली दरबारात नवीन. त्यांना स्वत:ची लॉबी किंवा प्रशंसकही नव्हते. स्वत:च्या कार्यशैलीने व मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी नोकरशाहीला आपल्या बाजूला केले. संरक्षण खात्यातील वातावरण बदलून टाकले. संसदेवर आपल्या वाक्यपटूत्वाने व कार्यक्षम कारभाराने प्रभाव टाकला. यशवंतरावांची ही शैली गृहखात्याचा कारभार हाती घेतल्यावर विशेष अनुभवास आली.
पोलिसांचे आंदोलन, विद्याथ्र्यांतील असंतोष, गव्हर्नरांचे अधिकार, केंद्र-राज्य संबंध, हिंदु-मुस्लीम दंगे असे अनेक आजही न सुटलेले प्रश्न यशवंतरावांच्या गृहमंत्री कारकीर्दीत उपस्थित झाले. तथापि त्यांनी गृहखात्यातील संशोधन विभाग कामास लावला व अनेक माहितीपूर्ण शोध निबंध तयार करविले.
यशवंतराव राजकीय पुढारी होते तरी ते सनदी अधिका-यांकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहात नसत. त्यांच्या अनुभवांचा, निर्णयक्षमतेचा फायदा यशवंतरावांना सर्व मंत्रालयात झाला. नोकरशहा हे स्वभावत: शंकेखोर असतात. नकार देण्यात पटाईत असतात. पण यशवंतरावांचे म्हणणे असे होते की, ‘‘राजकीय पुढा-यांनी ‘‘नाही’’ म्हणावयास शिकावे व नोकरशहांनी ‘‘हो’’ म्हणावयास शिकावे म्हणजे राज्यकारभार नीट चालेल.’’ यातील खोच स्पष्ट आहे. जे सनदी नोकरांचे आहे तसेच तंत्रज्ञांचेही आहे.
यशवंतराव हे काँग्रेसला सर्वस्व मानणारे होते. श्री. काकासाहेब गाडगीळ म्हणत, ‘‘काका-काँग्रेस · गल्लीतील वकील’’ हे समीकरण काकासाहेबांनी आपल्या शैलीत मांडले होते. याचे कारण काँग्रेसनेच या पिढीचे जीवन घडविले होते. तीच गत यशवंतरावांची होती. काँग्रेस सोडून त्यांचे मन कुठेच रमले नाही. पण यशवंतराव हे लोकशाहीवादी होते. त्यांनी लोकहिताची व राष्ट्रकल्याणाची कोणतीही योजना झिडकारली नाही. मी मजूर खात्याच्या प्रसिद्धीचे काम करीत असतानाच दक्षिण रेल्वेच्या एंजिन ड्रायव्हर्सचा संप झाला. त्यांना अमानुष वागणूक मिळे. यशवंतरावांकडे मी ते प्रकरण नेले आणि त्यांना अनुकूल भूमिका देण्याची विनंती केली. पुढे एंजिन ड्रायव्हर्सना कामाचे तास कमी करून मिळाले. न बोलता, जाहिरात न करता काम करणे हा त्यांचा स्वभाव होता. खरे म्हणजे ते जुन्या पठडीतले काँग्रेस नेते होते.
राजकारणात गुंतलेले यशवंतरावांचे मन साहित्य, संगीत, काव्य यांच्यात अधिक रमत असे. त्यांची वाणी सुभाषित वाणी होती. बुद्धिवर चिंतनाचे, वाचनाचे संस्कार झालेले होते. श्री. काकासाहेब गाडगीळांच्या निधनानंतर झालेल्या शोकसभेत यशवंतराव म्हणाले होते की काकासाहेब भेटून गेले म्हणजे मनाला आंघोळ घातल्यासारखे वाटे. अशी सुभाषितवजा वाक्ये ते सहज बोलून जात. त्यांना शब्दांची जाण फारच चांगली होती. सूर व शब्द, यांची त्यांच्या भावजीवनाला साथ होती. म्हणूनच संगीतावर व कवितेवर त्यांचे अतोनात प्रेम होते. तो त्यांचा विरंगुळाच नव्हता तर त्यांचे ते अन्न होते. सुधीर फडकेंना ते म्हणूनच एकदा म्हणाले ‘‘मन जेव्हा विषण्ण होते तेव्हा तुम्ही म्हटलेली भावगीते ऐकत बसतो.’’ ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे त्यांचे आवडीचे गीत होते. ग. दि. माडगूळकर गेले तेव्हा त्यांच्या आठवणीने यशवंतरावांचे डोळे डबडबून आल्याचे मी पाहिले.
मराठी माणसावर व महाराष्ट्राच्या मातीवरच यशवंतरावांचे प्रेम होते. कितीही कामाच्या गडबडीत असले, ताण असला तरी मराठी साहित्यिक, विद्वान, कलावंत यांना त्यांचे दरवाजे उघडेच असत.